Untitled 1

योग्यांची आंतरिक वारी

आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. हजारो-लाखो वारकरी जनांची वारी आज सफळ होणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन निघालेल्या दिंड्यांचे आज पंढरपुरात थाटात आगमन होणार. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथ महाराजांची, देहूहून संत तुकाराम महाराजांची,  पैठणहून संत एकनाथ महाराजांची, शेगावहून श्रीगजानन महाराजांची अशा अनेक पालख्या पंढरपुरात दाखल होणार.

वारी म्हणजे काही नुसती पदयात्रा नाही. खरंतर ती एक साधना किंवा उपासनाच आहे. आळंदी ते पंढरपूर असा तरी तिचा मार्ग वरकरणी भासत असला तरी खरं तर तो ज्ञानेश्वर ते पांडुरंग अशा आध्यात्मिक प्रवासाचा दर्शक आहे. संत ज्ञानेश्वर हे "सद्गुरू" आणि पांडुरंग म्हणजे "परमात्मा". सर्वसामान्य साधकाला परमेश्वराप्रत पोहोचण्यास गुरूची नितांत आवश्यकता असते. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून मग त्याची वाटचाल सुरु होते. तो गुरुप्रदत्त मार्ग एक दिवस त्याला शिवतत्वापर्यंत घेऊन जात असतो. हा जो मार्ग असतो तो चालण्यास बराच अवधी लागतो. वारकरी ज्याप्रमाणे टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या गजरात,  भजन-कीर्तनाच्या जल्लोषात वारीचा मार्ग क्रमत असतात त्याचप्रमाणे साधकाला गुरुप्रदत्त साधनेच्या आधारे मोठ्या उत्साहाने हा मार्ग चालावा लागतो.

वारी ही एका अर्थी बहिरंग साधना आहे. अजपा योग साधक एक आंतरिक साधना करत असतात जी त्यांची ध्यानामार्गातील "वारी" असते. या आंतरिक वारीमध्ये कुंडलिनी शक्ती, पंचप्राण, पंचभूतांच्या तन्मात्रा असे साथी-संगाती असतात. अनाहत नाद रुपी टाळ-मृदुंगांच्या गजरात ही आंतरिक वारी मार्गक्रमण करत असते. या वारीचा मार्ग थोडक्यात असा असतो -

अजपा योग साधक मुलाधारातील चार पाकळ्यांनी सुशोभित पद्मात वास करणाऱ्या श्रीगणेशाला वंदन करून कुंडलिनी शक्तीला जागृत करतो. जागृत झालेली कुंडलिनी मग फणा काढलेल्या सर्पिणी सारखी ताठ होऊन पुढच्या प्रवासासाठी तयार होते. म्हणूनच कुंडलिनीच एक नाव आहे भूजांगी. जगन्माता कुंडलिनी आपल्या प्राणप्रिय श्रीशंकराला भेटायला आतुर झालेली असते. मुलाधात पृथ्वी तत्वाचे शोधन करून कुंडलिनी पुढच्या प्रवासासाठी सिद्ध होते. साधक मन, बुद्धी, अहंकार, पंचप्राण, यांच्यासह मग कुंडलिनी शक्तीला सुशुम्ने मधून पुढे नेतो.

प्रवासाचा पुढचा टप्पा असतो स्वाधिष्ठान चक्र. मुलाधारात पृथ्वी तत्व व्याप्त केल्यानंतर स्वाधिष्ठानात अजपा साधक जलतत्वाचे शोधन करतो. उपस्थ स्थानी स्वाधिष्ठानाचे सहा पाकळ्यांचे सुंदर कमळ तो कुंडलिनी शक्तीच्या सहाय्याने फोडतो आणि प्राण चित्रा नाडीत अग्रेसर करतो. स्वाधिष्ठान चक्रातील ब्रह्मदेवाला नमस्कार करून साधकाचा पुढचा प्रवास सुरु होतो.

जलतत्व जिंकल्यावर पुढचा प्रवास सुरु होतो. नाभि स्थानी विराजमान असलेले मणिपूर चक्र दहा पाकळ्यांनी सुशोभित असते. हेच अग्नीचे प्रमुख स्थान. येथील अग्नि तत्वाचे शोधन करून अजपा साधक त्या अग्नीत भौतिक वासनांची आहुती देतो. पहिली तीन चक्रे म्हणजे भौतिक आयुष्याची गुरुकिल्ली. त्या चक्रांत भौतिक वासनांचा आणि संस्कारांचा जन्मोजन्मींचा संचय असतो. तो सर्व संचय नष्ट झाल्याखेरीज निखळ अध्यात्मिक आनंद चाखता येत नाही. मणिपूर चक्रात साक्षात विष्णू विराजमान असतो. त्याचे दर्शन घेऊन साधक पुढच्या टप्प्यासाठी स्वतःला तयार करत असतो.

प्राण आता शुद्ध होऊन सुशुम्ने मध्ये मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेला असतो. आंतरिक वारीचा एक महत्वाचा टप्पा साधकाने ओलांडलेला असतो. पुढे लागते ते बारा पाकळ्यांचे अनाहत चक्र. येथे पोहोचल्यावर कुंडलिनी अनाहत नादाच्या अद्भुत संगीताने साधकाला धुंद करते. तो भौतिक इच्छा आकांक्षांच्या पलीकडे पोहोचलेला असतो. येथे वायुतत्व विराजमान असते. त्याला काबीज केल्यावर कुंडलिनी अंमळ स्थिरावते. साधकाला भक्तिरसात डुंबवते. साधक देहभान तर विसरतो पण त्याचा द्वैत भाव बाकी रहातो. द्वैतभूमीवर राहून भक्तीची अवीट गोडी साधक चाखत असतो. त्याच्या मनातील कामं-क्रोधादिक विकारांचा बऱ्याच प्रमाणात उपशम होतो. आता पुढच्या प्रवासाची वेळ झालेली असते. अनाहत चक्रात विराजमान असणाऱ्या रुद्र देवतेचा आशीर्वाद घेऊन साधक पुढच्या प्रवासाला निघतो.

अनाहत चक्र ओलांडून जगदंबा कुंडलिनी आता सोळा पाकळ्यांच्या विशुद्धी चक्राकडे झेपावते. तेथे अति सूक्ष्म अशा आकाश तत्वाचे शोधन करते. साधकाच्या बुद्धीला सत-असत ओळखण्याची शक्ती प्रदान करते. मेंदूतून स्रवणारे अमृत साधक आता चाखू शकतो. ही अनोखी खुण योगगम्य आहे. सर्वसामान्य बुद्धीला ती कळणारी नाही. भगवान श्रीशंकराने या विशुद्धी चक्राच्या ठिकाणीच हलाहल विष पचवले. ह्या गूढ पौराणिक संकेताचा  अर्थ साधकाला आता समजलेला असतो. विशुद्धी चक्र म्हणजे जीवात्म्याचे वसतीस्थान. त्या जीवात्म्याचे दर्शन घेऊन साधक पुढच्या प्रवासासाठी सज्ज होत असतो.

विशुद्धी चक्राला मागे टाकून साधक आता आज्ञा चक्रावर आलेला असतो. आज्ञा चक्र म्हणजे साक्षात काशी क्षेत्र. येथे इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांचा त्रिवेणी संगम होत असतो. या त्रिवेणी संगमात स्नान करून साधनाची सर्व पापे नष्ट होतात. यथावकाश त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. आज्ञा चक्राचे दैवत आहे आत्मा. त्या दैवात्ताच्या कृपाप्रसादाने साधकाला - मी कोण? कुठला? कोठून आलो? कोठे जाणार? - अशा प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. हे ज्ञान आतून आपोआप प्रकट होत असते. पुस्तकी वाचन येथे खुंटते. पांडित्यपूर्ण बडबड येथे कामी येत नाही. शुद्ध आत्मज्ञानाच्या प्रकाशाने साधकाचे जीवन उजळून जाते. याच तेजाच्या साक्षीने साधक सहस्रार चक्रातील "पंढरपुरात" जाण्यासाठी सज्ज होतो.

सहस्रदल चक्र म्हणजे परमात्म्याचे निवासस्थान. येथेच ज्ञानेश्वरांनी सांगितलेला अद्वय आनंद साधकाला प्राप्त होत असतो. ज्याप्रमाणे पंढरपूरचा पांडुरंग त्याचप्रमाणे सहस्रारात ईश्वर वास करतो. कोणी त्याला शिव म्हणतो तर कोणी विष्णू तर अजून कोणी सद्गुरू. नावे काही द्या पण तत्व तेच असते. येथे जगदंबा कुंडलिनीची भेट परमाशिवाशी होते. दोघे एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. कुंडलिनी सहस्रारातील अमृत यथेच्छ चाखते. निजानंदात डुंबते. शिव-शक्ती मिलनाचा सोहळा साधक प्रत्यक्ष अनुभवतो. पिंड आणि ब्रह्मांड एकत्व आता त्याच्या अनुभूतीचा विषय बनते. त्याचा योग खऱ्या अर्थाने सफल होतो. साधक निर्विकल्प समाधी अनुभवतो. तो मोक्ष पदावर आरूढ होण्यास पात्र झालेला असतो.

अशा प्रकारे कुंडलिनी शक्ती मूलाधार ते सहस्रार असा आंतरिक वारीचा प्रवास करत असते. पण तिचा प्रवास अजून संपलेला नसतो. सहस्रारदलातील अमृतात डुंबल्यावर कुंडलिनी माघारी फिरते. साधकाचे प्रारब्ध संपवण्यासाठी तिला परतीचा प्रवास करणे भाग असते. आतापर्यंत केलेले आरोहण आवरून ती अवरोहणाला सिद्ध होते. सहस्रार चक्रापासून खाली उतरत परत मुलाधारात येते. या माघारी फिरलेल्या कुंडलिनीला योगशास्त्रात कुल कुंडलिनी म्हणतात.

या आंतरिक वारीने साधकाचे जीवन अमुलाग्र बदलेले असते. त्याचा देह तोच असतो. तो वरकरणी सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो, वागतो, चालतो-बोलतो. परंतु आतून त्याच्या जणू नवीन जन्म झालेला असतो. त्याच्या मनी विवेक, वैराग्य, साक्षित्व सहजच विराजमान होते. तो चार-चौघांसारखी कर्मे करतो पण त्यांमध्ये लिप्त होत नाही.

अशी ही अंतरंग साधना. जितके लिहावे तितके थोडेच आहे. तुम्हा सर्वाना ही आंतरिक वारी करण्याची सदिच्छा होवो आणि योग्य ते मार्गदर्शन मिळून प्रत्याक्षानुभूती घडो हीच त्या जगद्नियन्त्या आदिनाथापाशी विनम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 July 2018