Untitled 1

श्रीरामाला नाथपंथाची दीक्षा

नाथ संप्रदायाची पाळंमुळं भारतभर फार खोलवर रुजलेली आहेत. विशेषतः प्रादेशिक भाषांमधील नाथपंथीय साहित्यामध्ये प्रचंड विविधता आणि तफावत दिसून येते. या कथा-दंतकथा खर्‍या किती आणि काल्पनिक किती हे ठरवणे अर्थातच कर्मकठिण आहे. एखाद्या इतिहास तज्ञाला पुराव्या अभावी ह्या कथा केवळ कपोकल्पित वाटतील हे खरे परंतु सामान्य साधकाच्या दृष्टीने त्यातील रोचकता आणि शिकवण तसूभरही कमी होत नाही.

नाथ संप्रदायाचे संस्थापक म्हणून जारी मत्स्येंद्रनाथांचे नाव घेतले जात असले तरी खर्‍या अर्थाने नाथ संप्रदायाची प्रवर्तक आहेत गोरक्षनाथ. गोरक्षनाथांसारखा सिद्ध आजवर झाला नाही आणि कदाचित होणारही नाही. मला स्वता:ला त्र्यंबकेश्वरला आदिनाथ ते ज्ञाननाथ या नाथ गुरूपरंपरेचे ज्योर्तीमय दर्शन घडले. त्यानंतरही साधनामार्गावर गोरक्षनाथांचा अनुग्रह आणि दृष्टान्त मिळत गेले. या सर्वावरुन एक योगमार्गी म्हणून मी एवढे सांगू शकतो की गोरक्षनाथ निःसंशय शिवावतार आहेत. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे. असो. आता मूळ मुद्दयाकडे वळतो.

गोरक्षनाथांचा काळ हा १०-११ शतकातील असावा असे इतिहास तज्ञ मानतात. परंतु विविध नाथ साहित्यामध्ये अगदी रामायण काळातही गोरक्षनाथ देहधारी अवस्थेत होते असे उल्लेख आढळतात. ओडिसाकडील नाथ साहित्यामध्ये भगवान श्रीरामाने गोरक्षनाथांचे शिष्यत्व पत्करले होते असा उल्लेख आढळतो. त्याच संबंधीची एक गोष्ट आठवते आहे ती आता सांगतो. मी ही गोष्ट खूप वर्षांपूर्वी कोठेतरी वाचलेली आहे. त्यामुळे बारीक-सारीक संदर्भ थोडेफार इकडे-तिकडे होऊ शकतात हे कृपया लक्षात घ्यावे.

भगवान श्रीराम हा विष्णूचा अवतार मानला गेला आहे. राम-रावण युद्धात रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परत आला. आपले राज्य सुस्थितीत लावून राज्य कारभार सुरू झाला. परंतु त्याला एक चिंता सतावत होती. रावण जरी पापी असला आणि त्याचा वध हे जरी परम आवश्यक कर्म असले तरी तो ब्राह्मण होता. शिवज्ञानी होता. भगवान शंकराला घोर तपश्चर्येद्वारे त्याने प्रसन्न करून घेतले होते. प्रकांड शिवभक्त असलेला रावण योग-अध्यात्म-तंत्र-मंत्र अशा विषयांमध्ये निष्णात होता. त्याच्या वधामुळे श्रीरामाच्या माथी ब्रह्महत्येचे पाप लागले होते. हे ब्रह्महत्येचे पाप कसे धुवावे ही चिंता श्रीरामाला सतावत होती.

आपल्या गुरूंशिवाय या विषयी मार्गदर्शन कोण करणार असा विचार करून श्रीराम ब्रह्मर्षि वशिष्ठ यांच्याकडे गेला. आपल्या मनातील चिंता त्याने आपल्या गुरूंकडे बोलून दाखवली. श्रीरामाची चिंता ऐकल्यावर ब्रह्मर्षि वशिष्ठ काहीसे गंभीर झाले. श्रीरामाला म्हणाले - "रामा! ब्रह्महत्येच्या पापातून तुला मी सुद्धा सोडवू शकणार नाही. एकच व्यक्ति तुला या कामी मदत करू शकेल - गोरक्षनाथ"

आपल्या गुरूंचे बोलणे ऐकल्यावर श्रीराम तातडीने लक्ष्मण आणि सीतेसह गोरक्षनाथांना भेटायला गेला.  गोरक्षनाथ त्यावेळी एका पर्वतावर तपश्चर्येत मग्न होते. श्रीरामाने मोठ्या प्रेमाने त्यांचे चरण धरले आणि अनुग्रह मागितला. गोरक्षनाथांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना विधिवत नाथ पंथाची दीक्षा दिली. त्याचा कर्णछेद करून "मुद्रा" घातल्या.  त्यांना अनुक्रमे अचलनाथ आणि नागनाथ अशी नावे दिली. सीता मातेचा कर्णच्छेद केला नाही फक्त अनुग्रह दिला आणि ध्यानाची दीक्षा दिली.

नाथ पंथी दीक्षा म्हणजे कुंडलिनी योग आणि शिवभक्ती आलीच! याच आधाराने श्रीरामाने ब्रह्महत्येच्या पापातून स्वतःची सुटका करून घेतली. शिवसंहितेतही असा उल्लेख आढळतो की जो योगी खेचरी मुद्रा आणि अन्य क्रियांचा विधिवत अभ्यास करतो तो पूर्वजन्मीच्या ब्रह्महत्या, गुरूहत्या अशा महापातकांपासून मुक्ति मिळवतो. याचा योगशास्त्रीय अर्थ असा की या क्रिया शिवज्ञान करून देत असल्याने सर्व कर्म (चांगली आणि वाईट) नष्ट होतात आणि शुद्धावस्था प्राप्त होते.

उद्या श्रीराम नवमी आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपणही शिवसिद्ध गोरक्षनाथ आणि भगवान श्रीराम यांना वंदन करूया आणि त्यांचा आशिर्वाद मागुया.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 March 2015


Tags : योग शिव कुंडलिनी नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates