Untitled 1

नाथपंथी साधनामार्ग - चित्ताची अंतर्मुखता आवश्यक


(नाथ संप्रदायाचे प्रथम गुरु श्रीमच्छिंद्रनाथ यांचे समाधी मंदिर)

नाथ पंथ, अवधूत पंथ, गुरु पंथ, सिद्ध मार्ग अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा नाथ संप्रदाय योगशास्त्राचा मुकुटमणी आहे. सर्वसामान्य लोकांतच नव्हे तर योग अभ्यासकांनाही नाथ सिद्ध, त्यांचे चमत्कार, साधना पद्धती, त्यांनी निर्माण केलेली शाबरी विद्या, या मार्गावरचा गूढपणा आणि गोपनीयता यांचे गारुड पडलेले दिसते. नवनाथांचे भक्त जरी संपूर्ण भारतभर बऱ्यापैकी मोठ्या संख्येने असले तरी नाथ संप्रदायाचे सच्चे उपासक कमीच आहेत.

खरं सांगायचं तर नाथ संप्रदाय हा सर्वसामान्यांचा साधनामार्ग म्हणून निर्माण झालेलाच नाही. भगवान शंकराने अवधूत दत्तात्रेयांकरवी मच्छिन्द्रनाथांना दिक्षा देऊन हा पंथ निर्माण केला. नाथ पंथाच्या स्थापनेपासून या पंथात वैराग्यपूर्ण सिद्ध योगी आणि योगीनींचे वर्चस्व राहिलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नवनाथ हे भटके जीवन जगणारे बैरागी होते. सांसारिक आयुष्यात ते कधीच पडले नाहीत. त्यांनी कधीच ढीगभर शिष्यांचा गोतावळा जमा केला नाही. मोजक्या पात्र शिष्यांना दिक्षा देऊन नाथ मार्गाचे ज्ञान द्यायचे आणि पुढे जायचे असा त्यांचा शिरस्ता होता. नवनाथांपैकी कोणीही मोठाले आश्रम स्थापले नाहीत की येईल त्याला केवळ संप्रदाय वाढावा म्हणून आपल्यात सामीलही करून घेतले नाही.

गहिनीनाथ आणि त्यानंतरच्या नाथ परंपरांमध्ये काही संसारी शिष्यगण आढळतात पण एकूण नाथ पंथाचा विचार करता त्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांचा असा समज होतो की नाथ संप्रदाय आणि त्याची शिकवण ही सांसारिक जीवन जगणाऱ्यांसाठी नाही. साहजिकच सर्वसाधारण साधक यामार्गापासून दुरावतो.

याबाबतीत नवीन साधकांनी दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पहिली गोष्ट म्हणजे नाथपंथी साधानानार्ग हा अन्य अनेक मार्गांपेक्षा अत्यंत जलद गतीने कार्य करणारा मार्ग आहे. परंतु या जलद गतीचे काही संभाव्य धोकेही आहेत. कल्पना करा की तुम्हाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे आहे. हा प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत - साधी कार आणि रेसर कार. प्रथमदर्शी कोणाची अशी धारणा होईल की रेसर कारने इच्छित स्थळी पोहोचण्यास लागणारा वेळ अगदी कमी असेल. पण प्रत्यक्षात तसे घडेल का? अजिबात नाही. का? कारण ज्या रस्त्यांवरून ही रेसर कार धावणार आहे ते रस्ते मुळात त्या गाडीसाठी तयारच केलेले नाहीत. कीतीही वेग दिला तरी त्यांतील खाचखळगे आणि अडथळे चुकवत रेसर कार चालवणे अशक्य होऊन जाईल. प्रसंगी अतिवेगाने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. तात्पर्य हे की नाथ पंथी साधना मार्ग आचरण्यासाठी जर शरीर आणि मन घासून पुसून तयार केले नाही तर साधनेचा इच्छित परिणाम अजिबात दिसणार नाही. शरीर आणि मन तयार करण्यासाठी नाथ पंथात दहा यम आणि दहा नियम सांगितले आहेत. संसारी साधकाला हे यम-नियम पाळणे अशक्य नसले तरी बरेच अवघड जाते. दैनंदिन सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असतांना यम-नियमांचे आचरण साधकाची तारांबळ उडवू शकते.

दुसरी गोष्ट अशी की नाथपंथ हा कुंडलिनी योगाचा पुरस्कार करणारा मार्ग आहे. मुलाधार चक्राशी निद्रिस्त असलेली जगदंबा स्वरूप कुंडलिनी मंत्र, प्राणायाम, बंध, मुद्रा, ध्यान यांच्या सहाय्याने जागृत करायची आणि षटचक्रांचे भेदन करून तिला सहस्रातीत शिवाशी एकरूप करायचे हा नाथपंथीय योगसाधनेचा गाभा आहे. वर उल्लेखलेल्या साधना ह्या पाच-दहा मिनिटांत उरकायच्या साधना नाहीत. काही प्राणायाम तर चारही संध्याकाली करण्याचा प्रघात आहे. अर्थातच या साधानामार्गासाठी लागणारा वेळ हा संसारी साधकाला उपलब्ध होईलच असे नाही. अर्थात इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे संसारी साधकही हा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात.

ज्यावेळी वर उल्लेखलेल्या हठयोग मार्गाने कुंडलिनी जागृत होते त्यावेळेस साधकाचे शरीर आणि मन एका विलक्षण संक्रमणावस्थेतून जात असते. काही वेळा तर दैनंदिन कामकाज करणेही कठीण जाऊ शकते. कुंडलिनी जागृत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर काही काळ तरी साधकाने एकांतवासात घालवणे त्याच्यासाठी हितावह असते. लक्षात घ्या की विद्युत शक्ती प्रमाणे कुंडलिनी ही सुद्धा एक उर्जा आहे. कुंडलिनीला जागे करणे जेवढे महत्वाचे आहे त्यापेक्षा तिला योग्य मार्गाने नेणे कितीतरी जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी चित्ताला अंतर्मुख बनवणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आपण पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण आणि मन यांद्वारे समस्त व्यवहार करत असतो. ज्यावेळी कुंडलिनी जागृत होते त्या वेळी ती विद्युत उर्जेप्रमाणे वाहण्यासाठी मार्ग शोधत असते.  बहिर्मुख वृत्तीच्या साधकाच्या बाबतीत मग ही शक्ती सुद्धा बहिर्गामी बनते. ती इंद्रियांमार्फत बाहेर धाव घेऊ पाहते. अशी शक्ती मग साधकाच्या मनात सुप्त दबा धरून बसलेल्या नाना विषयवासनांना खतपाणी घालते. म्हणजे "योग" ऐवजी "भोग" अशी साधकाची अवस्था होण्याचा धोका असतो. याउलट जर साधक मनाने अंतर्मुख असेल तर जागृत कुंडलिनी सुद्धा अंतर्मुख बनते. ती इंद्रियांमार्फत बाहेर धाव न घेता सुशुम्नेमधून वाहू लागते. चक्रभेदानाला सुरवात करते. जन्मोजन्मींचे संस्क्रार खरवडून काढते. साधकाला शुद्ध बनवते..

आजकाल अनेक नवीन साधक कुंडलिनी जागृत करून घेण्यासाठी उतावळे झालेले असतात. कधी एकदा आपली कुंडलिनी जागृत होतेय अशी त्यांची अवस्था असते. अशा साधकांनी हे पक्के लक्षात ठेवावे की नाथपंथी साधनामार्ग आचरण्यासाठी चित्ताची शुद्धता आणि चित्ताची अंतर्मुखता अत्यावश्यक आहे. जर हे गुण अंगी न बाणवता कुंडलिनी जागृत केली तर सुरवातीला आपण प्रगती करतोय असं वाटेल कदाचित पण काळाच्या ओघात जागृत शक्तीचा सुयोग्य वापर बाजूला राहून परत "जैसे थे" स्थिती होईल. प्रसंगी साधकाची अधोगतीही शक्य आहे.

साधक संसारी आहे की नाही हा दुय्यम भाग आहे. त्याला नाथपंथाचे नीतीनियम पाळणे कितपत जमते, तो त्यासाठी किती प्रामाणिक राहून प्रयत्न करतो त्यावर त्याची या मार्गावरील प्रगती अवलंबून आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 November 2015


Tags : योग शिव कुंडलिनी चक्रे कथा नाथ