Untitled 1

अजपा जपाद्वारे सर्व देवतांची स्वयंसिद्ध उपासना

कोणताही जप म्हटला की तो सर्वसाधारणपणे एखाद्या विशिष्ठ दैवतेचा असतो. त्या दैवते प्रीत्यर्थ त्याचा जप करून त्या दैवातेला तो समर्पित केला जातो. जपाचे काम्य फळ हवे असल्यास त्याच्या संकल्पही सोडला जातो. मंत्रशास्त्रातील बहुतेक मंत्र याच प्रकारात मोडतात. येथे गंमत अशी होते की असे तुम्ही किती मंत्रांचे जप करणार आणि त्या द्वारे किती देवतांची उपासना करणार. वेळ आणि मानवी जीवनाचा कालावधी या दोन्हीचा विचार केल्यास एका जीवनात सर्व देवी-देवतांचे मंत्र साधणे आणि सर्व देवी-देवतांची उपासना करणे सर्वथा अशक्य आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

अजपा जपाचे श्रेष्ठत्व येथे आपल्याला पुनः पुनः जाणवल्याशिवाय रहात नाही. अजपा जप हा मानव पिंडाच्या श्वास आणि प्रश्वासांच्या माध्यमातून विदित केला जातो. अहोरात्र म्हणजे २४ तासांत हा जप सामान्यतः २१,६०० एवढ्या संख्येने होत असतो. आता आपसूक होणारा श्वासोच्छ्वास जर "जप" म्हणावा तर त्याला सुद्धा वर उल्लेखलेले देवता वगैरे उपचार हे आलेच. हा जो २१, ६०० एवढ्या संख्येने होणारा अजपा गायत्रीचा जप आहे तो कोणत्या चक्रावर किती होतो आणि तो कोणत्या दैवते प्रीत्यर्थ होत असतो ते जाणून घेणे ते मोठे उद्बोधक आहे.

मुलाधार ते सहस्रार या सात चक्रांवर विशिष्ठ देवतांचे आधिपत्य मानले गेले आहे. प्राचीन योगग्रंथांत या दैवतांच्या बाबतीत थोडाफार पाठभेद आणि मतभिन्नता आहे परंतु ढोबळमानाने त्या चक्रांच्या देवता योग शास्त्रात निर्धारित केल्या गेलेल्या आहेत. चोवीस तासांत २१, ६०० संख्येने होणारा अजपा जप हा या सात चक्रांवर विभागला गेला आहे आणि त्यानुसार त्या-त्या चक्राच्या दैवातेला तो आपसूक समर्पित केला जात असतो.

मेरुदंडाच्या खालच्या भागाकडून ते डोक्याकडे अशी ही सात चक्रे आहेत. त्यांतील मुलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी प्रथम श्रीगणेशाचे स्मरण केले जाते. त्याचं प्रमाणे कुंडलिनी जागृतीचे परम पवित्र कार्य मूलाधारातून सुरु होत असल्याने त्याचे आधिपत्य गजाननाच्या हाती देणे योग्यच आहे. तर या मुलाधार चाक्रापाशी अजपा जपाच्या एकूण संख्येमधील ६०० एवढा जप घडत असतो. हा जप श्रीगणेशाला स्वयमेव समर्पित केला जात असतो.

त्यानंतर येतं ते स्वाधिष्ठान चक्र. या चक्राचे आधिपत्य ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्मदेवाचे कार्य आहे सृष्टीची निर्मीती अथवा प्रसव करणे. मानवी पिंडातील प्रजननाची इंद्रिये सुद्धा स्वाधिष्ठान चक्राच्या अखत्यारीत येतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. स्वाधिष्ठान चक्रापाशी ६००० एवढ्या संख्येने अजपा जप घडत असतो. हा जप अर्थातच ब्रह्मदेवाला अर्पण केला जातो.

त्यानंतर आहे मणिपूर चक्र. या चक्रापाशी भगवान विष्णूचा निवास मानला गेला आहे. विष्णूकडे विश्वाच्या पालन-पोषणाची व्यवस्था आहे आणि अन्नपचनावर ताबा चालवणारे मणिपूर चक्र शरीराचे पालन-पोषण करणारे असेच आहे. मणिपूर चक्रावर श्रीविष्णू प्रीत्यर्थ ६००० एवढ्या संख्येने अजपा जप होत असतो.

मग लागते अनाहत चक्र. या चक्राची देवता आहे रुद्र किंवा भगवान शंकर. भगवान रुद्र किंवा शंकर हा संहारक देव आहे. अनाहत चक्रातील भाव-भावनांचे बंध जोवर तुटत नाहीत तोवर आध्यत्मिक प्रगती होत नाही. त्यामुळे वैराग्य भाव जागवण्यासाठी रुद्र्देव अनाहत चक्रात निवास करतात. अनाहत चक्राशी रुद्रदेवासाठी ६००० एवढ्या संख्येने अजपा जप होत असतो.

त्या पुढे आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्राची देवता आहे जीवात्मा. जीवात्मा हा कर्मांनी बद्ध असतो परंतु त्या जीवात्म्याचे यथार्थ ज्ञान अनाहत चक्राचा उंबरठा ओलांडल्याशिवाय होत नाही. विशुद्धी क्क्रापाशी १००० एवढ्या संख्येने अजपा जप होत असतो आणि तो जीवात्म्याला समर्पित केला जातो.

विशुद्धी चक्रातील जीवात्मा जेंव्हा कर्म बंधनांचा नाश करण्यास समर्थ होतो तेंव्हा कर्म विरहित अशा शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार होतो. आज्ञा चक्र हे आत्म्याचे निवासस्थान आहे. अनाहत चक्र हे भक्तीसाठी आवश्यक आहे परंतु भक्ती ही सुद्धा एक मानवी भावनाच आहे. आज्ञा चक्र म्हणजे शुद्ध, निखळ ज्ञान. शंकराचा तिसरा नेत्र ज्याप्रमाणे चराचर जाळण्यास समर्थ असतो त्याप्रमाणे आज्ञा चक्रात झालेली ज्ञानप्राप्ती समस्त मानवी भाव-भावानादी पाश जाळून टाकते. अशा या आज्ञा चाक्रापाशी १००० एवढ्या संख्येने अजपा जप होत असतो.

सर्वात वरचे चक्र म्हणजे सहस्रार. या चक्राची देवता आहे परमात्मा. आज्ञा चक्रापाशी आत्मा स्वतःच्या शुद्ध स्वरूपात जरी असता तरी तो वैश्विक आत्म्याबरोबर किंवा परमात्म्याबरोबर विलीन झालेला नसतो. ते कार्य घडते सहस्रार चक्रात. याच ठिकाणी गुरुपादुकांचे स्थानही मानले जाते कारण मुलाधार ते सहस्रार हा प्रवास हा गुरुगम्य आहे. सहस्रार चक्रातही १००० एवढ्या संख्येने अजपा जप घडतो.

थोडक्यात सांगायचं तर ६०० + (३ x ६०००) + (३ x १०००) = २१६०० असा हा अजपाचा ताळेबंद आहे.

वरील सर्व विवेचनावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की गणेश-ब्रह्मा-विष्णू-महेश-जीवात्मा-आत्मा-परमात्मा अशा सर्वांची उपासना एकट्या अजपा साधनेने स्वयमेव होत असते. या सर्व देवता आणि त्यांच्या शक्ती साधकासाठी आशीर्वचन प्रदान करतात. त्यासाठी कोणत्याही मठ-मंदिरात जाण्याची गरज नसते. परमेश्वराने मानवी पिंडाची रचनांच अशी केली आहे की आपसूक ही उपासना घडत रहाते. त्यामुळेच ती स्वयंसिद्ध उपासना आहे. गरज आहे तो फक्त हंसरुपी अजपा जाणीवेसहित होण्याची. काय गंमत आहे पहा. मानवी जन्म प्राप्त झालेला प्रत्येक जीव जन्मापासून ते मरेपर्यंत श्वासोच्छ्वास करतच असतो. परंतु बहुतेकांच्या बाबतीत हा श्वासोच्छ्वास फक्त शारीरिक क्रिया रहाते. त्याच श्वासांना जाणीवेची आणि संकल्पाची जोड दिली की योग्यांसाठी तो अजपा जप बनतो.

जाता जाता योगाभ्यासी वाचकांना विचार मंथन करण्यासाठी एक प्रश्न देतो. मुलाधार, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार यांमध्ये स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत यांच्या तुलनेने अजपा जप कमी का बरे घडतो? त्या मागील रहस्य काय बरे असावे? नीट विचार करा. साधनेच्या भक्कम बैठकीच्या जोरावर विचार करा. नुसत्या पुस्तकी वाचनाने हे उत्तर मिळणार नाही. मी ही त्याविषयी अधिक काही सांगणार नाही. योग्याला काही गोष्टी स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर शोधता आल्या पाहिजेत. त्यातच खरी मजा असते.

असो.

अजपा गायत्रीचा परम पवित्र स्वयंभू जप सर्व प्रामाणिक योगाभ्यासी वाचकांचे कल्याण करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 16 March 2020