Untitled 1

गिणगिणे बुवांचा उपदेश आणि अजपा 

अजपा योग ही अति प्राचीन साधना पद्धती आहे. जणू समस्त योगसाधनांचा मुकुटमणीच. हंसः अथवा सोहं हा अजपा साधनेचा मूलमंत्र. अर्थात हा मंत्र अन्य मंत्रांप्रमाणे जपायचा नसून तो योगमार्गी ध्यानात्मक पद्धतीने अनुसंधान ठेवण्याचा मंत्र आहे. या मंत्राची विशेषतः अशी की तो स्वयंसिद्ध मंत्र आहे. दयाघन परमेश्वराने तो मानवाला स्वतःच्या उद्धारासाठी प्राणशक्तीच्या माध्यमातून प्रदान केलेला आहे. अजपाच्या मुलमंत्राचा सुलभ भाषेत अर्थ आहे - "मी आणि ते ईश्वरीतत्व एकच आहे".

नुकताच २५ फेब्रुवारी २०१९ रोजी शेगावच्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन संपन्न झाला. वृत्तीने दिगंबर अवधूत असणाऱ्या गजानन महाराजांच्या तोंडी नेहमी एक मंत्र खेळत असे - गण गण गणांत बोते. गजानन महाराज हा मंत्र नेहमी गुणगुणत असत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा असे नाव पडले. या मंत्राचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर तो असा आहे - हे जीवा, शिवतत्व तुझ्या हृदयातच वास करत आहे. जीव आणि शिव एकच आहेत. हे ऐक्य जाणून घे. जर गजानन महाराजांच्या या प्रिय मंत्राचा अर्थ सूक्ष्मपणे जाणला तर असं लक्षात येईल की तो सोहं अनुभूतीच प्रतिपादित करत आहे. जीव आणि शिव किंवा जीवात्मा आणि परमात्मा भिन्न नसून एकच आहेत. आत्मा कर्माने बद्ध झाल्याने जीवावस्था प्राप्त झाला आहे. कर्मबंधन दूर होताच, अज्ञान दूर होताच तो त्याच्या शाश्वत शिव स्वरूपात आहेच. ही अनुभूती तुम्ही प्रत्यक्ष घ्या असच श्री गजानन महाराजांना सांगायचे आहे.

वेगवेगळ्या सत्पुरुषांची शिकवण आणि त्यांनी प्रतिपादित केलेले मार्ग जरी वरकरणी वेगवेगळे भासत असते तरी ते शेवटी एकाच उद्दिष्टाप्रत नेऊन सोडतात. अजून एक उदाहरण देतो म्हणजे कदाचित नीट समजेल. धनकवडीच्या श्री शंकर महाराजानी समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे एक निस्सीम भक्त बाबुराव रुद्र यांना दर्शन दिले. या भेटी दरम्यान त्यांनी रुद्रांना काही काव्यपंक्ती ऐकविल्या (संदर्भ: श्रीशंकर गीता, अध्याय १६). त्यातील एक पंक्ती अशी होती -

मुझे वोही जानता है || जो खुद को समझता है ||

आता स्वतःला ओळखणे म्हणजे काय तर जीव आणि शिव एक आहेत यांची अनुभूती घेणे. हाच आत्मसाक्षात्कार. हीच ज्ञान प्राप्ती. श्री शंकर महाराजांना भक्त शंकराचा अवतार मानतात. थोडक्यात महाराजांचे मूळ स्वरूप जाणण्याचे सामर्थ्य त्यालाच प्राप्त होते ज्याला हा जीव-शिव अभेदभाव उमगलेला आहे. अन्य पर्याय नाही. ह्या काव्यपंक्तीतून अजपाचा सोहं भावच ध्वनीत झालेला आहे.   

अजपाचा जयघोष, गिणगिणे बुवांचा मंत्रोपदेश आणि शंकर महाराजांच्या काव्यपंक्ती यात वरकरणी भिन्नता वाटली तरी अंतरंगी एकच शिकवण आहे. भौतिक गोष्टींसाठी सत्पुरुषांची उपासना अनेकजण करतात परंतु "सोहं" बोध व्हावा म्हणून फारच थोडे प्रयत्नशील असतात.

असो.

सर्व सुजाण वाचक जीव-शिव ऐक्याची गुरुकिल्ली प्राप्त करण्यासाठी अग्रेसर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 11 March 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates