Untitled 1

मन, मंत्र आणि नामस्मरण

लेखक : बिपीन जोशी

मी माझ्या कुंडलिनी जागृतीचे सुलभ मार्ग या लेखात म्हटल्याप्रमाणे जप अथवा नामस्मरण हा मनावर ताबा मिळवण्यासाठी एक अतिशय चांगला आणि प्रभावी उपाय आहे. जप आणि अजप ही जोडगोळी साधकाला आध्यात्मिक प्रवासात वेगाने पुढे नेते. काही वाचकांनी जपाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून हा लेख.

मंत्र म्हणजे काय?

प्रथमतः आपल्या हे समजावून घेतले पाहिजे की मंत्र म्हणजे नक्की काय आहे. मंत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मनन करणार्‍याचे रक्षण करणारा. अर्थात मंत्र ही मनन करण्याची गोष्ट आहे. मुखातून जोराने उच्चारण्याची नव्हे! मंत्र हा एक किंवा अधिक अक्षरांपासून बनलेला समुह असतो ज्याच्या वारंवार उच्चारण करण्याने मनाचा पोत सुधारण्यास मदत होते. मंत्रांचे अनेक प्रकार आहेत. त्यातील मुख्य प्रकार खालीलप्रमाणे:

  • वैदीक मंत्र
  • उपनिषदीक मंत्र
  • पौराणिक मंत्र
  • तांत्रिक मंत्र
  • शाबरी मंत्र
  • बीज मंत्र
  • नामस्मरणाचे मंत्र

वैदीक मंत्र हे वेदांत सांगितले आहेत. गायत्री मंत्र हा एक वैदीक मंत्र आहे. उपनिषदांतील मंत्र हे ज्ञानगर्भ मंत्र आहेत. सोहम्, अहम ब्रह्मास्मि ही उपनिषदांतील मंत्रांची काही उदाहरणे. हे मंत्र ज्ञानमार्गावरून वाटचाल करणार्‍या साधकांसाठी चांगले आहेत. पौराणिक मंत्र पुराणांमधून आलेले आहेत. पौराणिक मंत्र हे बहुदा एखाद्या विशिष्ठ दैवताचे असतात. हे मंत्र भक्तीमार्गावरील साधक वापरताना दिसून येतात.

साधारणतः वैदीक, उपनिषदैक आणि पौराणिक मंत्रांना स्वतःचा असा काही अर्थ असतो. त्याउलट तांत्रिक मंत्रांना बर्‍याचदा भाषेच्या दृष्टीने पाहता काहीच अर्थ असतो. पण स्पन्दनांच्या दृष्टीने पाहता ते अतिशय प्रभावी असतात. क्रीं, श्रीं, क्लीं इत्यादी मंत्र तांत्रिक मंत्र आहेत. बरेचसे तांत्रिक मंत्र एक वा अनेक बीजांनी बनलेले असतात. तांत्रिक मंत्र हे नेहमी एखाद्या जाणकार तांत्रिक गुरूकडूनच शिकून घ्यावेत. त्यांमधे उच्चारांना अत्यंत महत्व आहे आणि एखादी चुक साधकासाठी त्रासदायक ठरू शकते. अनेक तांत्रिक मंत्र हे काम्य मंत्र आहेत. काही तर जारण-मारणासारख्या निषिद्ध कार्यांसाठी वापरले जातात. अर्थात अशी वाईट कृत्ये करणारा साधक त्याचे गंभीर परिणाम भोगतो. 

साधारणतः मंत्र हे संस्कृत भाषेत असतात. सर्वसामान्यांना संस्कृत येत असेलच असे नाही. हे लक्षात घेवूनच गोरक्षनाथांनी शाबरी मंत्रविद्या प्रचारात आणली. अनेक शाबरी मंत्र हे हिंदी सदृश्य भाषेत आहेत. शाबरी मंत्र हे ही काम्य कार्यांसाठीच वापरतात. आजकाल बाजारात मिळणार्‍या शाबरी मंत्रांच्या पुस्तकांपासून साधकांनी सावध रहावे. कारण अनेकदा शाबरी मंत्रांच्या नावाखाली काय वाटेल ते त्यांत घुसडलेले असते. असे मुद्र्ण दोष असलेले आणि चुकीचे मंत्र अर्थातच फायदा देत नाहीत.

बीज मंत्र हे साधारणतः एका अक्षराचे बनलेले असतात. जसे ॐ अथवा क्रीं. या अक्षरांना बीजे म्हणतात. स्पन्दनांच्या दृष्टीने ही बीजे अतिशय प्रभावी असतात. अनेकदा ही बीजे अन्य मंत्रांना लावून ते अधिक प्रभावी बनविले जातात.

वरील सर्व प्रकारच्या मंत्रांना विनियोग, करन्यास, अंगन्यास, दिग्बन्ध असे अनेक सोपस्कार आहेत. या सोपस्कारांसह म्हटलेले मंत्रच साधकाला इच्छित फळ देतात. हे सोपस्कार साधकांना अनेकदा किचकट वाटतात. नामस्मरणाच्या मंत्रांना असे कोठलेही बंधन नाही. साधनेच्यावेळी, कार्यरत असताना, उठता-बसता कधीही नाम घेता येते. आपल्या उपास्य दैवतावर श्रद्धा असली की झाले! उदाहरणच द्यायचे झाले तर नारद मुनींचे देता येईल. सदा सर्वदा त्यांच्या मुखात 'नारायण नारायण' हे नाम असे. त्यातच त्यांची साधना, आनन्द सामावलेला होता. बर्‍याचवेळा पौराणिक मंत्र त्यांतील किचकट वाटणारे सोपस्कार वगळून नामस्मरणासाठी घेतले जातात. आजच्या काळाला आध्यात्मिक लाभासाठी इतर कोणत्याही मंत्रांपेक्षा नामस्मरणाचेच मंत्र श्रेष्ठ आहेत.

नामस्मरण का?

आधुनीक काळातील बर्‍याच सुशिक्षीत लोकांना नामस्मरण हे गावंढळपणाचे वा भोळसट श्रद्धेचे लक्षण वाटत असते. नामस्मरण ही म्हातार्‍या-कोतार्‍यांनी वा निवृत्त माणसांही फावल्या वेळात करण्याची गोष्ट आहे असा त्यांचा समज असतो. या समजाला त्यांचे अज्ञानच कारणीभूत असते असे म्हणावे लागेल. माणसाला आपल्या दैनंदीन आयुष्यात अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. कितीही प्रयत्न केले तरी कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. अशा वेळी तो परमेश्वराला शरण जातो. कृपा करून माझे अमुक अमुक कार्य सफल होऊदे असे विनवतो. वेळप्रसंगी देवाला अर्धा-एक किलो पेढ्यांची लाचही देतो. पण हे करत असताना तो हा विचार करत नाही की देवाने तुम्हाला मदत का करावी? तुम्ही देवासाठी असे काय केले आहे की ज्यामुळे देवाने आपले काम सोडून तुमच्या मदतीस धावावे?

देवाच्या नामात एक शक्ती असते जी केवळ भक्ताला कळू शकते. भक्ताला नामस्मरणातून अपार आनन्द प्राप्त होत असतो. आपल्या दैवताचे गुणगान, स्मरण आणि चिंतन करणे ही ही एक ध्यान धारणाच आहे. केलेले प्रत्येक स्मरण साधकाचा आध्यात्मिक बॅंक बॅलन्स वाढवत असतो. मग आयुष्यातील कठीण प्रसंगात त्याला हाच बॅंक बॅलन्स मदतीस येतो. त्याला एक भक्कम मानसिक आधार सापडतो. त्याच्या प्रार्थनेला, मनाला आणि इच्छा शक्तीला योग्य एक नियोजीत दिशा सापडते. परमेश्वर मग आपल्या भक्ताकडे आवर्जून लक्ष देतो. कालांतराने मग तो भक्ताच्या लक्षात आणून देतो की केवळ भौतिक गोष्टींसाठी माझा धावा करण्यापेक्षा आध्यात्मिक प्रगतीसाठी तो कर. भक्त मग नामस्मरणात आकंठ डुंबत हा संसार सागरही पार करू शकतो. 

जप करण्याचे प्रकार

कोणताही जप हा तीन प्रकारे करता येतो. पहिला प्रकार आहे वैखरी वाणीतील जप. तोंडाने मोठ्याने उच्चार करून जप करणे म्हणजे वैखरी वाणी होय. असा जप फक्त प्राथमिक अवस्थेतच करतात. तोंडात मंत्राचा उच्चार नीट बसावा म्हणून सुरवातीला असा जप करावा. त्यानंतरची पायरी म्हणजे मध्यमा वाणीतील जप. हा जप तोंडातल्या तोंडात पुटपुटत केला जातो. तीसरा प्रकार म्हणजे मानसिक जप होय. मानसिक जपच खर्‍या अर्थाने मन एकाग्र करण्याचे कार्य करत असतो. सुरवातीला तो कठीण वाटेल पण थोड्या सरावाने तो सहज साधतो. जपाचे हे तीनही प्रकार साधक करत असतो. जपाचा चौथा प्रकारही आहे ज्याला  परावाणीतील जप असे म्हणतात. हा जप साधक करत नाही तर तो आपोआप होतो. ही अत्यंत प्रगत अवस्था आहे. या अवस्थेला पोहोचल्यावर मग जप करावा लागत नाही तर त्याचे अंतःस्फुरण केवळ अनुभवायचे असते.

नामस्मरण आणि गुरू

आजकाल कित्येक साधक पुस्तकातून वा CD/DVD मधून मंत्र निवडतात. अशा प्रकारे मंत्र शक्यतो निवडू नये. विशेषतः तांत्रिक मंत्रांच्या बाबतीत हे फार महत्वाचे आहे कारण मंत्र निवडण्यात जर काही चूक झाली तर ते त्रासदायकही ठरू शकते. 

कोणताही मंत्र अगदी तो नामस्मरणाचा असेक तरीही तो आपल्या गुरूकडूनच घ्यावा. प्रत्येक मंत्रात चार गोष्टी विद्यमान असतात. त्या चार गोष्टी म्हणजे नाम, रूप, अर्थ आणि चैतन्य.

रोजच्या व्यवहारात आपण एकमेकाला नावाने हाक मारतो. एखादे नाव उच्चारल्यावर आपण कोणाविषयी बोलत आहोत हे समजते. उदाहरणार्थ रमेश हे नाव एकल्यावर तुम्हाला 'हे आपल्या मित्राचे संबोधन आहे' हे कळते. नाम एकताच डोळ्यासमोर त्या नामाने व्यक्त झालेली गोष्ट उभी राहते. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही 'गाढव' हे नाम एकता तेव्हा तुमच्या अंतर्चक्षुंसमोर गाढवाचे चित्र उभे राहते. नामाला एक अर्थही असतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही गाढव हे नाम ऐकता तेव्हा एक विशिष्ठ प्राणी हा अर्थ तुमच्या मनात प्रतीत होतो. या जगातील सगळ्या वस्तू नाम-रूपात्मक आहेत. त्यांना नाम-रूप आणि अर्थ आहे. मंत्रांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे त्यांचे चैतन्य. प्रत्येक मंत्रात एक सुप्त चैतन्य असते. ज्याप्रमाणे लाकडात अग्नि सुप्तावस्थेत असतो त्याप्रमाणे. हे सुप्त चैतन्य जागृत करण्यासाठी सामान्य साधकाला त्या मंत्राची लाखो-करोडो आवर्तने करावी लागतात. याला अर्थातच बर्‍याच वर्षांचा कालावधी लागू शकतो. मंत्र जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने त्याचा फायदा होत असतो. गुरू जेव्हा शिष्याला नामस्मरणासाठी मंत्र देतो तेव्हा तो त्यातील चैतन्य जागृत करूनच देतो. त्यामुळे शिष्याला तो परत जागृत करावा लागत नाही. परिणामी त्याला फायदा लवकर मिळतो. त्याच बरोबर गुरू शिष्याला मंत्र कसा जपायचा, जपध्यान कसे करायचे हेही शिकवतो. नुसता मंत्र माळेवर ओढत राहून फायदा होत नाही. जप शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला पाहिजे तरच त्याचा फायदा मिळेल.

अगदी क्वचित प्रसंगी साधकाला परमेश्वरकृपेने मंत्र स्वप्नातही मिळतो. ज्या वाचकांनी माझे देवाच्या डाव्या हाती वाचले असेल त्यांना याविषयीचा माझा अनुभव माहितच असेल.

या सगळ्याचा मतितार्थ असा की अगदी नामस्मरणासाठीही जरी मंत्र घ्यायचा असेल तरी तो आपल्या मनानेच न घेता एखाद्या गुरूला शरण जावून, त्याला नम्रपणे विनंती करूनच घ्यावा. असे नाम तुमचे कल्याण करेल यात शंकाच नाही.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 02 October 2009


Tags : योग अध्यात्म मंत्रयोग कुंडलिनी चक्रे साधना ध्यान भक्ती नाथ