Untitled 1

योग्यासाठी तपश्चर्या आवश्यक

मच्छिंद्रनाथांनी बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपाचरण केले. योग्य वेळ आल्यावर त्यांची आणि भगवान दत्तात्रेयांची गाठ पडली. दत्तात्रेयांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना दीक्षा दिली आणि सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या. गंमत बघा की खरंतर मच्छिंद्रनाथ म्हणजे अवतारी सत्पुरुष. मच्छिंद्रनाथांनी आपल्या जन्मापूर्वीच मच्छीच्या पोटातूनच गुढातीगुढ आणि योगीगम्य असे शंकर-पार्वती संभाषण श्रवण केले होते. त्याचे आकलनही त्यांना झाले होते. परंतु तरीही त्यांनी तब्बल बारा वर्षे तपाचरण अंगिकारले.

आता त्यांच्याच शिष्योत्तमाचे उदाहरण घ्या. ज्या विद्या भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना प्रदान केळ्या होत्या त्या सर्व विद्या त्यांनी गोरक्षनाथांना शिकवल्या. गोरक्षनाथ तेंव्हा बारा वर्षांचे होते. आपल्या गुरूने दिलेले ज्ञान त्यांनी लीलया आत्मसातही केले होते. परंतु मच्छिंद्रनाथांना असं लक्षात आलं की एवढी प्रकांड विद्या आत्मसात करूनही गोरक्षनाथांच्या ज्ञानाचा प्रकाश म्हणावा तसा लखलखीत झळकत नव्हता.

भगवान दत्त्तत्रेयांनी दिलेली विद्या जी मच्छिंद्रनाथांना मिळाली तीच गोरक्षनाथांनाही मिळाली. मग त्यात न्यूनत्व कुठे आले? गोरक्षनाथांची विद्या प्रखरपणे झळाळत का नव्हती? या प्रश्नांची उत्तरे मच्छिंद्रनाथांना एक दिवस मिळाली. भारतभर तीर्थे भ्रमण करत करत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ बद्रीकारण्यात पोहोचले. भगवान शंकरापुढे नतमस्तक होऊन तेथेच काही काळ विसावले.  क्षेमकुशल विचारल्यावर भगवान शंकर मच्छिंद्रनाथांना म्हणाले - "हे बघ. तू गोरक्षबाळाला सर्व विद्यांत पारंगत केले आहेस ते योग्यच आहे. त्यानेही सर्व विद्या आत्मसात केलेल्या आहेत. परंतु त्याच्या हातून कोणतेही तपाचरण घडलेले नाही. जोवर योग्याच्या हातून तपश्चर्या घडत नाही तोवर त्याच्या ज्ञानाला झळाळी येत नाही. तू त्याला माझ्याकडे तपश्चर्येला बसव आणि खुशाल तीर्थाटनाला जा. मी त्याची सगळी काळजी घेईन."

मच्छिंद्रनाथांना जे प्रश्न पडले होते त्यांची उकल झाली होती. तपश्चर्येशिवाय गोरक्षनाथांच्या ज्ञानाला झळाळी कदापि येणार नाही हे त्यांना कळून चुकले. गोरक्षनाथांचे वय लहान त्यामुळे कनवाळू मच्छिंद्रनाथांनी त्याला कठोर तपाचरण करायला लावले नव्हते. आता प्रत्यक्ष आदिनाथ "मी त्याची काळजी घेईन" असे सांगत असल्यामुळे त्यांना हायसे वाटले. पुढे गोरक्षनाथांनी बारा वर्षे उग्र तपश्चर्या केली आणि आपल्या ज्ञानाच्या प्रखर तेजाने अवधा भारत नाथ-विज्ञानाने उजळून काढला.

नवनाथांची चरित्रे अभ्सासल्यास आपल्याला असे आढळून येते की अवतारी आणि अयोनीसंभव असूनसुद्धा त्यांनी बारा वर्षे कठोर तपाचरण केलेले होते. हे सगळं सांगण्याचे तात्पर्य हे की अजपा योगसाधकांनी देखील हा आदर्श घेणे गरजेचे आहे. अष्टांग योगातील यम-नियमांत तपाचा अंतर्भाव केलेला आहे तो त्याचकरता. आजकाल अध्यात्माविषयी पोकळ बडबड अनेक लोकं करताना दिसतात. स्वतःच्या साधनेची बैठकही अजून नीट बसलेली नाही तोच दुसऱ्याला पुस्तकी ज्ञान पढवायला तयार. जो खरा साधक आहे त्याने अशा प्रकारच्या वर्तनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. साधकाने सर्वप्रथम साधनेवर आणि तपाचरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

नाथ पोथीत एके ठिकाणी छान सांगितलंय -

परी अंतरी पात्र कच्चेपणीं । वरी रंग दावी लखलखोनी ।
जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानीं । परी अंतरीं हिंगो ॥
बोलतां ज्ञानी विशेष । कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास । 
ऐसें भासलें तरी ओंफस । परी अंतरीं हिंगो ॥

एखादे कच्चं मडकं रंगरंगोटी करून लखलखीत केलं तरी ते जोवर ते भट्टीत नीट भाजलं जात नाही तोवर कच्चं ते कच्चंच रहातं. त्याचप्रमाणे एखादा कच्चा योगमार्गी वरकरणी कितीही म्हणाला की "मी ज्ञानी आहे" तरी ते शेवटी बोलाची कढी आणि बोलाचाच भात.

येऊ घातलेलं दिपवाळीचं पर्व सर्व वाचकांच्या साधनामार्गाला लक्ख उजळून काढो अशी प्रार्थना आदिनाथाच्या चरणी करून लेखणीला येथेच विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 01 November 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates