Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

आर्य आणि द्रवीड संस्कृती विषयक नवा शोध

लेखक : बिपीन जोशी

प्राचीन भारतात आर्य आणि द्रवीड संस्कृती नांदत होत्या हे तर सर्वांनाच माहीत आहे. इतिहास तज्ञांमधे या संस्कृतींच्या उगमाविषयी वाद आणि मतभेद आहेत. काहींचे असे म्हणणे आहे की सर्वप्रथम भारतात द्रवीड संस्कृती पसरली होती. त्यानंतर काही हजार वर्षांनी आर्यांनी भारतात प्रवेश केला. त्यांनी द्रवीडांशी युद्धे करून उत्तर भारतात बस्तान बसवले. या मतानुसार आर्य खरतर भारतातील नव्हेत तर भारताबाहेरून आलेले आहेत. त्यांनी येताना आपल्याबरोबर वेद आणले असे काही मानतात. म्हणजे वेद ही भारतात बाहेरून आणलेली गोष्ट आहे असे त्याना वाटते.

दुसरे मत असे की आर्य भारताबाहेरून आलेच नाहीत तर ते भारतातच विकसित झाले. आर्यांनी वेद भारताच बस्तान बसविल्यावर लिहिले (आणले नाहीत) असे या दुसर्‍या वर्गाचे मत आहे. आज अनेकतज्ञांनी हेच मत संशोधनाअंती मान्य केलेले आहे.

भारतात असा एक समज आहे की दक्षिण भारतीय म्हणजे द्रवीड तर उत्तर भारतीय म्हणजे आर्य. काहींनी तर असे म्हटले आहे की रामायण कालात यज्ञांवर आक्रमण करणारे राक्षस म्हणजे दुसरे कोणी नसून दक्षिणेतील द्रवीडच होत. त्यांच्या भाषांमधील तफावतही (आर्यांची संस्कृत विरुद्ध द्रवीडांची तामिळ सदृश भाषा) लक्षणीय आहे. या सर्वांमुळे या मतास पुष्टी मिळते असे या वर्गाचे म्हणणे आहे.

काहींनी असे म्हटले आहे की शिव हा द्रवीड लोकांचा देव असून त्याला प्रतिस्पर्धी म्हणून आर्यांनी विष्णू हे दैवत आणले. शैव आणि वैष्णव पंथांत मतभिन्नता आणि वैतुष्ट्य असण्याची अनेक उदाहरणे प्राचीन भारतात आहेत. आजही या दोन पंथात एकमेकाविषयी अढी असलेली आढळते. म्हणूनच शंकराचे भस्म आडवे असते तर विष्णूच्या गंधाचा टिळा उभा. शंकर हा स्मशानात राहणारा तर विष्णू ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीसह वास करणारा. पुराणांमधे काही पात्रांनी शंकराला वेदबाह्य वर्तन करणारा म्हणून हिणवल्याची उदाहरणे आहेत (अर्थात नंतर त्यांना त्याची शिक्षाही मिळालेली आहे). अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्राचीन भारतात असे मतभेद हे केवळ शिव आणि विष्णू यांपुरतेच मर्यादीत नव्हते तर इतरही देवदेवतांमधे होते. असे मतभेद धर्माला पोषक नाहीत म्हणून शंकराचार्यांनी पंचदेवता पुजन रूढ  केले. पंचदेवता पुजना मधे शिव, देवी, गणपती, विष्णू आणि सूर्य अशा पाच देवतांची पुजा होते. असो.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे माझ्या एका विद्यार्थ्याने आजच्या Times of India मधील सांगितलेली एक बातमी. आजचे उत्तर भारतीय म्हणजे आर्यांचे वशंज तर दक्षिण भारतीय म्हणजे द्रवीडांचे वंशज हा समज खोटा ठरवणारे ठोस संशोधन झाले आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी आणि काही स्वतंत्र संशोधकांनी असे म्हटले आहे की सर्व भारतीयांमधे (म्हणजे आर्यांचे वंशज म्हणवणार्‍यांमधे आणि द्रवीडांचे वंशज म्हणवणार्‍यांमधे) एक गुणसूत्रीय(Genetic) समानता आहे. या शोधामुळे असे सिद्ध झाले आहे की उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय या दोघांचे पुर्वज एकाच गुणसूत्रीय गटातील होते. या संशोधनासाठी 500,000  Genetic Markers* चा उपयोग करण्यात आला. समाजाच्या विवीध घटकांतील 123 व्यक्तींवर ह्या चाचण्या झाल्या. या संशोधनात असेही म्हटले आहे की सुमारे 65,000 वर्षांपूर्वी अंदमानमधे प्राचीन दक्षिण भारतीय स्थायीक झाले. त्यानंतर 25,000 वर्षांनी प्राचीन उत्तर भारतीय उदयास आले. कालांतराने या दोन भिन्न प्रजाती एक झाल्या आणि त्यांपासून एक निराळीच गुणसूत्रीय प्रजाती बनली. आजचे भारतीय हे प्राचीन दक्षिण भारतीय आणि प्राचीन उत्तर भारतीय यांच्या मिश्रणातून जन्मास आले आहेत.

या शोधाने 'हम सब एक है' हेच सिद्ध झाले आहे. जरी हा शोध आज लागला असला तरी आपल्या पुराणकारांनी हे केव्हाच ओळखले होते. म्हणूनच तर पुराणांमधे तुम्हाला 'हरीहरामधे भेद मानणे महापाप आहे' असे वारंवार सांगितलेले आढळते.

* A genetic marker is a gene or DNA sequence with a known location on a chromosome and associated with a particular gene or trait.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 September 2009


Tags : योग अध्यात्म शिव विचार