Untitled 1

चंचलतेचा त्याग करण्याची गरज

या जगाचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे आढळते की बहुतांश माणसे ही प्रामुख्याने आपली इंद्रिये आणि त्यांचे सुखोपभोग यांच्यासाठीच  जगत असतात. थोड्याफार लोकांना इंद्रियजनित सुखाचा तोकडेपणा आणि अशाश्वतपणा जाणवतो. त्यांतील काही लोकं मग अध्यात्ममार्गावर पाऊल ठेवतात. साधनारत होतात. भौतिक सुखांपेक्षा काहीतरी अधिक आनंददायक आहे आणि त्याची प्राप्ती अवश्य केली पाहिजे अशी दृढ इच्छा ज्याला होते तोच खरा या मार्गावर टिकाव धरू शकतो.

भगवत गीतेमध्ये अशा प्रकारच्या दृढ झालेल्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असे म्हटले आहे. व्यवसायात्मिका बुद्धीच्या बरोब्बर उलट जी बुद्धी ती म्हणजे अव्यवसायात्मिका बुद्धी.  ही अव्यवसायात्मिका बुद्धी कशी असते तर असंख्य फाटे फुटलेली. अव्यवसायात्मिका बुद्धीने ग्रसित व्यक्तीला अध्यात्म मार्गावर निश्चय अजिबात धरता येत नाही कारण त्याची बुद्धी इंद्रिय आणि त्यांचे विषय यांनी मोहित झालेली असते. संसारसागाराच्या मायाजालात तो गुरफटलेला असतो. भौतिक सुखोपभोग त्याला क्षणोक्षणी खुणावत असतो. चंचलता हा जणू त्याच्या व्यक्तिमत्वाचा गाभा बनलेला असतो.

संत ज्ञानेश्वरांनी व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका बुद्धीला अनुक्रमे सुबुद्धी आणि दुर्बुद्धी / अविवेक असे म्हटले आहे. ते काय म्हणतात पहा :

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सद्बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥

येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥

ज्याप्रमाणे दिव्याची छोटीशी वात मोठा उजेड पाडू शकते त्याप्रमाणे ही सद्बुद्धी योगमार्गावर फार कामी येते.  अशा सुबुद्धीचा उगम होणे फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे दगड खुप असतात पण परीस थोडेच असतात अगदी त्याचप्रमाणे अशी दृढ बुद्धी असलेली माणसेही थोडी असतात. अशा सद्बुद्धीची थोडी जरी प्राप्ती झाली तरी भाग्योदय झाला असे खुशाल समजावे. अशा दृढ सद्बुद्धीचे एकमेव गंतव्यस्थान म्हणजे ईश्वरप्राप्ती. ज्यांच्याकडे अशी दृढ सद्बुद्धी नाही ते दुर्बुद्धी धारण करतात आणि या जगतातील भौतिक भोगांत अहोरात्र रमतात. त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे स्वर्गीय सुख, नरकवास अथवा संसार प्राप्त होतो. परंतु त्यांना आत्मसुख कधीही प्राप्त होत नाही.

दृढ बुद्धीसाठी आणि चंचलतेचा त्याग करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि विवेकशक्ती आवश्यक असते. योग-अध्यात्म शास्त्रात अशी काही स्तोत्र, मंत्र, उपासना, आणि क्रियात्मक उपाय आहेत की ज्यांचा अवलंब करून ह्या शक्ती प्रबळ होण्यास मदत होते. अर्थात हे उपाय नीट परीक्षा करून यथायोग्यपणे आत्मसात करणे आवश्यक आहे.

असो.

सर्व वाचक दृढ सद्बुद्धीच्या आधाराने अष्टांगयोगरुपी गड सर करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 08 Apr 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates