हठयोगाचे प्रयोजन

लेखक : बिपीन जोशी

हठयोग या विषयावर लोकांमधे अनेक गैरसमज आहेत. हठयोगी हा शरीरावरच फार प्रेम करतो. त्याचे सारे लक्ष शरीराची काळजी घेणे, नाना सिद्धी मिळवणे, चमत्कार करणे, कठीण कठीण आसने करणे यांकडे असते असे एक ना अनेक गैरसमज लोकांमधे असतात. केवळ काही पाखंडी, वाट चुकलेल्या हठयोग्यांकडे बोटे दाखवून ते सार्‍या हठयोगशास्त्रालाच नावे ठेवत असतात.

हठयोग प्रदीपिकेच्या सुरवातीच्या काही श्लोकातच स्वात्मारामाने हठयोगाचे खरे प्रयोजन काय ते स्पष्ट केले आहे.

श्रीआदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या।
विभ्राजते प्रोन्नतराजयोगमारोढुमिच्छोरधिरोहिणीव॥

श्री आदिनाथ अर्थात भगवान शंकर, ज्यांनी सर्व योगांत श्रेष्ठ असा जो राजयोग तो साध्य करण्यासाठी उत्तम मार्ग जो हठयोग त्याचा उपदेश केला, त्याना नमस्कार असो.

भगवान शंकर हे योगशास्त्राचे निर्माते. संपूर्ण योगशास्त्र हे शंकर-पार्वती संवादामार्फत सांगितले गेले आहे. शंकराला आदिनाथ म्हटले जाते. नाथ म्हणजे स्वामी किंवा मालक. शंकर हा सर्व जगाचा स्वामी आहे. ब्रह्म, परमात्मा या नावांनी ओळखली जाणारी वस्तू म्हणजे शंकरच. आपल्या भक्तांसाठी तो सगुणरूपाने अवतरतो. आदि या शब्दाने सर्वात आधीचा अथवा मुळ असा अर्थ सुचित केला आहे. नाथ सम्प्रयदायाचा उगम शंकरापासून आहे. तोच प्रथम नाथ. शंकराच्या आधी कोणी अन्य अस्तित्वातच नव्हते. शंकर जन्म-मृत्यु रहीत आहे. म्हणूनच शंकराचे एक नाव अकुल म्हणजे ज्याला कुळ नाही असा असे आहे. कुळ हे जन्म झालेल्याला असते. पण ज्याचा जन्मच झालेला नाही त्याला कुळ कसे असणार? पुराणांत शिव-पार्वती विवाहाच्या वेळची एक छान गोष्ट आहे जी शंकराचे अकुल स्वरूप स्पष्ट करते. शिव-पार्वती विवाहाच्या आगोदर त्यावेळच्या प्रथेनुसार हिमवानाने (पार्वतीचे पिता) नवरा मुलगा कोण आहे ते प्रथम पाहू म्हणून शंकराची भेट घेतली. शंकराचा वेष आणि त्याचे भयानक गण पाहून हिमवानाला काळजी वाटली. त्याने शंकराला विचारले - "काय रे बाबा शिवा तुझे पिता कोण?" शंकर उत्तरला - "ब्रह्मदेव माझे पिता". त्यावर हिमवानाला विस्मय वाटला. त्याने विचारले - "ब्रह्मदेवाचे पिता कोण?" यावर शंकर उत्तरला - "विष्णू त्यांचे पिता" हिमवानाने पुढे विचारले - "बर तर विष्णूचे पिता कोण?". यावर गूढ स्मित करत शंकर म्हणाला - "शिव". असो.

अशा या भगवान शंकरांची पहिली शिष्या म्हणजे त्याची अर्धांगिनी पार्वती. शंकर-पार्वती संवाद नाथ संप्रदायाच्या जन्माचे कारण कसे घडला ते आपण पुढे पाहणारच आहोत. या आदिनाथाला नमस्कार करून योगी स्वात्मारामाने हठयोग प्रदीपिकेची सुरवात केली आहे. नाथ संप्रयदाय हा मुलतः शैव संप्रयदाय आहे. तेव्हा आपल्या उपास्य दैवताला नमस्कार करून ग्रंथाची सुरवात करणे हे योग्यच आहे.

हठयोग प्रदीपिकेच्या या पहिल्याच श्लोकात शंकराने हठविद्येचा उपदेश का केला ते सांगितले आहे आणि ते फार महत्वाचे आहे. शंकराने हठयोग प्रतिपादला तो राजयोगाच्या सिद्धी साठी. राजयोग म्हणजे योगांचा राजा. राजयोगामधे ध्यानाद्वारे मनाला अमन बनवायचे असते. पतंजली योगसूत्रात योगव्याख्या सांगितले आले - योग चित्तवृत्ती निरोधः अर्थात चित्तात उठणार्‍या वृत्तींना थांबवणे म्हणजे योग. हीच राजयोगाची व्याख्या आहे असे म्हणता येईल. मनाला अमन बनविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रत्येक गुरू वा संप्रदाय आपलाच मार्ग चांगला असे म्हणताना आढळतो. कोणी भक्ती श्रेष्ठ असे म्हणतो तर कोणी ज्ञानाची प्रशंसा करतो. कोणी जप करा असे सांगतो तर कोणी कर्मयोगाची कास धरा असे सांगतो. स्वात्मारामाच्या मते हठयोग हा राजयोग साधण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.

चित्तात उठणार्‍या वृत्तींचा निरोध करणे ही कर्मकठीण गोष्ट. ज्या वाचकांनी ध्यान-धारणेचा अभ्यास काही काळ तरी केला आहे त्यांना हे सहज पटेल. अतिचंचल मनाला वेसण घालण्यासाठी अनेक क्लुप्त्यांचा वापर करावा लागतो. योगशास्त्रानुसार प्राण आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राण ताब्यात आले तर मनही ताब्यात येते आणि मन ताब्यात आले तर प्राणही ताब्यात येतात. मन ताब्यात येणे महाकठीण म्हणून हठयोगात प्रथम प्राणावर ताबा मिळवला जातो. एकदा का प्राणावर ताबा आला की मन सहज ताब्यात येते. हठयोगाचा मुख्य उद्देश हा राजयोगाची प्राप्ती हाच आहे. तेव्हा साधकाने नसत्या भ्रमात न राहता, न भरकटता या उद्देशाकडेच लक्ष ठेवले लाहिजे.

प्रणम्य श्रीगुरूं नाथं स्वात्मारामेण योगिना।
केवलं राजयोगाय हठविद्योपदिश्यते॥

आपल्या गुरूदेवांना नमस्कार करून योगी स्वात्माराम केवळ राजयोगाच्या प्राप्तीकरता हठविद्येचा उपदेश करत आहे.

भगवान शंकराला नमन केल्यावर आता स्वात्माराम आपल्या गुरूदेवांना मनस्कार करत आहे. सर्वच आध्यात्मिक विचारधारांत गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. नाथ सम्प्रयादायात तर गुरूला काकणभर जास्तच महत्व आहे. त्याला तीन महत्वाची कारणे आहेत. एक म्हणजे नाथ सम्प्रयदाय हा शैव पंथच असल्याने त्यात शक्तिपाताला महत्वाचे स्थान आहे. योग्य शिष्याला नाथ गुरू कृपाळूपणे शक्तीपात दिक्षा देतात ज्यामुळे जगदम्बा कुंडलिनी लवकर जागृत होते आणि आध्यात्मिक प्रगती लवकर होते. दुसरे असे की कुंडलिनी जागृतीसाठी नाथ सम्प्रयदायाने निवडलेला प्राणायाम, बन्ध, मुद्रा हा मार्ग प्रत्यक्ष एखाद्या तज्ञाकडून शिकणे जास्त चांगले. ज्याप्रमाणे तबला शिकायचा असेल तर तो केवळ पुस्तके वाचून शिकता येणार नाही त्याचप्रमाणे हठयोग्याच्या सर्वच क्रिया पुस्तकातून शिकता येणार नाहीत. जुन्या काळी जेव्हा ज्ञानदानाचे मार्ग अगदी मर्यादीत होते तेव्हा तर हे जास्तच महत्वाचे असले पाहिजे हे उघड आहे. तिसरे कारण असे की योगजीवनावर वाटचाल करण्यासाठी कोणीतरी आदर्श (Role Model) डोळ्यासमोर असेल तर साधकाचा बराच फायदा होतो. गुरू हा असा आदर्श असतो की ज्याच्याकडे पाहून साधक चांगली मुल्ये आपल्या अंगी बाणवू शकतो. मग त्याच्या मनात शंकाकुशंका येत नाहीत. आल्या तरी तो गुरूकडून त्यांचे निरसन करून घेऊ शकतो.

स्वात्मारामाने येथे परत एकदा हठयोग हा राजयोगाच्या प्राप्तीकरताच आहे हे स्पष्ट केले आहे. जर तुमच्या हठयोगाभ्यासाने राजयोगाची प्राप्ती होत नसेल तर असा अभ्यास व्यर्थच आहे असेच स्वात्मारामाला सुचवायचे आहे. समजा तुम्हाला एखाद्या गावी काही महत्वाच्या कामासाठी जायचे आहे. जर तुम्ही चालत असलेला रस्ता तुम्हाला त्या गावी घेवून जात नसेल तर मग तो कितीही नयनरम्य वा सुखकारक का असेना त्या प्रवासाचा काहीच उपयोग नाही. तो व्यर्थ शीणच होय. हठयोगाचेही असेच आहे. हठयोगाला नावे ठेवणार्‍यांसाठी, हठयोग म्हणजे केवळ शारीरिक कसरती असे म्हणणार्‍यांसाठीही हा श्लोक म्हणजे अंजन आहे.

भ्रांत्या बहुमतध्वांते राजयोगमजानताम।
हठ प्रदीपिकां धत्ते स्वात्मारामः कृपाकरः॥

राजयोगाची प्राप्ती नाना मतमतांतरांमुळे भ्रांती उत्पन्न झाल्याने दुरच रहाते. त्यामुळे लोककल्याणार्थ स्वात्माराम कृपाळूपणे हठयोगावर प्रकाश टाकत आहे.

राजयोग अर्थात समाधीप्राप्ती कशी करावी याबाबत अक्षरशः असंख्य मतमतांतरे आहेत. पण सत्य हे आहे की योगमार्गाचे अवलम्बन केल्याशिवाय समाधी प्राप्ती शक्य नाही. आज समाजात असे दिसते की अनेक आध्यात्मिक गुरू आपापल्या मार्गाबद्दल दुराग्रही असतात. माझ्या कडे भेटायला आलेल्या एका माणसाचे उदाहरण देतो. हा साधारण वयाच्या चाळीशीतील मनुष्य एका 'गुरू' कडे गेला. गुरूने त्याला नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ आहे. योगवगैरे तरी कशासाठी करायचे? परमेश्वरासाठीच ना? मग त्याचेच नाव घेतले की झाले. अशा तर्‍हेचा समज या माणसाच्या मनात भरवला. सोबत असेही सांगितले की नाम कसेही, कुठेही, कधीही घेता येते. ते सोपेही आहे. त्यातच तुझे कल्याण आहे वगैरे वगैरे. झाले हा मनुष्याने मनोभावे नामस्मरणाला सुरवात केली. सुरवातीला काही आठवडे छान वाटले मग मात्र नामस्मरणात मनच लागेना. तो गुरू नेहमी सांगत असे भक्तीपूर्वक नाम घे की सर्व ठीक होईल. पण या माणसाला भक्तीच वाटत नसे. तो गुरू भक्तीविषयी आणि नाममहात्म्या विषयी जे सांगत असे ते प्रत्यक्षात अनुभवास मात्र येत नसे. ना त्याचे मन शांत झाले ना भक्तीत वाढ झाली ना अन्य काही फायदा होताना दिसला. सुमारे चार वर्षे प्रयत्न करून मग तो कंटाळला आणि अन्य मार्गांकडे वळला. आता यात चुक कोणाची? भक्तीमार्गाची नक्किच चूक नाही! चुक आहे त्या गुरूची आणि त्या शिष्याचीही. आपल्या मार्गाविषयी आपलेपणा असणे, दुसर्‍यांनीही तो आचरावा असे वाटणे समजू शकतो. पण म्हणून दुसर्‍या मार्गांना नावे ठेवणे किंवा आपला मार्ग सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही हे सत्य नाकारणे काही बरोबर नव्हे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने एकच अध्यात्ममार्ग सर्वच साधकांना ठोकळेबाजपणे आचरता येत नाही. म्हणूनच तर भारतात अनेकानेक साधनामार्ग प्रचलित आहेत. प्राचीन काळी गुरू शिष्याला बघून त्याला साधनामार्ग सुचवत असे. आज मात्र तसे फारसे आढळत नाही. साधारणतः गुरू आपली पद्धती ती श्रेष्ठ दुसर्‍याची ती टाकावू असा प्रसार करताना दिसतात. आपला शिष्य समुदाय वाढावा म्हणून ते कोणालाही शिष्य म्हणून स्विकारण्यास तयार असतात. याबाबतीत शास्त्रग्रंथांचे म्हणने ते पार धुडकावून लावतात. वर हेही सांगण्यास विसरत नाहीत की पहा आम्ही किती दयाळू आहोत. कोणावरही आम्ही दया करतो! आपल्याला शिष्य मिळावेत म्हणून ते असेही सांगतात की आमचा मार्ग हाच सर्वात सोपा आहे, तुमच्या सध्याच्या स्वैर आयुष्याला वेसण न घालताही तुम्ही तो अवलंबू शकता! याला ते 'योग प्रसार' असे गोंडस नावही देतात. आध्यात्मिक आयुष्य हे शिस्तबद्धपणेच चालायला हवे. ज्यांना आपले स्वैर जीवन एका अंशाने देखील सोडायचे नसेल त्यांची आध्यात्मिक प्रगती होणे सर्वथा अशक्य आहे. ज्या साधकांचा तसा गोड गैरसमज असेल त्यांनी डोळसपणे थोर संत महात्म्यांचे आयुष्य तपासून बघावे आणि स्वतःच काय ते ठरवावे. असो.

स्वात्मारामाच्या मते राजयोगाच्या प्राप्तीकरता हठयोग हाच राजमार्ग आहे. येथे काही वाचक असा प्रश्न उपस्थित करतील की मग स्वात्मारामही दुराग्रहीच नाही का ठरत? आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हठयोग प्रदीपिका हे काही आजच्या काळात लिहिलेले, कोणीही विकत घेऊन वाचावे असे पुस्तक नाही. तो एक सांप्रदायिक ग्रंथ आहे. एखाद्या नाथ सम्प्रदायातील अधिकारी गुरूने साधकाची परिक्षा करून त्याला शिष्य म्हणून स्विकारले की मग त्याने या ग्रंथाचे अध्ययन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वात्मारामापुढे एक विशिष्ठ वाचक वर्ग आहे जो नाथ सम्प्रयदात सामावून घेतलेला आहे. त्यामुळे स्वात्माराम जेव्हा म्हणतो की 'राजयोगाच्या प्राप्तीकरता हठयोग हाच राजमार्ग आहे' तेव्हा तो 'सर्वांना' उद्देशून नव्हे तर 'नाथपंथाच्या नवीन साधकांना' उद्देशून म्हणत आहे. त्यामुळे अर्थातच स्वात्माराम दुराग्रही नाही.

अशा साधकांवर कृपा करण्यासाठी स्वात्माराम हठयोगावर प्रकाश टाकत आहे अर्थात हठयोगाचे निरूपण करत आहे. येथे कृपाळूपणे हा शब्द महत्वाचा आहे. असाच व्यक्ती दुसर्‍यावर कृपा करू शकतो की ज्याने या मार्गाने साक्षात्कार करून घेतला आहे. आजकालच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍या गुरूंसारखे स्वात्मारामाचे ज्ञान केवळ पुस्तकी नाही. ते त्याने गुरूकडून आणि स्वानुभवातून मिळवले आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 November 2009


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ