Untitled 1

आधुनिक जीवनशैलीत नाथ संप्रदायाची मुलतत्वे

मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकराच्या आज्ञेने आणि अवधूत दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली नाथ संप्रदायाचे इवलेसे रोपटे लावले. साधारण १० व्या किंवा ११ व्या शतकातला तो काळ. त्याकाळच्या प्रचलित रूढी आणि परंपरांना काहीसा छेद देणारा, दुष्ट, अघोरी आणि दुराचारी तांत्रिकांचा उच्छेद करणारा आणि योगप्रधान असा नाथ संप्रदाय हळू हळू जनमानसावर पकड घेऊ लागला. विशेषतः नवनाथांनी निर्मिलेली शाबरी विद्या त्याकाळच्या  गरीब आणि अडल्या-नडल्या जनतेच्या मनात स्थान मिळवून गेली.

कोणताही संप्रदाय जेव्हा स्थापन होतो त्यावेळी तो बराचसा शुद्ध स्वरूपात असतो. त्याचं कारण असं की संप्रदाय स्थापणारे संस्थापक हे फार उच्च कोटीचे महात्मे असतात. परंतु काळानुसार संप्रदायाचा ह्रास होऊ लागतो. संप्रदायाच्या शिकवणीत भेसळ होऊ लागते. किंबहुना हे अपरिहार्यच आहे कारण संप्रदायातले सगळेच गुरु आणि त्यांचे शिष्य काही समान आध्यात्मिक पातळीचे असत नाहीत. प्रत्येक गुरु आपापल्या मताप्रमाणे, आपापल्या अनुभूतीप्रमाणे संप्रदायाची शिकवण प्रसारित करत असतो. त्यात आवश्यकतेप्रमाणे बदल किंवा फेरफारही करत असतो. काही वेळा हा बदल फायदेशीर ठरतो तर काही वेळा हा बदल त्रासदायक ठरतो. या फायद्या-तोट्याची एक लहानसे उदाहरण पाहू.

नाथ संप्रदाय सुरवातीच्या काळात योगप्रधान शैव दर्शनावर आधारित असा पंथ होता. त्यात भक्ती हे आवश्यक अंग जरी असले तरी तो भक्तिप्रधान मार्ग नव्हता. नंतरच्या काळात गहिनीनाथांनी त्यात कृष्णभक्ती मिसळून दिली. ज्ञानेश्वरांनी तोच वारसा पुढे चालवत वारकरी संप्रदायाची उभारणी केली. योगप्रधान नाथ संप्रदायात भाक्तीधारेचा हा संगम नक्कीच फायद्याचा ठरला. याउलट कथा शाबरी विद्येची. नाथ संप्रदायाच्या सुरवातीच्या काळात शाबरी विद्या अतिशय प्रभावी आणि शुद्ध स्वरूपात होती. कालांतराने शाबरी मंत्र अशुद्ध होत गेले. खऱ्या अर्थाने शाबरी मंत्र नसलेले मंत्र शाबरी मंत्र म्हणून खपवले जाऊ लागले. मूळ मंत्रांत नसलेले शब्द त्यात मिसळले जाऊ लागले. हा बदल अर्थातच संप्रदायाच्या दृष्टीने त्रासदायक ठरला. आधुनिक विज्ञानाने केलेली लक्षणीय प्रगती विचारात घेता कित्येक शाबरी मंत्रांची आज गरजच पडणार नाही ही वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.

मूळ नाथ संप्रदायाच्या स्थापनेनंतर मच्छिंद्रनाथांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला. हा वटवृक्ष एवढा विस्तारला आणि विस्कळीत झाला की गोरक्षनाथांना हस्तक्षेप करून संप्रदायाची पुनर्बांधणी करावी लागली. त्यांनी नाथ संप्रदायातील उप-पंथ बारा प्रकारांत विभागले :

१. सत्यनाथी २. धर्मनाथी ३. दरियानाथी ४. आईपन्थी ५. रामनाथी ६. वैराग्यपंथी ७. कपिलानी ८. गंगानाथी ९. मन्नाथी १०. रावलपंथी ११. पावपंथी १२. पागलपंथी

आजही भारतभर या बारा पंथांची पीठे आहेत. त्यांच्या गुरु परंपरा आहेत. नाथ गुरूंचे अनेक प्रकार असतात जसे चोटी गुरु, चीरा गुरु, टोपा गुरु, मंत्र गुरु, विभूती गुरु वगैरे. या उप-पंथांमध्ये बरेच साम्य आहे आणि काही भेदही आहेत. नाथ संप्रदायाच्या भरभराटीच्या काळात अनेक हौशीगौशी साधक संप्रदायात प्रवेश करू लागले. त्यांना अटकाव करण्यास गोरक्षनाथांनी मुद्रा धारण विधीची कडकपणे अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. मुद्रा धारण विधीमध्ये नवीन साधकाचे कान फाडून त्यांमध्ये धातूच्या किंवा मातीची कुंडले घातली जातात. त्यांना मुद्रा म्हणतात. मुद्रा घालताना कान फाडला जात असल्याने फार वेदना होतात. जो साधक खरा आहे तोच मुद्रा धारण करण्याचे धैर्य दाखवू शकतो ही संकल्पना त्यामागे होती. उत्तर भारतात अशा नाथ योग्यांना "कानफाडे जोगी" म्हणून ओळखले जाते.

गोरक्ष कालीन नाथ संप्रदायाच्या वेशभूषेत कंथा, चोला, शैली, शृंगी, झोळी, कुबडी, फावडी वगैरे गोष्टींचा समावेश असे. आजकाल असा "नाथपंथी बाणा" फारसा प्रचलित नाही. आजकाल नाथ संप्रदायाचे वरील पिठांशी निगडीत असलेले दिक्षित योगीसुद्धा बाकीच्या गोष्टीना फाटा देऊन भगवी कफनीच परिधान करताना दिसतात. असेच कालसापेक्ष बदल इतर अनेक गोष्टींत झालेले आढळून येतात. आज ह्या उप-पंथांची अवस्था काहीशी विस्कळीत आणि मुख्य लोकाप्रवाहापासून अलिप्त अशी झाली आहे. तामसी, उग्र, व्यसनी आणि अर्वाच्य भाषा तोंडी असलेले पाखंडी लोकं खोट्या अभिमानाने नाथ पंथी म्हणून वावरताना दिसतात. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आजही नाथ संप्रदाया विषयी समज-गैरसमज घर करून आहेत.

असो. तर सांगायचा भाग असा की असे बदल होत होत आजचा नाथ संप्रदाय काहीशा क्लिष्ट आणि सर्वसामान्यांना आचरणात आणण्यास अशक्यप्राय अशा अवस्थेत येऊन पोहोचला आहे. स्वतः गोरक्षनाथांनी बाह्य वेशभूषा आणि दिखाऊपणा यांचा वारंवार कडक शब्दात निषेध केला आहे. नाथ संप्रदायाचा मूळ गाभा हा योगप्रधान आहे. त्यात कर्मकांड, पूजापाठ, तीर्थयात्रा यांना अगदी मर्यादित स्थान आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आजकाल बहुसंख्य नाथ भक्त कर्मकांडातच अडकलेले दिसतात. निव्वळ नवनाथ पोथी वाचणे किंवा नाथ सामाध्यांना भेटी देणे म्हणजे काही नाथ संप्रदायाचे अनुयायी होणे नव्हे. भारतातील नाथ पिठांकडून विधिवत दिक्षा घेणे हा ही केवळ एक सांप्रदायिक उपचार आहे. खरा अनुयायी नाथ संप्रदायाची शिकवण अंगी बाणवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो.

आता वरील विवेचन वाचून तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की मग शहरी भागात राहणाऱ्या आणि आधुनिक जीवनशैली अंगिकारलेल्या साधकाने कोणती शिकवण अंमलात आणावी? ह्या प्रश्नाचे उत्तर खरंतर या छोट्या लेखात सामावू शकणार नाही. तरीही येथे काही महत्वाच्या मुलतत्वांचा संक्षिप्त उल्लेख करत आहे.

 • नाथ योग्याचे उद्दिष्ट अद्वय आनंदाची / परमपदाची प्राप्ती हे असले पाहिजे.
 • पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी हा सुप्रसिद्ध नाथ सिद्धांत आहे.
 • दैनंदिन आयुष्यात खालील जीवनमूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे :

  - 'नाथ', 'अवधूत', 'अलख निरंजन', 'आदेश' आणि 'अद्वय' ह्या सांप्रदायिक संकेतांवर निस्सीम श्रद्धा.
  - जप, अजपा आणि अन्य गुरुप्रदत्त साधना मार्गाचे नित्यनेमाने आचरण.
  - मिताहार आणि ब्रह्मचर्य यांचे पालन.
  - दया, क्षमा, शांती आणि समाधान.

 • नाथ योग हा कुंडलिनी योगमार्गाचेच स्वरूप असून त्यांत मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग यांचा समावेश होतो. यांच्या एकत्रित अभ्यासाला महायोग म्हणतात.
 • मंत्र हा सात्विक आणि चेतन असावा. मंत्राचा जप शास्त्रानुसारच करावा. वाटेल तशा प्रकारे केलेला जप निष्फळ ठरतो किंवा अर्धवट फळ देतो.
 • नाथ संप्रदायात गुरूला अत्यंत महत्व आहे. भगवान शिव, दत्तात्रेय अवधूत, नवनाथ आणि चौरांशी सिद्ध यांच्या विषयी आदर आवश्यक आहे. आपापल्या गुरुपरंपरेविषयी श्रद्धा असल्याशिवाय कोणतीही साधना पूर्णत्वास जात नाही. हे त्रिवार सत्य आहे. खोटेपणा आणि दिखाऊ गुरुभक्तीला नाथ संप्रदायात स्थान नाही.
 • नाथ संप्रदाय जातपात, लिंगभेद, उच्च-नीच वगैरे गोष्टी मानत नाही. साधकाचे आचरण त्यानुसारच असावे.
 • प्रत्येक साधकाने अजपा साधना अवश्य केली पाहिजे.
 • नाथ संप्रदायात पौर्णिमा, अमावस्या आणि अन्य काही अशा विशिष्ठ दिवशी नवनाथांची महापूजा, महाप्रसाद असे विधी केले जातात. आवड असल्यास कर्मकांडाचा अतिरेक होऊ न देता ते करावयास काहीच हरकत नाही.
 • जीवब्रह्म सेवा हा नाथ सम्प्रदायाचा महत्वाचा भाग आहे. ऐपत असेल त्या प्रमाणे आणि शक्य असेल त्या प्रकारे दिनदुबळ्यांची सेवा अवश्य करावी.
 • नवनाथांच्या रंजक वाटणाऱ्या चरित्रकथांच्या पलीकडे जाऊन नाथ संप्रदायाच्या आधारभूत ज्ञानगर्भ ग्रंथांचे - जसे भावार्थ दीपिका, अवधूत गीता - अध्ययन करावे.

नवीन वर्ष लवकरच सुरु होत आहे. भगवान आदिनाथ तुम्हा सर्वाना नाथ संप्रदायाची शुद्ध शिकवण अंगीकारण्याची सदिच्छा प्रदान करो हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 28 December 2015


Tags : योग अध्यात्म हठयोग मंत्रयोग लययोग राजयोग कुंडलिनी साधना नाथ