Untitled 1

प्राण आणि अपानाचा यज्ञ

भारतीय अध्यात्मशास्त्रात प्राचीन काळापासून यज्ञाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. वेद, आगम, निगम यांतील अनेक विधी यज्ञाशिवाय अपूर्ण मानले गेले आहेत. मंत्रशास्त्रात मंत्राच्या पुनश्चरण प्रक्रियेत आणि परिणामी मंत्रासिद्धीत हवन किंवा यज्ञ हे महत्वाचे अंग मानले गेले आहे. विशेषतः काम्यकर्मांच्या पुर्तीकाराता विशिष्ठ हवनद्रव्यांनी आहुती देणे आवश्यक मानले गेलेले आहे.

यज्ञाचे हे महत्वाचे स्थान लक्षात घेऊन भगवत गीतेत यज्ञाचे रूपक वापरून अनेक योगप्रक्रियांचे वर्णन आलेले आहे. अभ्यासुंनी त्यादृष्टीने भगवत गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय नीट अभ्यासावा म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला यज्ञांचे जे १०-१२ प्रकार सांगितले आहेत त्यांचा सखोल आध्यात्मिक अर्थ ध्यानी येईल.

या लेखात आपल्याला त्या सर्व यज्ञांच्या प्रकारांचे प्रयोजन नाही. येथे आपल्याला अजपा साधनेचा त्यांतील एका यज्ञाशी कसा संबंध आहे त्याकडे संकेत करायचा आहे. चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात -

अपाने जुव्हति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की काही योगी अपानात प्राणाची आहुती देतात तर काही प्राणात अपानाची आहुती देतात.  काही या दोहोंची गती रोधून प्राणायाम प्रक्रियेत तत्पर होतात. हा श्लोक जरी वरकरणी छोटासा भासत असला तरी त्यामध्ये अनेक योगगम्य गोष्टींचा अंतर्भाव आहे.

प्राण म्हणजे शरीरातील जैविक शक्ती. योगमतानुसार मुख्य प्राणांचे पाच उपप्रकार मानले गेले आहेत - प्राण, अपान, समान, व्यान, आणि उदान. यांपैकी प्राण आणि अपान प्रमुख आहेत. बाकीच्यांचे अस्तित्व या दोहोंवर अवलंबून आहे.

आपली श्वासोच्छावाची प्रक्रिया म्हणजे प्राण आणि अपानाची अभिव्यक्ती आहे. श्वास आत घेणे हे प्राणांचे कार्य आहे तर श्वास बाहेर सोडणे हे अपानाचे कार्य आहे. वरील श्लोकात काय गूढ संकेत आहे ते नीट बघा. श्वासोच्छ्वासरुपी यज्ञाच्या दोन प्रकारच्या आहुती त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अपानाची प्राणात आहुती आणि दुसरी म्हणजे प्राणाची अपानात आहुती. ही आहुती दिल्यानंतर प्राण आणि अपानाची गती कुंठीत होऊन केवल कुंभक नावाची समाधी सहाय्यक अवस्था योग्याला सहज प्राप्त होते.

आता गंमत बघा. खरंतर श्वासोच्छ्वास हे सर्वच माणसांत सदैव सुरूच असतात, मग कोणी आध्यात्मिक असो वा नसो. म्हणजे एका अर्थी बघायचे झाले तर हा प्राण-अपान यज्ञ सर्वच जण करत असतात. मग सर्वच जण या यज्ञाचे फळ जे आत्म-साक्षात्कार ते का बरे प्राप्त करत नाहीत? हे कळण्यासाठी एक उदाहरण देतो. आपण थंडीत शेकोटी पेटवतो. सुकलेली लाकडे, काड्या, पालापाचोळा इत्यादींचा ढीग जमवून त्याला आग लावली जाते. आता तत्वार्थाने बघायचे झाले तर ही आग आणि यज्ञकुंडातील आग ही एकच असते. परंतु त्या पेटवलेल्या शेकोटीला आपण यज्ञ म्हणू शकू का? अर्थातच नाही. का नाही? कारण अग्नि जरी एक असला तरी ती क्रिया करत असतांना आपल्या मनातला भाव हा भिन्न-भिन्न असतो.

अगदी हाच प्रकार सर्वसाधारण माणसाचा श्वासोच्छ्वास आणि अजपा साधकाचा श्वासोच्छ्वास यांमध्ये असतो. अजपा ध्यानातील श्वासाला जाणिवेचे आणि सोहंचे भक्कम अधिष्ठान लाभलेले असते. तसा प्रकार सर्वसामान्य माणसाच्या श्वसन प्रक्रियेत असत नाही. जाणीवेरहित आणि जाणीवेसहित हा फरक साधनामार्गावर किती महत्वाचा असतो हे आता तुम्हाला कळू शकेल.

दुसरी गंमत बघा. अपानाची प्राणात आहुती आणि प्राणाची अपानात आहुती ही वरकरणी एकच प्रक्रिया वाटेल. गणितात आपण जसं म्हणतो की जर अ = ब असेल तर ब = अ असायलाच पाहिजे हे उघड आहे. मग येथे श्रीकृष्णाने अपानात प्राण आणि प्राणात अपान असं का बरं म्हटले आहे? भगवत गीतेच्या बहुतेक अभ्यासकांनी आणि तज्ञांनी वरील श्लोकातील या प्रक्रियांना अनुक्रमे पूरक, रेचक, आणि कुंभक असे मानले आहे. मला माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून स्फुरलेला अर्थ मात्र त्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. तो मी येथे मुद्दामच देत नाही कारण तो नीट जाणून घेण्यासाठी तुम्ही अजपा साधनेत थोडी प्रगती केली असणे आवश्यक आहे. नाहीतर मी काय सांगतोय ते फक्त वरवर कळेल. खरे मर्म समजणार नाही.

मी नेहमी सांगतो की अजपा योग हा वरकरणी अगदी सोप्पा वाटला किंवा "त्यांत काय मोठंसं" असा वाटला तरी तो प्रकांड शक्तिशाली आहे. सर्व योगांचे सार म्हणजे अजपा योग. अर्थात ही गोष्ट अनुभवानेच कळणारी आहे. त्याकरता अनेक वर्षांचा अभ्यास आवश्यक आहे. वाचीव-ऐकीव माहिती उपयोगाची नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वर वरील श्लोकाच्या भाष्यामध्ये काय म्हणतात बघा -

 एक अपानाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखैं ।
हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥
एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहोंतें हीं निरुंधिती ।
ते प्राणायामी म्हणिपती । पांडुकुमरा ॥

एक अपानात प्राण अर्पण करतो, एक अपान प्राणात अर्पण करतो, तर एक दोघांना निरुद्ध करतो. वरील ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी अभ्यासयोग असा शब्द वापरला आहे. हे प्राण, अपान, केवल कुंभक, त्यांचा एकमेकात यज्ञ वगैरे वगैरे गोष्टी कोणाला कळतील तर जो अभ्यासयोगाची कास धरेल त्यालाच. योगमार्गाचे वैशिष्ठ आहे की ते निव्वळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर स्वतः अभ्यासाने ते ज्ञान खरे की खोटे ते पडताळून पहाण्याचा मार्गही दाखवते.

असो.

सर्व वाचक अभ्यासयोगाचे आचरण करून प्राणापान यज्ञाचे फळ प्राप्त करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 April 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates