Untitled 1

ज्ञानेश्वरीतील कुंडलिनी योगाचा आस्वाद  

उद्या म्हणजे दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी (भाद्रपद कृष्ण षष्ठी) श्रीज्ञानेश्वरी जयंती आहे. मराठी भाषिक माणसांना ज्ञानेश्वरीची वेगळी ओळख करून द्यायला नको. तुमच्यापैकी अनेकांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, तिचा अभ्यास केला असेल. कदाचित ज्ञानेश्वरीची विधिवत पारायणे सुद्धा तुम्ही केली असतील. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या रूढ वाचन-पठण-पारायण यांच्याविषयी मी काही सांगणार नाही. आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही ते करू शकता. वाचकांपैकी अनेक वाचक असे असतील की ज्यांनी अजूनपर्यंत ज्ञानेश्वरी कधीही पूर्णपणे वाचलेली नाही परंतु त्यांच्या मनात ज्ञानेश्वरी बद्दल कुतूहल आणि अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. अशा जिज्ञासू लोकांसाठी आज काही गोष्टी सांगत आहे. आशा आहे की त्यांचा उपयोग करून तुम्ही ज्ञानेश्वरीतील मार्गदर्शन अधिक चांगल्या प्रकाराने अंगिकारू शकाल.

ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे चार वेद भारतीय अध्यात्माचे जणू चार आधारस्तंभ. परंतु वेदांचा पसारा एवढा मोठा की सर्वसामान्य मानवी बुद्धीला त्यांचे आकलन होणे कठीण. त्यामुळे वेदांतील ज्ञानात्मक गाभा ऋषीमुनींनी उपनिषदांच्या स्वरूपात प्रस्तुत केला. काळानुसार उपनिषदांतील ज्ञान सुद्धा आकळण्यास कठीण होऊ लागले तेंव्हा त्या ज्ञानाची धारा भगवत गीतेच्या रूपाने प्रगट झाली. प्राचीन काळाच्या रूढ पद्धतीनुसार वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, भगवत गीता वगैरे सर्व शास्त्रग्रंथ संस्कृतात निर्माण झाले. परिणामी संस्कृत न जाणणाऱ्या जनमानसांत ज्ञानाचा प्रसार अवघड होऊन बसला. संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने भगवत गीतेतील ज्ञानगर्भ अमृतधारा मराठी भाषेत प्रकट करणारा सिद्ध नाथ योगी आपल्याला लाभला. आजवर भगवत गीतेवर कित्येक दिग्गजांनी भाष्य केले आहे परंतु ज्ञानेश्वरीने गीताज्ञानाची कवाडे जितक्या प्रभावीपणे उघडली आहेत त्याला तोड नाही. ज्ञानेश्वरी केवळ मराठी भाषेत आहे म्हणूनच महत्वाची नाही तर ज्ञानेश्वरीत कुंडलिनी योगशास्त्राची जी सुरेख आणि सहज गुंफण आहे त्यामुळेही ती अजपा साधकांसाठी महत्वाची आहे.

भगवत गीता हा श्रीकृष्ण मुखातून अर्जुनाप्रती उपदेश आहे. त्यामुळे एका अर्थाने भगवत गीता हा वैष्णव ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतांना तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की कुंडलिनी योग हा शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य वगैरे भेदांच्या पलीकडला आहे. ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण-अर्जुन संवादाचे स्वरूप तसंच ठेवलं असलं तरी ग्रंथाचा अभ्यास करत असतांना अशा भेदांच्या पलीकडे जाऊन ग्रंथाकडे पहाता आलं पाहिजे. शंकर श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ ह्या असल्या भेदांच्या पलीकडे जाण्याएवढी वैचारिक प्रगल्भता तुमच्याकडे असायला हवी. अगदी कुंडलिनी योगाच्या परिभाषेत जरी बघितलं तरी सात चक्रांमध्ये गणपती, ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती अशा सगळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमुक दैवत श्रेष्ठ की तमुक दैवत श्रेष्ठ अशा कमी महत्वाच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन ग्रंथातील ज्ञानाकडे लक्ष द्या. तुमच्या उपास्य दैवतेवरील आणि साधनेवरील श्रद्धा ढळू न देता ज्ञानग्रहण करा.

तुम्ही जर एखाद्या पुस्तकांच्या चांगल्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला दोन प्रकारच्या ज्ञानेश्वरी बघायला मिळतील. एक म्हणजे "सार्थ" आणि दुसरी म्हणजे "पारायण प्रत". मूळ ज्ञानेश्वरी जरी मराठी भाषेत लिहिलेली असली तरी ते जुन्या काळचं मराठी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील मूळ ओव्या आधुनिक काळातील वाचकांना समजायला काहीशा अवघड जातात. "सार्थ" ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक मूळ ओवीचा आजच्या सुलभ मराठीतील अर्थ दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचत असाल तर "सार्थ" प्रतच घ्या. अनेक भाविक ज्ञानेश्वरीचे विधिवत पारायण करतात. असं पारायण करत असतांना मूळ ओव्याच महत्वाच्या असतात. त्यामुळे "पारायण" प्रतीमध्ये फक्त मूळ ओव्याच दिलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही जेंव्हा ज्ञानेश्वरीची प्रत विकत घ्याल तेंव्हा नीट उघडून बघा आणि खात्री करा की तुम्ही बरोबर निवड केली आहे की नाही.

बाजारात अनेक मराठी प्रकाशकांनी छापलेल्या ज्ञानेश्वरी उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी हा एकदा वाचून कपाटात ठेऊन देण्याचा ग्रंथ नाही. तो तुम्हाला वारंवार वाचावा लागेल. आयुष्यभर त्या ग्रंथाची साथ तुम्हाला लाभणार आहे. तुमचं हे वाचन सुगम, आनंददायी आणि मनाला प्रसन्नता देणारं झालं पाहिजे. ज्ञानेश्वरीची प्रत खरेदी करतांना छान सुंदर ठसठशीत छपाई, लहान टाईप / मोठा टाईप, उत्तम प्रतीचा कागद, आकार वगैरे वगैरे गोष्टी सुद्धा तुमच्या आवडीनुसार पाहून घ्या. खरेदी केलेली प्रत घरी आणल्यावर अशा जागी ठेवा की जिथून ती पटकन काढून वाचता येईल. कधी कधी आपले आध्यात्मिक विचारमंथन चालू असतांना पटकन मधेच काही संदर्भ बघावासा वाटतो. अशा वेळी ज्ञानेश्वरी पटकन हाताशी असली पाहिजे. कुठेतरी अडगळीत किंवा इतर पुस्तकांच्या खाली वगैरे ठेवलीत तर पटकन सापडणार नाही. ज्ञानेश्वरीला जर तुमच्या घरातील देवघरात किंवा आसपास स्थान देता आलं तर उत्तमच.

ज्ञानेश्वरीचे वाचन करतांना एखादी वही किंवा डायरी आणि पेन नेहमी जवळ ठेवावं. ज्ञानेश्वरी हे गीताभाष्य आहे. भगवत गीतेतील सातशे श्लोकांचे सुमारे नऊ हजार ओव्यांमध्ये केलेलं ते विवरण आहे. एवढ्या मोठ्या ग्रंथांतून अजपा योगमार्गाच्या दृष्टीने तुम्हाला चार महत्वाच्या गोष्टी सापडतील. पहिली म्हणजे ज्ञानेश्वरांना जे सांगायचे आहे ते तत्वज्ञान. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरांना सांगायचा असलेला क्रियात्मक योग अर्थात साधना. तिसरं म्हणजे जागोजागी प्रतिपादित केलेली योगजीवनाची मूल्य. चौथी गोष्ट म्हणजे योगमार्गावर साधकाला येऊ शकणारे अनुभव. या चारही गोष्टी त्या वहीत किंवा डायरीत थोडक्यात टिपून ठेवायची सवय असू द्या. नंतर reference आणि उजळणी म्हणून ती डायरी छान उपयोगी पडते. त्याचं डायरीत तुम्हाला स्वतःला ज्ञानेश्वरीतील शिकवण अंगीकारल्या नंतर काय काय अनुभव आले किंवा काय काय अडचणी आल्या त्याचीही संक्षिप्त नोंद करून ठेवता येईल.

सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये भगवत गीतेतील संस्कृत श्लोक, त्या श्लोकाचे मराठी भाषांतर, त्या श्लोकाशी संबंधित ज्ञानेश्वरीतील मूळ ओव्या आणि मूळ ओव्यांचा आजच्या सुलभ मराठीतील अर्थ एवढ्या गोष्टी तरी असतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचतांना घाई अजिबात करायची नाही. अगदी सावकाश प्रथम गीतेतील श्लोक वाचायचा. प्रथम त्याचा मराठीत जो अर्थ दिलेला आहे तो वाचायचा. क्षणभर थांबायचं. तो श्लोक आणि त्याचा अर्थ वाचल्यावर प्रथम दर्शनी तुमच्या मनाला काय उमगलं त्याचा नीट विचार करायचा. मनात काहीशी स्पष्टता आली की मग त्या श्लोकावर ज्ञानेश्वरांनी दिलेल्या ओव्या आणि त्यांचा सुलभ मराठीतील अर्थ सावकाश वाचायचा. ज्ञानेश्वरांच्या उपमांमुळे आणि दृष्टान्तांमुळे तुम्हाला जो अर्थ जाणवला होता तो आता कसा विस्तृत होतो, फुलतो ते बघा. मी हे जे करायला सांगतोय ते कदाचित तुम्हाला कंटाळवाण वाटेल पण तुम्हाला गीताज्ञानावर आणि योगमार्गावर खरंच विश्वास असेल तर हा अभ्यास भरघोस आनंद आणि समाधान देणारा आहे.

अशा प्रकारे संपूर्ण ज्ञानेश्वरीची तीन-चार आवर्तने करून झाली की मग तुमच्या गुरूकडे म्हणा किंवा तुमची श्रद्धा असलेल्या एखाद्या कुंडलिनी योगाच्या जाणकाराकडे म्हणा ती डायरी घेऊन जा. समोरासमोर बसून तुम्हाला ज्ञानेश्वरी काय उमगली, कितपत उमगली ते त्यांना सांगा. फक्त प्रश्न-उत्तरे करण्यापेक्षा तुम्हाला काय समजल किंवा तुम्ही नक्की कशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील शिकवण अंगिकारली ते जास्त महत्वाचं आहे. हा संवाद त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करा. फक्त बौद्धिक स्तरावरच्या पांडित्यपूर्ण प्रश्नोत्तरांना किंवा प्रवचनाला विशेष महत्व नाही. मग त्या जाणकाराने दिलेल्या feedback च्या आधारे पुन्हा ज्ञानेश्वरीची आवर्तने करा. काही कारणाने असा कोणी जाणकार मिळाला नाही तर तटस्थ राहून स्वतःच स्वतःचे परीक्षण करा. जर हा अभ्यास तुम्ही नीट मन लावून केलात तर तुम्हाला असं आढळेल की प्रत्येक आवर्तन योगजीवनाचा एक नवीन पैलू उलगडत आहे. अजपा आणि ज्ञानेश्वरीचा असा एकत्रित अभ्यास खुप आनंद आणि समाधान समाधान देऊन जातो.

येथे श्रीज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधून आपण ज्ञानेश्वरी केंद्रस्थानी ठेवली आहे. कदाचित तुम्हाला अन्य एखादा ग्रंथ अनुसरणीय वाटत असेल. कदाचित अन्य एखाद्या ग्रंथातील विचारधारा तुम्हाला अधिक आवडत असेल. संत-सत्पुरुषांनी शब्दबद्ध केलेले साहित्य नेहमीच काहीतरी चांगलं शिकवून जात असतं. महत्वाचं असतं ते तुम्ही तुमच्या आवडीच्या त्या ग्रंथातील शिकवणीला आत्मसात करण्यासाठी किती प्रयत्नशील आहात आणि त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन योगमार्गाच्या कसोटीवर खरा उतरतो आहे अथवा नाही. मनावर झालेले जन्मोजन्मींचे वाईट संस्कार पुसण्यासाठी प्रथम चांगल्या संस्कारांची मदत घ्यावी लागते. त्याचसाठी अष्टांग योगातील यम-नियमांत "स्वाध्याया" चा समावेश केलेला आहे. ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ त्याकामी अतिशय उपयोगी पडतात.

असो.

आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ अशा नाथ सिद्ध परंपरेकडून प्रकट झालेली "भावार्थ दीपिका" अजपा ध्यानाभ्यास करणाऱ्या वाचकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 07 September 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates