Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

कुंडलिनी शक्ती - मानवी पिंडातील सुप्त अध्यात्म शक्ती

योगशास्त्राप्रमाणे मानवी पिंडातील पंचवीस तत्वे कोणती ते आगोदरच जाणून घेतले आहे. परमशिवापासून ते पृथ्वीतत्वापर्यंत जे सृजन होते त्याला योगशास्त्रात प्रसव असे म्हणतात. सृजनाचे कार्य संपल्यावर ईश्वरी शक्तीला काहीच कार्य उरत नाही. पण म्हणून ती शक्ती लोप पावत नाही. ती शरीरातच सुप्त रूपाने वास करते. या सुप्त शक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. कुंडलिनी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक अवश्य वाचा. वेब साईटच्या वाचकांसाठी येथे थोडक्यात विवेचन करत आहे.

कुंडलिनी या शब्दाचा अर्थ आहे वेटोळे घालून बसलेली. समजा तुमच्याकडे एक चटई आहे. जेव्हा त्या चटईची गरज नसेल तेव्हा तुम्ही काय कराल? तर ती गुंडाळून कपाटात ठेवाल. तसाच प्रकार शक्तीच्या बाबतीत होत असतो. सृजन करून झाले की शक्तीला काहीच काम नसते आणि ती गुंडाळून ठेवली जाते. मानवी शरीराचा विचार करता असे दिसते की वर उल्लेखलेले सृजन हे मेंदू ते पाय या दिशेने असे झालेले आहे. सृजन करताना इश्वरी शक्ती प्राणरूपाने जणू एखाद्या नलिकेतून गेल्यासारखी मज्जारज्जूमधून जाते. या नलिकेला योगशास्त्रात सुषुम्ना नाडी असे म्हणतात. सृजन करीत असताना या मुख्य नलिकेला असंख्य फाटे फुटतात. पाणी पुरवठा करणार्‍या एखाद्या जलवाहिनीला लहान-लहान नलिकांचे कसे जाळे असते, अगदी तसेच हे फाटे असतात. हे फाटे सुषुम्नेला जेथे फुटतात त्या जागांना चक्रे असे म्हणतात. अशी सहा महत्वाची चक्रे या शुषुम्नामार्गावर असतात. ही सहा चक्रे पाठीच्या कण्याच्या खालपासून ते भ्रुमध्यापर्यंत असतात. त्यांना अनुक्रमे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा अशी त्यांची नावे आहेत. सातवे चक्र, सहस्रार, हे मेंदूत असते. आधुनीक वैद्यकशास्त्राने शोधलेली Plexuses या चक्रांशी बरीच मिळतीजुळती आहेत. या चक्रांच्या शरीरावरील जागा खालीलप्रमाणे :

  • मूलाधार चक्र शिवणस्थानापासून दोन बोटे वर आतल्या बाजूस.
  • स्वाधिष्ठान चक्र जंननेंद्रियांच्या मागील बाजूस.
  • माणिपूर चक्र नाभीच्या मागील बाजूस.
  • अनाहत चक्र छातीच्या मध्यभागाच्या मागील बाजूस.
  • विशुद्धी चक्र कंठाच्या मागील बाजूस.
  • आज्ञा चक्र भ्रूमध्य स्थानाच्या आत मेंदूच्या मुळाशी.
  • सहस्त्रार चक्र मेंदूत.

कुंडलिनी म्हणजे काही दृश्य वस्तू नव्हे की जी चालू अथवा बंद करता येईल. ती एक शक्ती आहे. शक्ती जागृत करणे म्हणजे काय? समजा, एक लाकडाचा ओंडका आहे. त्यामधे अग्नि रुपी शक्ती अगोदरपासूनच अस्तित्वात आहे पण सुप्त स्वरूपात. ती सुप्त शक्ती तुम्ही जागृत कशी कराल? तर तुम्ही बाह्य अग्नीने त्या ओंडक्याला आग लावाल. कुंडलिनीचेही असेच आहे. निद्रिस्त कुंडलिनीला जागे करण्यासाठी योगरूपी अग्नी वापरावा लागतो. कुंडलिनी जागृतीचा सरळ अर्थ असा आहे की शरीरांतर्गत सुप्त ऊर्जेचे (Potential Energy) रूपांतर चल ऊर्जेमधे (Kinetic Energy) करणे. ही कार्यरत झालेली ऊर्जा मग शरीरमनावर परिणाम करण्यास सुरवात करते. माझ्या देवाच्या डाव्या हातीच्या वाचकांना या बाबतीतील माझा व्यक्तीगत अनुभव माहीत असेलच.

आपण आगोदर पाहीले की सृष्टीचे सृजन हे परमशिव ते पृथ्वीतत्व असे होते. जर परमशिवात विलीन व्हायचे असेल तर हा क्रम उलट दिशेने करायला हवा. म्हणजे पृथ्वी ते परमशिव असा प्रवास करायला हवा. या प्रवासाला प्रतिप्रसव असे म्हणतात. कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तिला सुषुम्नेमधून ऊर्ध्व मार्गाने नेले जाते. म्हणजेच तिचा प्रवास सृजनाच्या उलट्या मार्गाने होऊ लागतो. असा प्रवास सुरू झाला की लय सुरू होतो. जेवढा लय अधिक तेवढे परमाशिवापासूनचे अंतर कमी. अर्थात तेवढी आध्यात्मिक प्रगती जास्त. या प्रगतीची हुकमी खुण म्हणजे वैराग्य आणि मनोलय. जसजसे तुम्ही प्रगत व्हाल तसतसे तुमचे मन अधिकाधिक एकाग्र होत जाईल. चित्तवृत्ती क्षीण होत जातील आणि एक दिवस पूर्ण थांबतील. हीच समाधी.

कुंडलिनी अनेक प्रकारच्या साधनांनी जागृत करता येते जसे मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग, क्रियायोग, शक्तीपात आणि भक्तीयोग. अजपा साधना हा कुंडलिनी जागृतीचा सर्वात सोपा, पुर्णतः नैसर्गीक आणि निर्धोक असा उपाय आहे.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या नाथ संकेतीचा दंशु या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.