Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

शिवयोग अर्थात शिव-शक्ती सामरस्य

कर्मकांडात्मक उपासना, व्रतवैकल्ये, स्थुल पुजा हा आध्यात्म मार्गावरचा एक टप्पा असला तरी अशी कर्मकांडात्मक उपासना साधकाला आपल्या ध्येयाप्रत नेऊ शकत नाही. ते सामर्थ्य केवळ एकाच मार्गात आहे आणि तो मार्ग म्हणजे योगमार्ग. स्वतः भगवान शंकर शिवसंहितेत पार्वतीला सांगतात -

आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः।
इदमेकं सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम॥

सर्व शास्त्रांचे अवलोकन करून आणि त्यांवर वारंवार विचार करून हे सुनिश्चित आहे की योगशास्त्र हेच सर्वश्रेष्ठ मत आहे.

योग हा अत्यंत प्राचीन मार्ग आहे हे सर्वच तज्ञांनी पुराव्यांआधारे मान्य केलेले आहे. परंतु कालपरत्वे योगमार्गावरही अनेकानेक भेद पडलेले दिसून येतात. महर्षि पतंजलींची योगसुत्रे हा योगदर्शनावरील एक महत्वाचा ग्रंथ असला तरी योग हा पतंजली मुनींच्या बराच्य आधीपासून अस्तित्वात होता. मुळात पतंजली योगसुत्रे हीच मुळी कपिलमुनींच्या सांख्य तत्वज्ञानावर आधारलेली आहेत. पतंजली योगसुत्रांतील मनाच्या विष्लेषणाचा भाग तर काही सांख्यग्रंथांतून जसाच्या तसा स्विकारलेला आहे. हे सर्व सांगण्याचे कारण हे की पतंजली योगसुत्रांमधे कुंडलिनी योगशास्त्राविषयी काहीही माहिती नाही असा एक आक्षेप घेतला जातो. याबाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे 'कुंडलिनी' हा शब्द हठयोगातील आहे ज्याचा वापर नाथ संप्रदायाच्या ग्रंथांमधे विपूल प्रमाणात आढळतो. परंतू एकाच गोष्टीला अनेक नावे असू शकतात. पतंजली योगसुत्रात परमेश्वराची शक्ती जीला हठयोगी कुंडलिनी म्हणतात, आगम ग्रंथ वायवी शक्ती वा देवी असे संबोधतो, श्वेताश्वतर उपनिषद देवात्म शक्ती म्हणते, गीता परा आणि अपरा प्रकृति म्हणते, भक्तीमार्गी आल्हादिनी म्हणतो तीलाच काही अन्य नावाने संबोधण्यात आले आहे. दुसरे असे की प्राचीन काळापासूनच कुंडलिनी योग हा त्याचा गैरवापर टाळण्यासाठी आणि भेसळ टाळण्यासाठी गूढ राखण्यात आला आहे. आजही कुंडलिनी योगाच्या नावाखाली 'बाजारात' जे काही 'विकत' मिळते ते बहुतेक वेळा अर्धवट स्वानुभवहीन पुस्तकी ज्ञानच असते. असो. सांगायचा मुद्दा हा की पतंजली योगसुत्रे कुंडलिनी, चक्रे इत्यादी विषयांवर भाष्य करत नाही म्हणजे पतंजली मुनींना तो अमान्य आहे वा माहित नाही असे अजिबात नाही. दुसरे असे की पतंजली योगसुत्रे ही सुत्रे आहेत. सुत्रे आकाराला छोटी पण अर्थाच्या दृष्टीने मोठी असतात. प्राचीन काळी गुरूने शिष्याला ज्ञानप्रदान करण्याचा प्रघात असल्याने ही सुत्रे गुरूने शिष्याला विस्तारून सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे पतंजलीने त्यात माहितीचा अवास्तव भडिमार केलेला नाही. पतंजलीची योगसुत्रे उपनिषदांच्या नंतरची आहेत असे मानले जाते. कठोपनिषद, छांदोग्य उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद अशा उपनिषदांमधे कुंडलिनी योगशास्त्राचे धागेदोरे स्पष्टपणे दिसतात तेव्हा योगशास्त्राच्या प्राचीनतेबाबत सर्वच तज्ञांनी सहमती दर्शवलेली आहे. किंबहुना काही तज्ञांचे तर असे म्हणणे आहे की वेदपूर्व काळात भारतात शैव दर्शन आणि योग प्रचलित होते. असो. आपल्या लेखाच्या दृष्टीने एवढी माहिती पुरेशी आहे.

शिवयोग या शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. काही तो दक्षिणेकडील सिद्धांच्या योगपद्धती विषयी (थिरूमुलार, बोगरनाथ इत्यादी) बोलताना वापरतात, काही नाथयोग पद्धती विषयी तर काही शिवपुराणोक्त योगशास्त्रासंबंधात. अर्थ छटा काही असल्या तरी शिवयोगाचे अविभाज्य घटक - शक्तीसंक्रमण, शिवशक्ती सामरस्य आणि शिवभक्ती हे सर्वच छटांमध्ये समाविष्ट आहेत. तेव्हा शिवयोग म्हणजे काय ते समजण्यासाठी या तीन घटकांची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

शक्तीसंक्रमण

साधक जेव्हा योगसाधनेला सुरवात करतो तेव्हा त्याच्या शरीरात आणि मनात जन्मोजन्मींचे असंख्य चांगले-वाईट संस्कार साठलेले असतात. हे संस्कार त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. तेव्हा साधना द्रुत गतीने सफल करण्यासाठी हे संस्कार धुतले जाणे आवश्यक ठरते. सर्वच शैव पंथात हे शुद्धीकरण गुरूच्या मार्फत केले जाते. गुरू आपल्या संकल्प शक्तीने शिष्याच्या निद्रिस्त कुंडलिनीला जणू धक्का देतो. ज्याप्रमाणे बंद पडलेली गाडी धक्का दिल्याने सुरू होते त्याच प्रमाणे साधकाची सुप्त कुंडलिनी जागी होते. येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की गुरू कडून शिष्याला होणारे हे शक्तीसंक्रमण हा एक अविभाज्य घटक असला तरी तो साधकाच्या स्वप्रयत्नांना पर्याय ठरू शकत नाही. कारण कुंडलिनी जागृती ही योगजीवनाची फक्त सुरवात आहे. शैव पंथात गुरूला परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे ते याच कारणामुळे. गुरू कडून शिष्याला शक्तीसंक्रमण कसे करावे हा गुरूचा विषय आहे. शिष्याचा त्या बाबतीत पूर्णतः अनधिकार आहे. साधारणतः स्पर्श, दृष्टीक्षेप, संकल्प, मंत्र, नाम इत्यादी रूपाने गुरू हे साधत असतो.

शिव-शक्ती सामरस्य

शिवयोग हा पुर्णतः शिव-शक्ती सामरस्य या संकल्पनेवर आधारलेला आहे. देहांतर्गत चक्रे, नाड्या यांची शुद्धी करून मुलाधारस्थित कुंडलिनी शक्तीला जागे करून एकेका चक्रावर नेत शेवटी मेंदूतील सहस्रार चक्रात न्यायचे हा त्याचा गाभा आहे. सहस्रार चक्राला मानवी देहातील कैलास म्हणतात अर्थात ते शिवाचे निवासस्थान आहे. शक्ती शिवाशी एकरूप झाली की योग्याला समाधी लागते. योग्याच्या सर्व साधना प्रामुख्याने या शिव-शक्ती सामरस्यासाठीच असतात. या साधनांमधे मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग असे चार प्रमुख विभाग आहेत. मंत्रयोगात गुरूप्रदत्त मंत्राचा अथवा नामाचा जप करून मनोलय साधला जातो. हठयोगामध्ये प्राण आणि अपान यांचा समतोल साधून केवल कुंभक साधला जातो. लययोगात प्रामुख्याने षण्मुखी मुद्रेच्या अभ्यासाने नादश्रवण करत मनोलय केला जातो. राजयोग हा शुद्ध ध्यानमार्ग आहे. आजकाल बरेच साधक असे आढळतात की जे कोणत्याही पूर्वाभ्यासाशिवाय वा शुद्धीकरणाशिवाय थेट ध्यानमार्ग चोखाळू पहातात. यापैकी अनेकांना प्रगती करण्यास फार वेळ लागतो कारण मनावर ताबा मिळवणे फार कठीण आहे. काही योगोपनिषदे मंत्र, हठ, लय आणि राज हे योग क्रमाक्रमाने आचरावेत असे सांगतात ते त्याचसाठी. या चारांच्या एकत्रीत वा क्रमाक्रमाने केलेल्या अभ्यासाला योगोपनिषदांत महायोग असे म्हटले आहे. नाथ पंथाने प्रचारीत केलेल्या साधनांपैकी जप आणि अजप या साधना आजच्या साधकासाठी फार महत्वाच्या आहेत. या साधना वरकरणी जरी दोन भासल्या तरी तत्वतः एकच आहेत. त्यांत मंत्र, हठ, लय आणि राज हे चारही योग वास करतात. हा अनुभवाचा विषय आहे तेव्हा प्रत्येकाने आपापल्या गुरूकडून तो समजावून घ्यावा आणि अभ्यासाने पडताळून पहावा.

शिवभक्ती

शिवयोगी हा केवळ योगी नसतो. तो पराकोटीचा शिवभक्तही असतो. त्याचा अष्टांगयोग भक्तीरसाने चिंब भिजलेला असतो. शंकराकरता शरीर सुकवणे म्हणजेच त्याचे यम-नियम. शिवस्वरूपी स्थिर राहणे हेच त्याचे आसन. प्राण आणि अपानात शिव-शक्ती पाहाणे हाच त्याचा प्राणायाम आणि सदाशिव हीच त्याची ध्यानयोग्य वस्तु. स्वतः भगवान शंकरानेच एके ठिकाणी म्हटले आहे -

मदुक्तेनैव मार्ग़ेण मय्यवस्थाप्य चेतसः।
वृत्त्यंतरनिरोधो यः स योग इति गीयते॥

मी दाखवलेल्या योग मार्गाला अनुसरून माझ्यात मन लावून दुसर्‍या सर्व चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग.

शिवयोग्याचा योग हा असा शिवमय असतो. शिवयोग हा पूर्णतः स्वानुभवाचा विषय आहे. काही साधक असे असतात की त्यांना योग्यांची चरित्रे, सिद्धांच्या चमत्कारपूर्ण गोष्टी वाचण्यात फार रस असतो पण साधनेला बसायचा मात्र कंटाळा. अशाने जन्मोजन्मीही योग साधता येणार नाही. आध्यात्मिक वाचन हे केवळ एक प्रेरणा मिळावी, दिशा कळावी, मनावर चांगले संस्कार व्हावेत एवढ्यापुरतेच मर्यादीत असावे. योगशास्त्रात 'सिद्धांतवाक्य श्रवणम' असा एक नियम आहे. तो याच अर्थी आहे. खंडीभर वाचन आणि साधना शून्य असेल तर ती व्यक्ती केवळ 'वाचक' बनेल 'साधक' नाही. तेव्हा शिवयोगाची कास धरून मानवी जन्माचे सार्थक करून घेणे हेच सर्व साधकांचे प्रथम ध्येय असले पाहिजे.  

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 24 August 2010


Tags : शिव कुंडलिनी चक्रे साधना लेखमाला भक्ती नाथ