Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

ध्यात्म, श्रावण आणि शिवभक्ती

मी जेव्हा सॉफ्टवेअर कंसल्टंट होतो तेव्हा माझे मित्र, सहकारी आणि माझ्याकडे प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी मला माझ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्किल्सचे रहस्य विचारत. मी त्यांना सांगत असे की यात रहस्य वगैरे काही असेलच तर ते हे की मी योगजीवन जगणारा आध्यात्मिक वृत्तीचा माणूस आहे. माझ्या उत्तराने ते गोंधळून जात. मग मी सांगत असे की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटकडे व्यक्क्तिगत दृष्टीने बघता. माझं काम, माझा प्रोग्रॅम, माझ्या प्रोजेक्ट डेडलाईन्स असे करत रहाता. तुमचा प्रोग्रॅम हा संपूर्ण प्रणालीचा केवळ एक छोटा भाग आहे हे अनेकदा विसरले जाते. योग्याला व्यक्तिगत दृष्टीबरोबरच 'परमेश्वराच्या दृष्टीने' जगाकडे पहण्याची कला अवगत असते. जेव्हा या दृष्टीने तुम्ही जगाकडे पहाता तेव्हा तुम्हाला टिम वर्क म्हणजे काय ते खर्‍या अर्थाने कळून येईल. टिम वर्कच्या वर्कशॉप्सना जाऊन ते कळणार नाही. मग हे जग असं का, या जगात एवढी दुःख का आहेत, या जगात आपली भुमिका काय आहे, आपले काम जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे, तसे न केले तर काय होईल, हारजीत सारखीच मानूनही जिद्दीने कसे कार्यरत होता येईल, कर्म करो फल कि चिंता मत करो हा नक्की काय प्रकार आहे हे सारे यथास्थित कळून येईल.  टॉनिक एखाद्या विशिष्ठ रोगासाठी नसतं पण ते घेतलं की रोगनिर्मुलनाच्या शक्तीत वाढ होते परिणामी कोणताही रोग नाहिसा होतो. योगसाधनेचेही अगदी असेच आहे. एकदा योग-अध्यात्मरूपी टॉनिक तुम्ही घेतलत की मग आयुष्यातील सर्व स्थरांवर तुम्हाला ते उपयोगी पडतं. माझी ही योग-अध्यात्म टॉनिकची रेसिपी काहींना कळत असे अनेकांना कळत नसे. असो.

अध्यात्म या शब्दाचा अर्थ आत्म्यावर आधारीत वा आत्म्याशी निगडीत असा आहे. याचाच अर्थ अध्यात्म हा 'आतील' विषय आहे. पण सुरवातीला बहुतेकांना एकदम 'आत' डोकावणे जमत नाही. त्यांना 'बाहेरून' आत असाच प्रवास करावा लागतो. देव न मानणं, देवळात जाण तर सोडाच पण देवाला साधा नमस्कारही न करणं, जुन्या परंपरांना त्या समजूनही न घेता नावं ठेवणं इत्यादी गोष्टींत आज लोकं धन्यता मानू लागले आहेत. देव असलाच तर तो मनात असतो देवळाच्या चार भिंतीत नाही त्यामुळे आम्हाला देवळात वैगरे जायची, देवाच्या तसबिरीला हार फुले वाहण्याची जरूरच नाही असाही एक युक्तीवाद काही लोकं करताना दिसतात. धर्मात सांगितलेल्या नाना देवदेवता ही निव्वळ प्रतिके असून खरा परमेश्वर निर्ग़ूण-निर्वीकार आहे. तेव्हा एका विशिष्ठ दगडाच्या वा धातूच्या आकाराला काहितरी नाव देवून पुजण्यात काही शहाणपण नाही असेही मत आपण एकतो. आस्तिक्य हा योगशास्त्राचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणूनच यम-नियमांमधे त्याचा समावेश केलेला आहे. नवख्या योगसाधकाला परमेश्वर, त्याची प्रतीकं, बाह्य उपचार याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. नवख्या साधकाच्या अवतीभोवती जर नास्तिक वातावरण असेल तर तो गोंधळून जाण्याची शक्यता असते. अशावेळी वरील मुद्द्यांविषयी सुस्पष्ट कल्पना असेल तर फायद्याचे ठरते.

या जगाची तुलना करायची तर ती फिशटॅंकशी करता येईल. फिशटॅंकमधे राहणारे मासे त्या टॅंकलाच जग समजत असतात. त्याना वाटत असतं की आपणच या जगाचे राजे आहोत. आपण कुठेही आपल्या मर्जीनुसार बागडू शकतो, खाऊ शकतो, पाणवनस्पतींचा जंगलात मुक्तपणे विहार करू शकतो, हवे तेथे सूर मारू शकतो. आपण तर आपल्या मर्जीचे मालिक आहोत. पण ते हा विचार करत नाहीत की हे पाणी कोठून आले? ते नेहमी स्वच्छ कोण ठेवते? ह्या वनस्पती, हे अन्न आपल्याला कोणी दिले? जर त्या फिशटॅंकच्या मालकाने त्याची काळजी घेणे सोडले तर? काही काळ पर्यंत ते मासे आपल्या तथाकथित सामर्थ्यावर तग धरतील हे खरे पण त्यानंतर? मानवाचेही काहिसे असेच नाही का? विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानवी आयुष्यातील दुःखे काहीकेल्या कमी होत नाहीत. त्यांचे स्वरूप बदलते एवढेच. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी छान म्हटले आहे, "सुखे गणितीश्रेणीने वाढतात (म्हणजे 1, 2, 3... अशी) तर दुःखे भौमितीक श्रेणीने वाढतात (म्हणजे 2, 4, 8... अशी)". आजच्या जीवनात विज्ञानाचा उपयोग नक्कीच आहे त्यात दुमत असण्याचे कारणच नाही पण विज्ञान 'अहंकार' बनणे बरोबर नाही. आजच्या विज्ञानाची आणि वैज्ञानिकांची जणू अशी महत्वाकांक्षा आहे की एक दिवस परमेश्वर करत असलेली सर्व कार्ये स्वतःच्या ताब्यात घ्यावीत आणि आपणच परमेश्वर व्हावे. जरा शांत डोक़्याने विचार केलात तर तुम्हाला असे आढळेल की प्राचीन योगीही तुम्हाला हेच सांगत आहेत. योगी म्हणतात जीवाला शिवात विलीन करा. यालाच वेदांती सोहं (मी आणि परमेश्वर एकच आहोत) भाव म्हणतात. तुम्ही आणि परमेश्वर एक झालात म्हणजे तुम्ही परमेश्वरच नाही का झालात? योगग्रंथात अनेक ठिकाणी समाधीस्थित योगी काळावर जय मिळवतो, अमर बनतो, साक्षात परमेश्वर बनतो असे जे म्हटले आहे ते याच अर्थाने. फरक एवढाच आहे (आणि तो अत्यंत महत्वाचा आहे) की एक मार्ग अहंकारयुक्त आहे तर दुसरा शरणागतीयुक्त. एक मार्ग बाहेरचा आहे तर एक आतला.

देव भक्ताच्या हृदयात वा मनात रहातो हे अगदी 100% बरोबर आहे. पण या माणसांनी आपले स्वतःचे मन प्रामाणिकपणे कधी पाहिलेय? काम, क्रोध, अहंकार, असंख्य वासना यांनी त्यांच्या मनात एवढी गर्दी केली आहे की परमेश्वराला रहायलाच काय पण पाय ठेवायलासुद्धा जागा नाही! जर एकाद्या योग्याने असे विधान केले तर ते समजण्यासारखे आहे कारण योगीजनांनी स्वतः तसा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो पण सामान्य साधकाची मनोभूमी सुरवातीच्या काळात तरी तयार झालेली नसते. त्याला बाह्य उपचारांची गरज लागतेच. अध्यात्मशास्त्रात मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. आधीच हे मनरूपी माकड चंचल त्यात ते विषयवासनांची दारू प्यायलेले. हे कमी म्हणून की काय त्याला अहंकाररूपी विंचू डसलेला. मग हे माकड काय धुडगूस घालत असेल याची कल्पना सुज्ञ वाचक नक्कीच करू शकतील. सर्वसामान्य माणसाचे मन हे असे असते. या मनाला वळण लावण्याकरता प्रत्येक धर्मामधे काही उपाय सुचवलेले आहेत. 'योग धर्मा' मधे सांगितलेली आस्तिकता, पूजापाठ, व्रतवैकल्ये, जपतप, भजन-किर्तन ही याच उपायांचा एक भाग आहेत.

राहिला प्रश्न मुर्तीपुजेचा वा सगुणोपासनेचा. समजा मी तुम्हाला असे सांगितले की मी तुम्हाला एक अशी गोष्ट देणार आहे ज्यामधे एक लाकडी मोठी फळी आहे, चार खांब आहेत, एक छोटी फळी आहे, चार रबरी वॉशर आहेत, चार छोट्या आकाराच्या नळ्या आहेत आणि एक कमानीची नक्षी आहे. सांगा बरं मी तुम्हाला काय देणार आहे? तुम्ही छातीठोकपणे नाही सांगू शकणार. पण जर मी तुमच्यापुढे एका खुर्चीचे चित्र धरले आणि सांगितले की मी तुम्हाला या चित्रातील वस्तू देणार आहे तर तुम्हाला चटकन माझे म्हणणे समजेल. परमेश्वर निर्गूण निराकार आहे हे खरे पण परमेश्वराला निर्गूणरूपात पकडणे भल्याभल्या योग्यांनाही जड जाते तेथे सामान्य माणसांची काय कथा. मानवी मनाला नाम आणि रूप यांची सवय झालेली असते कारण भौतिक जगात सर्वत्र आपण त्यांचाच वापर करतो. आपल्याकडे देवदेवतांची सगूण उपासना लोकप्रिय आहे ती यामुळेच. 'योग धर्मा' मधे व्यक्ती तितक्या प्रकृती हे तत्व प्राचीनकाळापासून अंगिकारलेले दिसून येते. म्हणूनच काही भक्तांचे प्रतीक 'वैभवशाली' असते तर काहींचे 'वैराग्यशाली' तर काहींचे 'मातेसारखे प्रेमळ'. तात्पर्य हे की नवख्या साधकाने प्रतिकोपासनेपासूनच सुरवात करणं त्याच्या हिताचे आहे.

काही लोकं अशी असतात की कितीही पटणारे आणि सत्यनिष्ठ स्पष्टीकरण द्या ते आपले तेचं खरे असे वागतात. असं म्हणतात की आपल्याला किर्तनाला जायचे नसेल तर जावू नये पण निदान दुसरा जात असेल तर त्याला डवू नये. ज्याना 'येन केन प्रकारेण' परमेश्वराचे अस्तित्व नाकारायचेच असेल त्यांनी निदान इतरांची श्रद्धा तरी मोडू नये. ज्या नवख्या साधकांना भक्तीमार्गात प्रगती करायची आहे त्यांनी अशा नास्तिकांशी चर्चा तर सोडाच पण त्यांच्या वार्‍यालाही उभे राहू नये (हे द्वेशाने वा तिरस्काराने नव्हे तर आपल्या मनाचा पोत बिघडू नये या हेतूने). एकदा भक्ती मनात घट्ट रुजली की मग काही फरक पडणार नाही पण तोवर काळजी घेतली पाहिजे.

असो. तर हे सर्व मी तुम्हाला सांगण्याचे कारण असे की पुढच्या महिन्यापासून श्रावण सुरू होत आहे. यावर्षी ऑगस्ट 10 ते सप्टेंम्बर 8 या काळात श्रावण आहे. देवदानवांनी समुद्रमंथन केले ती कथा तुम्हाला माहित असेलच. तर त्या समुद्रमंथनाच्यावेळी चौदा रत्ने बाहेर पडली. हलाहल नामक विषही त्यात होते. हे विष सहन करण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते. मग सर्व देव श्रीशंकराकडे गेले. सदाशिवाने अत्यंत कृपाळूपणे सर्व देवांना वाचवण्याकरता ते स्वतः प्राशन केले. असे म्हणतात की ते पोटात जाण्याआगोदरच पार्वतीने शंकराचा कंठ धरून ते तेथेच अडवले. मग शंकराने ते कंठातच पचवून टाकले. पण त्या विषाच्या प्रभावाने त्याचा कंठ कायमचा निळा झाला (कुंडलिनी योगसाधकांनी कंठ, विशुद्धीचक्र, पार्वतीने विष अडवणे, कंठात पचवणे या सर्वातील योगशास्त्रीय गूढ संबंध लक्षात घ्यावा). प्राशन केलेल्या हलाहल विषामुळे शंकराच्या शरीराचा दाह होऊ लागला. त्याने शितलता मिळवण्यासाठी डोक्यावर चंद्र धारण केला (कुंडलिनी योगसाधकांनी योगग्रंथातील सहस्रारचक्रातील शीतल अमृताचा उल्लेख आणि चंद्र यातील गूढ संबंध लक्षात घ्यावा). सर्व देवांनीही शंकराला थंड गंगाजल प्राशन करवले. तेव्हापासून शंकराला जल अर्पण करण्याची प्रथा पडली. हा सर्व प्रसंग श्रावण महिन्यात घडला. थोडक्यात काय तर श्रावण हा शंकराचा महिना. शिवभक्तांसाठी अतिशय महत्वाचा. श्रावणात शिवमंदिरे गजबजतील, भक्त (विशेषतः स्त्रिया) सोमवार व्रत, प्रदोष व्रत अशी व्रते करतील. रूद्र, शिवमंत्र आणि शिवस्तोत्रांचे घोष होतील. ज्यांना शंकराला उपास्य दैवत मानून योगजीवनाची सुरवात करायची असेल त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. शिव भोळा, आषुतोष (लवकर प्रसन्न होणारा) म्हणून प्रसिद्धच आहे. तेव्हा नवीन साधकांसाठी हा मुहूर्त चांगला आहे. तेव्हा इच्छुकांनी तयारीला लागावे. या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात इच्छुकांची शिवभक्ती वाढावी म्हणून काही शिवलीला कथारूपाने वर्णन करण्याचा विचार आहे. आशा आहे भक्तांना त्या आवडतील.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 05 July 2010


Tags : शिव साधना कथा लेखमाला भक्ती नाथ