Untitled 1

अजपाचा दैनंदिन संकल्प

माणूस परमेश्वरी शक्तीच्या शोधार्थ मठ-मंदिरे पालथी घालतो. या वणवणीतून कधी काहींना मार्ग सापडतोही परंतु अनेकांच्या पदरी निराशाच पडते. यात त्या मठ-मंदिरांची काही चूक नसते. गल्लत होत असते ती त्या साधकांची. जी गोष्ट अंतरंगात आधी पासूनच अस्तित्वात आहे ती अज्ञानामुळे बाह्य जगतात शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात.

मानवी शरीर ज्या जैविक उर्जेवर चालते ती प्राणशक्ती हो ईश्वराचीच शक्ती आहे. प्राणशक्तीच्या आधाराने घडत असणारे श्वास आणि प्रश्वास हे ही त्या ईश्वरी शक्तीचीच अभिव्यक्ती आहेत. परंतु हा सहज साध्य आणि सूक्ष्म संकेत न समजल्याने माणूस बाह्य गोष्टींमध्ये ईश्वरी शक्ती शोधण्यात वेळ वाया घालवत असतो. दासबोधाच्या शब्दांत सांगायचे झाले तर -

तळघरामधें उदंड द्रव्य । भिंतीमधें घातलें द्रव्य ।
स्तंभीं तुळवटीं द्रव्य । आपण मधें ॥

ज्याप्रमाणे एखाद्याच्या वाड्यातील तळघरात पूर्वजांनी प्रचंड द्रव्यासाठा करून ठेवलेला असतो, त्या वाड्याच्या भिंतींमध्ये द्रव्य गाडून ठेवलेले असते, अगदी वाड्याच्या खांबांमध्येही द्रव्य पुरून ठेवलेले असते. परंतु त्या माणसाला पूर्वजांनी गाडलेल्या या धनाचा पत्ताच नसल्याने तो बिचारा त्या ठेव्याला मुकतो. तशीच काहीशी अवस्था बहुतेक जीवांची झालेली असते.

सामान्यतः २१,६०० एवढ्या संख्येने होणारे श्वासोच्छ्वास जणू दिवसभर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की "हे मानवा! जागा हो. सोहं-सोहं-सोहं हे शाश्वत सत्य प्रत्यक श्वासाश्वासातून व्यक्त होण्यासाठी धडपडत आहे. प्राणांची ही साद ओळख आणि आरूढ हो मोक्षामार्गावर."

जे वाचक नियमित अजपा साधना करत आहेत त्यांनी एक छोटा प्रयोग करून बघावा.

रोज सकाळी उठल्यावर, अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी बिछान्यावर मांडी घालून स्वस्थ बसा. डोळे मिटून मनातल्या मनात परमेश्वराला सांगा की "हे प्रभो! या क्षणापासून उद्या सकाळपर्यंत होणारे माझे २१,६०० श्वास मी तुख्या प्रीत्यर्थ जगणार आहे. हे प्राणउर्जेने ओतप्रोत भरलेले माझे श्वासच तुला अर्पण करतो आहे. त्यांचा स्वीकार कर."

मग क्षणभर थांबून पुढील दिनक्रम सुरु करा. दिवसभरात सकाळी केलेला हा संकल्प आठवण्याचा वारंवार प्रयत्न करा. त्यावेळी क्षणभर श्वासांवर मन ठेवा आणि दैनंदिन कार्य घडू देत. बघा कसं छान वाटेल ते. दिवसभर ईश्वराशी संबंध जोडला जाईल आणि साधनेच्या वेळी मन चटकन तादात्म्य पावेल.

असो.

सर्व वाचक अजपाचा संकल्प करून ध्यानमार्गावर अग्रेसर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 29 Apr 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates