Untitled 1

गुढरम्य सुषुम्नेच्या अंतरंगात

आज खरंतर दुसऱ्या काही विषयावर लिहिणार होतो परंतु त्या ऐवजी ही छोटेखानी पोस्ट टाकतोय. कुंडलिनी योगमार्गावर अनेकानेक गूढ योगगम्य अनुभूती पदोपदी येत असतात. तुम्हीं जर ध्यानाच्या परिपक्व अवस्थेतील अनुभवांचे निरीक्षण केलेत तर ते अनुभव ढोबळमानाने तीन प्रकारात विभागता येतील.

१. नादाचे अनुभव

२. प्रकाशाचे अनुभव

३. नाद आणि प्रकाश यांचे एकत्रित अनुभव

नादाचे अनुभव कोणत्या तरी स्पन्दनांशी निगडीत असतात. उदाहरणार्थ, ध्यानात ओंकाराचा ध्वनी ऐकु येणे. आपण जो मंत्र सिद्ध केलेला आहे त्याचा गुंजारव ऐकु येणे. अनाहत ध्वनी ऐकु येणे वगैरे जे काही अनुभव असतात ते या प्रकारात मोडतात.

प्रकाशाचे अनुभव म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची दृश्ये दिसणे. उदाहरणार्थ, आपल्या इष्ट देवतेचे दर्शन, पाणी, फुले, बर्फ, अग्नीच्या ज्वाळा किंवा ठिणग्या दिसणं. एखादे सुंदर विहंगम परंतु अपरिचित ठिकाण दिसणे, दिव्य प्रकाश जाणवणे. अशा प्रकारचे अनुभव म्हणजे प्रकाशाचे अनुभव.

तिसऱ्या प्रकारात दोन्हीचा एकत्र समावेश असतो. उदाहरणार्थ, ओंकाराचा ध्वनी ऐकु येणे आणि त्याचबरोबर अंतःचक्षूंसमोर ओंकार दिसणे वगैरे.

या जोडीला अन्य अनुभवही (जसं सुगंध किंवा स्पर्श) असतात. नाही असं नाही. परंतु त्यांचे प्रमाण नाद आणि प्रकाशांच्या अनुभवांपेक्षा बरंच कमी असतं. सुरवातीच्या काळात आलेले असे बरेचसे अनुभव अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने अर्थहीन असतात. मनाची शुद्धी होत असल्याचे ते लक्षण असतं. मनात जन्मोजन्मींचा जो "कचरा" साचलेला असतो तो मन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेत टाकत असतं. परंतु एकदा का आंतरिक शुद्धी झाली (प्राणायामाची तिसरी अवस्था आठवा) की अशा अनुभूतींचे स्वरूप आणि अर्थही पार बदलून जातो. त्या विषयी विस्ताराने पुन्हा कधीतरी सांगीन.

अशाच एका ध्यानातील अनुभूतीचं गूढ योगगम्य चित्र खाली देत आहे.

हे चित्र / रेखाटन मी बऱ्याच वर्षांपूर्वी स्वतः काढलेलं आहे. मी काही चित्रकार वगैरे अजिबात नाही. तेंव्हा या चित्राकडे कलेच्या दृष्टीने पाहू नये. कुंडलिनी योगमार्गाची फारशी ओळख नसलेल्या लोकांना हे चित्र कळणारही नाही. या चित्राला मी नाव दिलंय - गूढरम्य सुषुम्नेच्या अंतरंगात अर्थात Inside Mystical Sushumna.

त्याचं झालं असं की त्या दिवशी रात्री मी षण्मुखी मुद्रा लावून अजपाची पाचवी क्रिया करण्यात मग्न होतो. करकचून ध्यान लागलं होतं. जीभ आपोआप उलटी होऊन टाळूला घट्ट चिकटली होती. मध्यरात्र केंव्हाच उलटून गेलेली होती. किती तास झाले पत्ताच नव्हता. अचानक ध्यानी-मनी नसतांना चित्रात काढलेल्या "यंत्राचे" अतिशय ओजस्वी-तेजस्वी स्वरूपात बराच काळ दर्शन झाले. त्याचं तेज एवढं होतं की जणू सहस्त्र सूर्य आणि शीतलता एवढी की जणू सहस्त्र चंद्र. ध्यानातून जागा झाल्यावर आलेली अनुभूती लगेच जमली तशी चित्रबद्ध करून ठेवली. अर्थात चित्रात सर्वच तंतोतंत प्रकट करणं सर्वथा अशक्य आहे.

सर्वसाधारण कुंडलिनी साधकाला सुषुम्ना म्हणजे काय याची जुजबी माहिती असते. सुषुम्नेच्या आत कुंडलिनीला न्यायची एवढीच मोघम सुचना योगग्रंथांत आढळते. पण जेंव्हा तुम्ही सुषुम्नेत पोहोचता तेंव्हा तुम्हाला कळत की अरे इकडे तर बरंच काही आहे की. मी काढलेल्या वरील चित्रात जो बाहेरचा चौकोन दिसतोय ना ती सुषुम्नेची सीमारेषा आहे. इडा आणि पिंगला यांना आत प्रवेश नाही. आत अजून तीन नाड्या असतात - वज्रा, चित्रा आणि ब्रह्मनाडी. आजुबाजुला तरल आकाश आणि आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे. एवढंच कशाला अमृत पाझरणारा चंद्र आणि चांदण्या सुद्धा असतात. त्या त्रिकोणांना, आतील सोनेरी बिंदुला सुद्धा काही योगगर्भ अर्थ आहे.

मला कल्पना आहे की बऱ्याच लोकांना हे जे मी काय सांगतोय ते आणि माझं चित्र यांतील काही संदर्भ लागणार नाही. त्यामुळे फार खोलात जात नाही. जर सगळं विस्ताराने सांगत बसलो तर एक लेखमाला होऊ शकेल. योगशास्त्रीय गोपनीयतेच्या कारणास्तव अनेक गोष्टी प्रकटपणे सांगताही येणार नाहीत. आजवर अशी अनेक चित्रे / रेखाटने मी काढून ठेवली आहेत. अर्थात मी ती फारशी कोणाला कधी दाखवत नाही. आज सहज हे चित्र हाताला लागलं म्हणून पोस्ट केलं इतकंच.

असो.

मानवी पिंडात असंख्य गुह्य, गोपनीय आणि योगगम्य रहस्य भरलेली आहेत. जगदंबा कुंडलिनीच्या कृपेने तुम्हाला त्यांची उकल होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 January 2020