Ajapa Dhyana and Kriya : Online guidance and initiation sessions by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

अजपा ध्यानाचा प्राण आणि अपान यांच्याशी असलेला संबंध

सृष्टीत सर्वत्र आपल्याला परस्पर विरोधी अशा जोड्या आढळून येतात. खालील काही उदाहरणे पहा :

१. दिवस आणि रात्र

२. सुष्ट आणि दुष्ट

३. दैवी आणि राक्षसी

४. शिव आणि शक्ती

५. पुरुष आणि स्त्री

६. शुभ्र आणि कृष्ण

७. धन भार (positive) आणि ऋण भार (negative)

आता या जोडगोळ्या ज्या घटकांनी बनलेल्या आहेत त्या घटकांची चांगले किंवा वाईट अशी विभागणी कधी करता येते तर कधी ती करता येत नाही. उदाहरणार्थ, दैवी गुण आणि राक्षसी गुण यांमध्ये अर्थातच दैवी गुण हे श्रेष्ठ आणि अंगीकारण्यास योग्य असतात तर राक्षसी गुण निषिद्ध आणि त्याज्य असतात. परंतु शिव आणि शक्ती यांबाबत असे म्हणता येणार नाही. शिव आणि शक्ती हे दोन्ही चांगलेच घटक आहेत. फक्त ते गुणधर्मानी परस्पर विरुद्ध आहेत इतकेच. हाच प्रकार पुरुष आणि स्त्री, शुभ्र आणि कृष्ण रंग यांबाबतीतही आहे. तात्पर्य हे की या जोडगोळ्या परस्पर भिन्न गुणधर्म आणि पोलॅरीटी दर्शवतात. त्यांतील दोनही घटक आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत आणि आवश्यकही आहेत.

योगशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर अजून एक अशीच जोडगोळी प्रसिद्ध आहे. त्या जोडगोळीची थोरवी अशी की ती जीवाला जन्म-मृत्युच्या आणि सुख-दु:खाच्या सापळ्यात फिरत ठेवते. ती जोडगोळी म्हणजे - प्राण आणि अपान. नाथ संप्रदायात प्राणायाम या साधना प्रकाराला अत्याधिक महत्व आहे कारण प्राणायामाचे उद्दिष्ट या प्राण आणि अपान नामक विरुद्ध शक्तींना एकत्र करून त्यांचे सामरस्य घडवण्यात आहे. शरीरात प्राण शक्ती अनेक प्रकारे कार्य करत असते. खरंतर शरीराची सर्व कार्ये प्राण शक्तीच्या आधारानेच चालत असतात. या प्राण शक्तीच्या विविध रूपांमधील पाच महत्वाची मानली जातात ज्यांना पंचप्राण असं म्हणतात. त्या पाचांमध्ये दोन रूपं अतिशय महत्वाची आहेत ती म्हणजेच प्राण आणि अपान. प्राण आणि अपान ही एकाच जैविक शक्तीची परस्पर विरुद्ध रूपे आहेत. प्राणाचे प्राधान्य शरीराच्या वरील बाजून आहे जसे फुफुसे, छाती वगैरे तर अपानाचे प्राधान्य गुद प्रदेशात म्हणजे मुलाधार चक्राच्या जवळ आहे. ह्या दोन शक्ती सदैव कार्यरत असतातच पण त्या एकमेकींना जणू तोलून धरत असतात. त्यांच्या ह्या गतीमुळेच जीव आयुष्य आणि सुख-दु:ख भोगत असतो.

नाथ संप्रदायाचे प्रसिद्ध सिद्ध श्रीगोरक्षनाथ यांनी गोरक्षशतक या ग्रंथांत प्राण आणि अपान यांचे वर्णन फार छान केले आहे. गोरक्षनाथ म्हणतात :

प्राणापानवशो जीवो ह्यधश्चोर्ध्वं च धावति ।
वामदक्षिणमार्गेण चञ्चलत्वान्न दृश्यते ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की प्राण आणि अपान यांच्या ताब्यात असल्यामुळे जीव वर आणि खाली धाव घेतो. वर म्हणजे नासिकेपर्यंत आणि खाली म्हणजे मुलाधारापर्यंत. हा प्राणांचा खेळ उजव्या आणि डाव्या नासिकाग्राच्या मार्गांनी अर्थात इडा आणि पिंगला मार्गाने होत असतो. प्राण-अपानाची ही चंचलता अतिशय सूक्ष्म पणे घडत असल्याने लक्षात येत नाही.

आक्षिप्तो भुजदण्डेन यथोच्चलति कन्दुकः ।
प्राणापानसमाक्षिप्तस्तथा जीवो अनुकृयते  ॥

ज्याप्रमाणे चेंडूला काठीने जमिनीवर फटका मारला तर तो परत उसळी घेतो त्याप्रमाणे प्राण आणि अपानाचे कार्य चालते. जीव हा असहाय्य पणे या दोघांच्या मागे धावत असतो.

रज्जुबद्धो यथा श्येनो गतोऽप्याकृष्यते पुनः ।
गुणबद्धस्तथा जीवः प्राणापानेन कृष्यते ॥

ज्याप्रमाणे दोरीने बांधलेला ससाणा जर उडून गेला तर त्याला दोरी खेचून परत आणले जाते त्याचप्रमाणे तम-राज-सत्व या तीन गुणांनी बांधलेला जीव प्राण आणि अपानाच्या शक्तीने ओढला जातो. प्राण आणि अपानाला गती घेण्यासाठी (म्हणजे जीवाला जन्म घेण्यासाठी) काहीतरी आदीकारण लागते. ते कारण म्हणजे जीवाची पूर्वकर्मे. मानवी कर्मे त्रिगुणांच्या गुणदोषांनी युक्त असतात आणि त्यांनुसार जीव सुख-दु:ख भोगतो.

अपानः कर्षति प्राणः प्राणोऽपानं च कर्षति ।
ऊर्ध्वाधः संस्थितावे तौ यो जानाति स योगवित् ॥

अपान प्राणाला खेचतो तर प्राण अपानाला खेचतो. हे दोघे वर (छाती, फुफुसे वगैरे) आणि खाली (गुद किंवा मुलाधार प्रदेश) असतात. जो या दोघांना यथार्थपणे जाणतो तोच खरा योग जाणणारा होय.

योगशास्त्रातील प्राण आणि अपानाचे महत्व हे असे आहे. काहींचा असा समज होईल की त्याना जाणणे हे फार सोपे काम आहे. पण तसे समजणे सपशेल चुकीचे ठरेल. निव्वळ पुस्तकी वाचनाने किंवा तार्किक चर्चा किंवा निरुपण करून प्राण आणि अपानाच्या सूक्ष्म स्वरूपाला यथार्थपणे जाणणे सर्वथा अशक्य आहे.

आता प्राण आणि अपानाला कसे जाणायचे? अजपा योग हा या दोघांना जाणण्याचा सर्वात प्रभावी, अचूक आणि निर्धोक मार्ग आहे. अजपा साधनेत श्वास आणि प्रश्वास यांच्या नैसर्गिक गतीचा वापर एका विशिष्ठ प्रकारे केला जातो. श्वास ही प्राणाची अभिव्यक्ती आहे तर प्रश्वास ही अपानाची अभिव्यक्ती आहे. अजपा साधनेची दीर्घकाळ कास धरल्याने हळूहळू प्राण आणि अपानाचे रहस्य उलगडू लागते. प्राण आणि अपानावर अभ्यासकाचा ताबा चालू लागतो. कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि पंचप्राण आणि कुंडलिनी यांतील गूढ संबंधही स्पष्टपणे कळून येतो. हा अर्थातच अनुभवगम्य विषय आहे. सर्व योगसाधकांनी प्रत्यक्ष अजपा "क्रियायुक्त" होऊन अनुभव घ्यावा.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 Mar 2017