मी परत येतो

एका दिवसात आयुष्य केवढे बदलून गेले होते. असे वाटत होते की अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आताच्या स्वप्नानंतर तर आजवर योगशास्त्रासंबंधी असलेल्या अनेक कल्पना पार पुसल्या गेल्या होत्या. मी आताच्या अनुभवाला स्वप्न असे म्हणत होतो, कारण आधुनिक विज्ञानाकडे त्याला काही स्पष्टीकरण नव्हते. माझ्यासाठी तो प्रत्यक्ष अनुभवच होता. मनात विचार आला - मी परत गेल्यावर लोक यावर विश्वास ठेवतील? मनानेच उत्तर दिले - लोकांना काय वाटते ते फारसे महत्वाचे नाहीये. एक गोष्ट आठवली व हसू आले...

एकदा शंकर आणि पार्वती कोठेशी जात होते. शंकर नेहमीप्रमाणे नंदीवर बसला होता आणि पार्वती त्याच्या बरोबर पायी निघाली होती. त्यांना असे जाताना पाहून वाटेतले लोक कुजबुजू लागले, "काय स्वार्थी पती आहे. स्वत:च्या सुकोमल पत्नीला पायी चालायला लावून स्वत: मात्र बैलावर बसला आहे." शंकर पार्वतीला म्हणाला, "प्रिये! लोक म्हणतात ते बरोबर आहे. तुला पायी चालायला लावून मी असे बसणे योग्य नाही." मग पार्वती नंदीवर बसली व शंकर चालू लागला. थोड्या वेळाने लोक म्हणू लागले, "काय निष्ठूर स्त्री आहे. स्वत:च्या नवर्‍याला चालायला लावून स्वत: मात्र खुशाल बसली आहे." ते ऐकून पार्वती म्हणाली, "नाथ! त्यांचे बरोबर आहे. मी असे बसणे उचित नाही." पार्वतीही शंकराबरोबर पायी चालू लागली. वाटेतले लोक चेष्टा करू लागले, "काय मूर्ख जोडपं आहे. एवढा बैल असून देखील पायी चालत आहेत." त्यांचे बोलणे ऐकून शंकर-पार्वती दोघेही नंदीवर स्वार झाले. ते पाहून लोक बोलू लागले, "काय दुष्ट माणसे आहेत. तो बैल बघा कसा या दोघांचे ओझे वाहून दमला आहे. यांना मात्र त्याची काही फिकीर आहे का पहा."

थोडक्यात काय तर दुसर्‍याला नावे ठेवणे, दुसर्‍याची टिंगल करणे हा जगाचा स्थायीभावच आहे. त्यांच्या बडबडीकडे लक्ष दिले तर फायद्यापेक्षा मनस्ताप मात्र होईल. मला मिळालेला उपदेश आठवला - "स्वत:शी प्रामाणिक रहा." आपण आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असल्यावर दुसरा काय म्हणतो त्याला फारसा काही अर्थ नाही.

मला दुसरीच काळजी भेडसावू लागली होती. आजवर कुंडलिनी जागृत करणे हे ध्येय होते. ती अशी अकस्मात जागृत झाल्यावर मोठी पोकळी जाणवत होती. आता पुढे काय करायचे? "मी दिलेली साधना सोडू नको" हे ठीक होते, पण स्वप्नात अनुभवलेली प्रगाढ ध्यानाची स्थिती कशी प्राप्त करून घ्यायची ते काही नीटसे उमगत नव्हते. कारण जी साधना मी स्वप्नात केली होती ती मी केली नसून माझ्याकडून करवून घेण्यात आली होती अशी माझी पक्की धारणा होती. आजवर वाचलेल्या एकाही योगग्रंथात कुंडलिनी जागृतीनंतर नक्की काय करायचे किंवा जागृत शक्तीचा पुढील वाटचालीशी नक्की संबंध काय याचा स्पष्ट उल्लेख नव्हता.  मी विचित्र परिस्थितीत सापडलो होतो. जाऊ दे. पहाट व्हायला अजून बराच अवकाश होता. उद्या याचा विचार करू असे मनाशी ठरवत झोपायला गेलो.

मी झोपून तास-दीड तास झाला असेल.  माझा हात बिछान्याच्या फळीवर जोरात आपटला. मला जाग आली. चांगल्या गाढ झोपेतून जाग आल्यामुळे मी वैतागलो. तेवढ्यात जाणवले की माझ्या शरीरातून काहीतरी फिरतेय. प्राण? हो प्राणच. ही हालचाल मला काहीशी ओळखीची होती. प्राणायामाचा अभ्यास बराच काळ केल्यावरही असाच अनुभव येतो. हा अनुभव थोडा तीव्र होता एवढेच. क्षणाक्षणाला प्राणाचा जोर वाढत होता. माझे हात-पाय उसळ्या मारू लागले. सकाळ पासून घडणार्‍या घटना लक्षात घेता मला अजिबात आश्चर्य वाटले नाही वा धक्काही बसला नाही. प्राण एका जागेवरून दुसरीकडे जणू धावत होता. त्याबरोबर एक गरम स्त्रोत फिरतोय असे वाटत होते. अशा स्थितीत बाहेरगावी फार दिवस थांबणे योग्य नाही असे वाटू लागले. उद्याच परतीच्या प्रवासाला निघायचे असा निश्चय केला. हात-पाय फार उसळ्या मारू नयेत म्हणून गुडघे छातीशी घेऊन अंगाची मुटकुळी करून झोपलो. केव्हा तरी झोप लागली. मग मात्र काही त्रास झाला नाही. डोळे उघडले तेव्हा उन्हे चांगलीच वर आली होती.

सकाळच्या सत्रात आजूबाजूची मोजकी ठिकाणे पाहून दुपारी किंवा संध्याकाळी घरी परत निघायचे असे नक्की केले. आता खरे तर कोणतीही ठिकाणे पाहण्यात रस नव्हता. नाश्ता करून परत त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात गेलो. आवारात थोडा वेळ बसलो. त्या जागेशी एका दिवसात अनेक जन्मांचा संबंध आहे असे वाटत होते. शिवलिंग व मंदिर मनात जेवढे साठवता येईल तेवढे साठवून घेतले. जाण्यापूर्वी निवृत्तीनाथांचे समाधी मंदीर पहायचे असे ठरवले. मंदीर फारसे गजबलेले नव्हते, त्यामुळे दर्शन शांतपणे घेता आले. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे थोरले भाऊच नव्हते तर गुरूही होते. नाथ संप्रदायाच्या कुंडलिनी जागृतीच्या तत्वज्ञानाचा गीतेच्या सहाव्या अध्यायाशी समन्वय साधणार्‍या ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या गुरूंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, असा विचार करत नमस्कार केला. गाभारा एका अनोख्या दैवी प्राकाशाने भरून गेला होता. त्या प्रकाशात ज्ञानेश्वरांची संपूर्ण गुरूपरंपरा डोळ्यासमोर अवतरली. आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञाननाथ अशी ही दिव्य परंपरा गाभार्‍यात भरून राहिली होती. त्यांचे दैदिप्यमान देह डोळे दिपवून टाकत होते. मस्तक आपोआपच झुकले.

मंदिरातच थोडा वेळ बसून राहीलो. घड्याळाचे काटे वेगाने धावत होते. सामानाची आवराआवर करायची होती. थोडी खरेदीही करायची होती. तेव्हा तेथून उठणे भागच होते. रात्रीपूर्वीच घरी थडकायचे असा माझा विचार होता. संध्याकाळी घरी पोहोचलो.  गेल्या काही दिवसांत आलेल्या अनुभवांनी मन गच्च भरले होते. प्रवासाचा शीण आला होता. का कोण जाणे घर, आजुबाजूची माणसे, वस्तू सगळेच खूप परके-परके वाटत होते. जणू काही मी बर्‍याच वर्षांनी घरी परतत होतो वा त्या गोष्टी माझ्या नव्हत्याच.  कोणाशीही विशेष काही न बोलता जेवलो आणि बिछाना गाठला.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 01 June 2009


Tags : योग अध्यात्म कुंडलिनी चक्रे साधना देवाच्या डाव्या हाती लेखमाला पुस्तके

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates