Untitled 1

मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग १

भारतीय अध्यात्मात वेदांना अनन्यसाधारण महत्व आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असा वेदज्ञानाचा वटवृक्ष अध्यात्माचा प्रधान स्त्रोत आणि मानबिंदू आहे. जाणकारांनी वेदांतील ज्ञानाची विभागणी कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड अशी केलेली आहे. त्यांतील ज्ञानकांड हा विशेष महत्वाचा भाग आहे कारण आध्यात्मिक साधनेची सांगता ब्रह्मज्ञानातच आहे. तेंव्हा आत्मा, आत्मज्ञान, ब्रह्म, ब्रह्मज्ञान, मुक्ती, मोक्ष वगैरे उच्च कोटीच्या गोष्टींचा निर्देश आणि उहापोह ज्ञानकांडात केलेला आहे. अशा या ज्ञानकांडात प्रामुख्याने उपनिषदांचा समावेश होतो.

येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की सर्व उपनिषदे काही एकाच कालखंडात निर्माण झालेली नाहीत. काही उपनिषदे अन्य उपनिषदांपेक्षा अधिक प्राचीन मानली गेली आहेत. मूळ उपनिषदे मोजकीच होती. कालांतराने त्यात अधिकाधिक उपनिषदांची भर पडत गेली असं मानलं जातं. आता प्रश्न असा की जी काही उपनिषदे त्या-त्या काळी निर्माण झाली त्यांतील अधिकृत किंवा महत्वाची कोणती मानायची? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच एका विशेष उपनिषदाची निर्मीती झाली. त्या उपनिषदाचे नाव आहे मुक्तिका उपनिषद. नावावरूनच तुम्हाला जाणवलं असेल की या उपनिषदाचा मुख्य विषय मुक्ती हा आहे. मुक्तिका उपनिषद प्रभू श्रीराम आणि भक्तशिरोमणी मारुती यांच्या संवादरूपाने आपल्यापुढे विषयाचे निवेदन करते.

एकदा मारुती श्रीरामाला विचारतो - "देवा, तुम्ही सत-चित-आनंद स्वरूप आहात. मला तुमचे खरे स्वरूप जाणून घेऊन मुक्त होण्याची अभिलाषा आहे. कृपया मला मुक्तीमार्गाचे ज्ञान प्रदान करा." यावर श्रीरामाने काय उत्तर दिले ते जाणून घेण्यापूर्वी क्षणभर थांबा. प्रश्न करणारा आणि त्या शंकेचे निरसन करणारा यांची अद्भुत पात्रता पहा! प्रश्न कोण विचारतो आहे तर अतुल पराक्रमी, बुद्धीमान, वेद-योग-शास्त्र यांचा प्रगाढ ज्ञाता, भक्तशिरोमणी असा मारुती आणि प्रश्नाला उत्तर कोण देणार आहे तर भगवान विष्णूचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम, रावणाचा संहार करणारा, ज्याच्या नामाने भगवान शंकराला होणारा हलाहल विषाचा दाह शमतो तो प्रभू श्रीराम. प्रश्न विचारणाऱ्याची योग्यता लक्षात घेता प्रश्नाचे उत्तर सोपे नसणार हे उघड आहे. भल्याभल्यांना चकवा देणारा हा प्रश्न आहे. येथे शिष्याच्या भूमिकेतून प्रश्न विचारणाऱ्या मारुतीची योग्यता फार मोठी आहे. पण असे असले तरी देवादिकांना सुद्धा ज्या प्रश्नाचे उत्तर कळत नाही तो प्रश्न त्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मुक्तिदाता परमेश्वरच सक्षम आहे हे उघड आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम सद्गुरूच्या भूमिकेतून आपल्या भक्ताला योग्य मार्गदर्शन करण्यास पुढे सरसावले.

प्रभू श्रीराम म्हणतात - "मी तुझ्या शंकेचे निरसन नक्कीच करीन. मी वेदांत ज्ञानात प्रतिष्ठित झालो आहे. वेद माझा श्वास आहेत. ज्याप्रमाणे तीळाच्या दाण्यांमध्ये तेल लपलेले असते त्याप्रमाणे वेदातील ज्ञान उपनिषदांमध्ये साठवलेले आहे. वेदांच्या असंख्य शाखा आहेत आणि त्यांतील प्रत्येक शाखेत उपनिषदे आहेत. वेदांत ज्ञानातील अर्थात उपनिषदांतील एका श्लोकाचे जरी अत्यंत भक्तिपूर्वक अध्ययन केले तरी भक्त मद्रूप होतो. "

हे उत्तर ऐकताच अल्पसे शंका निरसन झालेला शिष्य लगेच पुढची शंका उपस्थित करतो - "भिन्न-भिन्न मत असलेले ऋषी असं म्हणतात की मुक्ती एकाच प्रकारची आहे. काही म्हणतात की तुमचे नाम घेतल्यानेच मुक्ती प्राप्त होते तर काही म्हणतात की काशीला तारक मंत्राच्या जपाने मुक्ती मिळते. तर अन्य काही ऋषीगण योग, भक्ती, वेद्वाक्यांचे चिंतन इत्यादींची महती सांगतात. "

प्रभू श्रीराम शंका निरसन करतांना स्पष्ट करतात - "मुक्ती सालोक्य, सामीप्य, सारुप्य आणि सायुज्य अशा चार प्रकारची असते. परंतु त्याही पेक्षा कैवल्यमुक्ती श्रेष्ठ आहे. माझे नाम घेणारा कितीही पापी असला तरी सालोक्य मुक्ती प्राप्त करतो. काशी येथे प्राण सोडणाऱ्या माझ्या भक्ताच्या उजव्या कानात भगवान महेश्वर तारक मंत्र फुंकतात आणि त्याला सारुप्य नामक मुक्ती मिळते. सदाचार आणि पुण्यकर्मांत लिप्त राहून जो मी सर्वांमध्ये वास करणारा आत्मा आहे अशा भावनेने मला भजतात त्यांना सामीप्य नावाची मुक्ती मिळते. जे गुरुवाक्यावर श्रद्धा ठेऊन माझ्या शाश्वत स्वरूपाचे ध्यान करतात ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ज्याप्रमाणे किटक पतंगामध्ये रुपांतरीत होतो त्याप्रमाणे ते माझ्याशी एकरूप होतात आणि त्यांना सायुज्य नामक मुक्ती मिळते. मुक्तीचे हे चारही प्रकार माझ्या भक्तीने प्राप्त होणारे आहेत."

क्षणभर थांबा आणि प्रभू श्रीराम काय म्हणत आहेत ते नीट समजून घ्या. मी येथे मुद्दामच फार खोलात जाऊन अधिक निरुपण वगैरे करू इच्छित नाही किंवा फार पाल्हाळ लावू इच्छित नाही कारण विषय खुप लांबेल. दुसरं असं की साधनेची भक्कम बैठक नसेल तर हा विषय केवळ तार्किक, कोरडा आणि पुस्तकी वाटेल. त्यामुळे जुजबी ओळख होण्याच्या दृष्टीने जेवढे पुरेसे आहे तेवढेच विवरण येथे देत आहे.

श्रीरामाने असा निर्णय दिला आहे की मुक्तीचे प्रथम चार प्रकार त्याच्या भक्तीने प्राप्त होतात. साहजिकच प्रश्न हा उरतो की मग सर्वश्रेष्ठ असा जो पाचवा प्रकार ती कैवल्यमुक्ती कशी बरे प्राप्त होईल. यावर प्रभू श्रीरामाने साधकांच्या दृष्टीने अत्यंत विचारणीय असं काहीसं कोड्यात टाकणारं उत्तर दिलेलं आहे. श्रीराम म्हणतात - "त्यासाठी मांडुक्य उपनिषद पुरेसं आहे. जर त्यानेही मुक्ती प्राप्त झाली नाही तर दहा उपनिषदांचे अध्ययन करावे. जर त्यानंतर सुद्धा कार्य साधले नाही तर बत्तीस उपनिषदे वाचावीत. त्यानेही इप्सित साधले नाही तर एकशे आठ उपनिषदांचे अध्ययन करावे."

त्यानंतर श्रीरामाने एकशे आठ उपनिषदांची नावे सांगितली आहेत. विस्तारभयास्तव ती सगळी नावे येथे देत नाही. जाणकारांनी या एकशे आठ उपनिषदांचे वर्गीकरण सात विभागांत केलेलं आहे. ते सात विभाग खालील प्रमाणे :

१. मुख्य उपनिषदे

२. वेदांत उपनिषदे

३. योग उपनिषदे

४. संन्यास उपनिषदे

५. शैव उपनिषदे

६. शाक्त उपनिषदे

७. वैष्णव उपनिषदे

श्रीरामाच्या सांगण्यानुसार मांडुक्य उपनिषद अत्यंत महत्वाचे आहे हे उघड आहे. विचारणीय गोष्ट ही आहे की मांडुक्य उपनिषदात फक्त बारा श्लोक आहेत आणि त्यांमध्ये ओंकाराचे विविध प्रकारे वर्णन केलेले आहे.

श्रीरामाने सांगितलेला कैवल्यमुक्तीचा मार्ग उपनिषदांतून जात असला तरी तो वाटतो तेवढा सोप्पा नाही. मुळात उपनिषदांचे अध्ययन म्हणजे फक्त पुस्तकी वाचन बिलकुल नाही. अध्ययनात वाचन, गुरुमुखातून श्रवण, मनन, चिंतन, ध्यान अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

उपनिषदांतील ज्ञान आत्मसात करण्याचा उपाय कोणता? त्यासाठी काय करणे आवश्यक आहे? ध्यानयोगाचा आणि अजपाचा त्याच्याशी नक्की संबंध कसा येतो? विस्तारभयास्तव आज येथेच थांबतो. या सर्व गोष्टींविषयी श्रीरामाचा उपदेश पुढल्या वेळी थोडक्यात जाणून घेऊ.

असो.

कुंडलिनी स्वयमेव ज्ञानमयी आहे. इच्छा-ज्ञान-क्रिया शक्ती स्वरूपिणी आहे. तिच्या कृपेने उपनिषदांतील ज्ञानगर्भ उपदेश सर्व योगाभ्यासी साधकांना सुगम होवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 10 August 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates