शिवगुरू आणि ऋषभयोग्याचा अमुल्य उपदेश

भगवान विष्णू दुष्टांच्या निर्मुलनासाठी वारंवार अवतार घेतो हे तर सर्वश्रुतच आहे. श्रीशंकर मात्र वेगळ्या स्वरूपात आपले कार्य अखंडपणे चालू ठेवतो. श्रीशंकराचे हे रूप म्हणजे गुरू. अनादी कालापासून शंकराला सर्वांनीच गुरू रूपात स्विकारलेले आहे. विशेषतः योगशास्त्रात शंकराला आदिगुरू म्हणून अत्यंत भक्तिभावाने पुजले जाते. महाराष्ट्रात वेदतुल्य मानल्या गेलेल्या गुरूचरित्रातही शंकराचा उल्लेख 'पूर्वपीठ शंकरू' असाच आहे. शंकराकडून विष्णुला आणि विष्णुकडून ब्रह्माला असे ज्ञानाचे संक्रमण झाले असे त्यात सांगितले आहे. नाथसंप्रदायाचे लोकप्रिय ग्रंथ नवनाथ भक्तिसार आणि नाथलिलामृही शंकराकडून ही योगविद्या पंथाला कशी प्राप्त झाली त्याचे वर्णन करतात. योगशास्त्राची अशी मान्यता आहे की योगशास्त्र हे सर्वप्रथम श्रीशंकराने पार्वतीला सांगितले. म्हणजेच पार्वती शंकराची प्रथम शिष्या. तेथून मग गुरू-शिष्य परंपरेने ते आज आपल्यापर्यंत उपलब्ध झाले. कित्येक आगम ग्रंथ शिव-पार्वती संवाद अशा स्वरूपात आहेत. पार्वती शंकराला प्रश्न करते आणि शंकर त्या प्रश्नांना उत्तर देतो असे त्या ग्रंथांचे स्वरूप आहे. शिवपुराणात शिवशंकराने अठ्ठावीस योगाचार्यांच्या रूपात अवतार घेतला असा उल्लेख आहे. या अठ्ठावीस आचार्यांनी आणि त्यांच्या एकशे बारा शिष्यांनी सर्वत्र योगमार्गाचा प्रसार आणि प्रचार केला असे मानले जाते. हे सर्व योगी सिद्ध होते. ते सर्व शास्त्रांत पारंगत, वेदज्ञानी, वैराग्यपूर्ण, शिवज्ञानपरायण, जितेंद्रिय आणि केवळ शिवशंकरामधे मन जडलेले असे होते. रुद्राक्ष आणि भस्म हीच काय ती त्यांची आभूषणे.

श्रीशंकराने पार्वतीला प्रथमतः योगदीक्षा दिली त्या विषयी एक सुरस कथा आहे. नाथसंप्रदायाशी या कथेचा अगदी जवळचा संबंध आहे. ती मी अन्यत्रही दिली आहे पण येथे पुनरावृत्ती अस्थानी ठरणार नाही.

एकदा शंकर आणि पार्वती केलासावर क्रिडा करत होते. पार्वतीने शंकराला विचारले, "तुम्ही कायम समाधिस्त असता. तुम्हीच या विश्वाचे जन्मदाते, पालक आणि संहारक आहात यात संशय नाही. मग तुम्ही ध्यान तरी कोणाचे करत असता?" त्यावर शंकर उत्तरला, "आत्म्याचे. देवि हे जग आत्मतत्वाचाच विस्तार आहे. मी सदा सर्वदा त्याचेच ध्यान करत असतो." आपण मागील लेखात पाहिलेच की या आत्मतत्वालाच वेदांती ब्रह्म म्हणतात तर शैव परमशिव. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की पार्वतीपति शंकर हा निर्ग़ुण परमशिवाचे सगुण रूप आहे. त्याचे हे सगुण रूप त्याने परमशिव तत्वाच्या आधारानेच साकारलेले आहे. तेव्हा सोप्या भाषेत सांगायचे तर शंकर स्वतःचेच ध्यान करतो!

पुढे पार्वतीने शंकराला विचारले, "मलाही हे रहस्य काय आहे त्याचे ज्ञान द्याल का?" त्यावर शंकर म्हणाला, "जरूर. पण देवी हे ज्ञान अती गूढ आहे तेव्हा एकांतातच मी तुला ते प्रदान करीन." यावर ते दोघे एकांत कोठे मिळेल ते पाहु लागले. नंदी, रुद्रगण या सर्वांना चुकवून त्यांनी एका नदीचा काठ पसंत केला. काठावर बसून शंकर पार्वतीला कुंडलिनी योगशास्त्राचे गूढ ज्ञान प्रदान करू लागला. ज्ञान दानाचे कार्य संपल्यावर पार्वतीला किती समजले ते पहावे असा विचार शंकराच्या मनात आला. त्याने विचारले, "देवी! तुला सर्व नीट कळले ना. सांग बरे सर्वत्र काय भरलेले आहे?" या प्रश्नावर पार्वती उत्तर देणार एवढ्यात पाण्यातून उत्तर आले. शंकराने चाकाटून पाण्यात पाहिले तो एका माशाच्या पोटातील गर्भाने ते उत्तर दिले होते. शंकराने दयाळूपणे त्या मत्स्यबाळाला मानव रूप प्रदान केले. तोच नाथ संप्रदायाचा जनक मच्छिंद्रनाथ! शंकराच्या आज्ञेने मग मच्छिंद्रनाथाने कुंडलिनी योगशास्त्राचा आणि शाबरी मंत्रविद्येचा सर्वत्र प्रसार केला.

आदिगुरू शंकरापासून उगम पावलेले गुरूतत्व प्रत्येक गुरूत वास करत असते. गुरू हे एक तत्व आहे हाडामासाचा देह नव्हे. गुरू विषयी दोन टोकाच्या भुमिका घेणारे विचारप्रवाह आज आढळतात. काही म्हणतात आम्हाला गुरूची गरजच नाही तर काही म्हणतात गुरू म्हणजे कोण एक मनुष्य देह. या दोघांनाही खरे गुरूतत्व कळलेच नाही असे म्हणावे लागेल. अध्यात्ममार्गावर गुरूचे महत्व वादातीत आहे. गुरू या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानरूपी अंधार दुर करणारा. हे कार्य ज्यामुळे साधेल तो गुरू. जीव आणि शिव भिन्न आहेत असे समजणे म्हणजे अज्ञान. याउलट जीव आणि शिव यांचे एकत्व मनात ठसणे आणि हे एकत्व प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे ज्ञान. गुरूशिवाय अध्यात्ममार्गाची वाटचाल करणे हे अशक्य नसले तरी फार खडतर नक्किच आहे.

प्राचीन शैव आगम ग्रंथांमध्ये गुरू तीन प्रकारचा सांगितला गेला आहे - पुरुष गुरू, सिद्ध गुरू आणि दैवी गुरू. पुरुष गुरू हा हाडामासाच्या देहाद्वारे शिष्याला ज्ञान प्रदान करतो. साधारणतः सर्वांना अशाच प्रकारचा गुरू सहज लाभतो. पुरुष गुरूचेही हा सत्गुरू आणि गुरू असे उपविभाग पडतात. सत्गुरू म्हणजे अशी व्यक्ती की जीला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची अनुभुती आलेली आहे. गुरू म्हणजे अशी व्यक्ती की जी योगमार्गावर अत्यंत प्रगत तर आहे, तीला परमेश्वरी चैतन्याची क्वचित प्रसंगी अनुभूतीही आलेली आहे पण अजुनही सत्गुरू प्रमाणे तीला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची प्राप्ती झालेली नाही. येथे साधकाच्या दृष्टीने लक्षात ठेवायची एक महत्वाची गोष्ट म्हणजे सत्गुरू आणि गुरू यांमधे श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव कधीही करू नये कारण साधकापेक्षा या दोनही प्रकारच्या व्यक्ती अत्यंत प्रगत असतात. त्यांत भेदाभेद करणे हा साधकाच्या दृष्टीने अनधिकारच ठरतो. त्यामुळेच आध्यात्मिक क्षेत्रात सत्गुरू आणि गुरू या दोघांनाही 'गुरू' याच शब्दाने संबोधले जाते.

योगमार्गाची पराकोटीची सिद्धता ज्यांना लाभली आहे ते सिद्ध म्हणून ओळखले जातात. सिद्ध मृत्युला जिंकून स्वेच्छेने ब्रह्मांडात विचरण करतात. नाथ संप्रयदायात असे अनेक सिद्ध प्रसिद्ध आहेत. नवनाथ तर आजही सुक्ष्मरूपाने आपल्या साधक भक्तांना मदत करत असतात. ही मदत कधी प्रत्यक्ष असते तर कधी अप्रत्यक्ष. अन्य पंथांमधेही 'सिद्ध' ही संकल्पना आहेच आणि ते आपापल्या भक्तांना मदत करतात असा दृढ विश्वासही. जेव्हा अशा एखाद्या सिद्धाकडून साधकाला अनुग्रह मिळतो तेव्हा तो साधकाचा सिद्ध गुरू ठरतो.

दैवी गुरू म्हणजे साधकाचे आराध्य दैवत वा त्याचा अवतार. साधकाची भक्ती जर अत्यंत तीव्र असेल. साधना बळकट असेल तर प्रत्यक्ष आपल्या आराध्य दैवताकडून साधकाला काही वेळा अनुग्रह मिळतो. हा अनुग्रह साधारणतः स्वप्नात, ध्यान करत असताना, भक्तीचा आवेग तीव्र असताना प्राप्त होतो. काही वेळा अशी माणसे आढळतात जी म्हणतात की आम्हाला स्वप्नात आमचे कुलदैवत दिसले वा आमच्या इष्टदैवताने स्वप्नात काही सांगितले, प्रश्नाचे उत्तर दिले, अडचणीतून मार्ग दाखवला वगैरे. अशा प्रकारचे अनुभव हे 'अनुग्रह' या सदरात बसत नाहीत हे लक्षात ठेवावे कारण अशा अनुभवांनंतरही साधकात आध्यात्मिकदृष्ट्या कोणताही बदल झालेला नसतो. अनुग्रह ही अशी गोष्ट आहे की जी साधकाची आध्यत्मिक प्रगती अगदी खात्रीने करतेच. त्याबद्दल साधकाला संशय रहात नाही.

साधकाला कोणत्या प्रकारच्या गुरूकडून अनुग्रह मिळावा हे त्याच्या पूर्वकर्मावर, साधनेच्या तीव्रतेवर आणि भक्तीवर अवलंबून असते. असो. आता परत मुळ विषयाकडे वळूया.

एकदा शंकराने ऋषभ नावाच्या शिवयोग्याचा रुपाने अवतार घेतला होता. स्कन्द पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात त्याविषयी सुरस कथा आहे. श्रीधरकवीने आपल्या ओवीबद्ध भाषेत ती छान सांगितली आले. येथे संपूर्ण कथा सांगण्याचे कारण नाही परंतू त्या कथेतील शिवयोग्याचा उपदेश अत्यंत महत्वाचा आणि उद्बोधक आहे. कथेची पार्श्वभुमी अशी आहे...

एका राजाची सुमती नावाची राणी गर्भवती असते. अन्य सावत्र राण्या तीला मुलगा झाला तर राजा आपल्याकडे दुर्लक्ष करेल या भितीने तिच्यावर विषप्रयोग करतात. सुमती राणी सदैवाने मृत्युमुखी पडत नाही पण विषामुळे तीच्या सर्वांगावर विषार फुटतो. दिवसरात्र त्यामधुन रक्त आणि घाण वाहू लागते. राजा काही काळ वैद्याकरवी औषधोपचार करवतो पण नंतर तीचा वीट येऊन तीला जंगलात नेऊन सोडतो. बिचारी राणी रानावनात ठोकरा खात फिरत असते. तशाच अवस्थेत ती प्रसुत होते आणि तीला मुलगा होतो. दर्दैवाने त्या मुलालाही विषार लागतो. आपल्या नशिबाला दोष देत ती जंगलात कसेबसे दिवस कंठत असते. एक वृद्ध व्यापारी तीला पाहतो आणि तीची दया येऊन तीला आपल्या तांड्याबरोबर ठेवतो. बरेच उपचार करूनही आईचा आणि बाळाचा विषार काही जात नाही. एक दिवस बाळ प्राण सोडतं. सुमतीचा धीर सुटतो. त्याच वेळी ऋषभ नावाचा एक शिवयोगी अवतरतो. सुमती रडत रडत त्याला आपली सर्व कहाणी सांगते. त्यावर शिवयोगी सुमतीला म्हणतो, "बाळे! कोरडा शोक कशाला करतेस? तुझे पूर्जन्मीचे आईबाप, भाऊबहिणी, मुलगे आज कोठे आहेत? चौर्‍याएंशी योनी फिरत आलिस तेथील सगेसोयरे आज कोठे आहेत? अजूनही किती जन्म आहेत याचा कधी विचार केला आहेस का? ज्या ज्या जातीचे शरीर घारण करतात त्या त्या जातीच्या अभिमानाने लोक नाचत असतात पण मुळात आपण कोठून आलो याचा शोध काही घेत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास आणि मृत्युनंतर तो कोठे गेला? तू आणि हे सगळे लोक मेल्यावर कोठे जाणार आहेत? आत्मा हाच शाश्वत आहे, नित्य शिव आहे. शरीर क्षणभंगूर आहे. तो आत्मा कोणाचाही बन्धू वा पुत्र नाही. ज्या शरीरासाठी तू शोक करतेस ते प्रेत तुझ्यापुढे पडले आहे! मृगजळच मुळात मित्थ्या असते. त्यावरचे बुडबुडे किती मित्थ्या असतील! चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोण बसेल? चित्रातील अग्नीने कोण जळेल? आणि चित्रातील गंगानदीत मासे पोहतात असे दृश्य रंगविले तरी त्या प्रवाहात कोणी वाहून जातो का? व्यन्धेच्या मुलाने पुष्कळ द्रव्य कमवले असे झाले आहे का? भीष्माची कन्या हनुमंताला दिली असे कधी झाले आहे का? आणि गन्धर्व हे वर्‍हाडी? लग्न कोणी लावले? वार्‍याचा मंडप वाळूच्या दोराने शिवला? शिंपीतील रुप्याच्या पात्रात आकाशपुष्प कोणी भरले? कासवीच्या दुधाचे तुप करोन मृगजळातील मासे कधी दीप प्रज्वलित करतील का? आणि ते मासे पायात चाळ बांधून नाचू लागले ते जन्मांध पाहात बसतील का? सापाच्या कानातील कुंडले चित्रांतल्या चोरांनी चोरून आणली हे जसे लटके तसाच हा प्रपंच मुलातच खोटा आहे. त्याला खरा कसा मानावा? हे सर्व मुलातच अशाश्वत आहे त्याचा शोक करणे व्यर्थ नाही का? हे शरीर म्हणजे कोशरूपी वृक्षांचे अद्यानच आहे. सर्व रोगांचे भांडार! कृमिकीटकांचे माहेर! पापाचा समुद्रच! भ्रांतीचे आकाश! रक्त, अस्थी, श्लेष्मा, नसा यांची ही चामड्याने वेष्टिलेली मोळी आहे! हे मुळातच अपवित्र आहे ते गोमुत्र शिंपडून पवित्र होईल का? डोक्याचे मुंडन केले तर पवित्र झाले का? वत्से! गुरूला शरण जात नाहीत तर प्राणी कसे उद्धरून जातील? कल्पकोटी फेरे मारतील तरी मुक्त होणार नाहीत. सत्वर सावध हो कशी. तीन गुणांच्या दोरखंडाने पंचमहाभुतांचे वासे बांधून हे जग निर्माण केले आहे. गंगेत दोन काष्ठे एकत्र येतात आणि दूर जातात तसे पतिपत्नी एकत्र येतात. नुसता खेळ आहे हा! सत्य नव्हे. अपत्ये ही उडत उडत एका वृक्षावर येऊन बसणारी व नंतर दुसर्‍या वृक्षावर जाणारी पाखरे आहेत. ऊन लागले म्हणजे पांथस्थ वृक्षाच्या छायेला बसतात, ऊन कलले म्हणजे निघून जातात तसे सोयरे असतात. मायामय अशा प्रपंचाच्या वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी आहेत. शिव हा सर्वसाक्षी असतो. सावधान असतो, कशातही गुंतत नाही. जीव मात्र विषयरूपी फळे भक्षण करतो. त्यामुळे स्वतःचा विसर पडून जन्ममरण भोगत फिरत राहतो. त्यांमधे एखादा पुण्यवंत गुरूला शरण जातो! तो स्वतः शिव होतो व शिवाची भक्ती करतो!"

हे वैराग्यपूर्ण निरूपण एकल्यावर सुमती ऋषभयोग्याच्या चरणांवर लोटली. आपल्या मृत बाळालाही तीने शिवयोग्याच्या चरणांवर घातले. शंकराला आपल्या भक्तांचे दुःख जराही सहन होत नाही. तो लगेच भक्तांच्या मदतीस धावतो. ऋषभयोग्याने सुमतीचे मृत बाळ जीवंत केले! दोघांनाही मृत्युंजय मंत्र सांगितला ज्या योगे दोघेही विषार जाऊन निरोगी झाले! ऋषभयोग्याने त्या बाळाचे नाव भद्रायु असे ठेवले.

पुढे भद्रायु थोडा मोठा झाल्यावर ऋषभयोगी परत एकदा अवतीर्ण झाला आणि त्याने भद्रायुला उपदेश दिला. आजच्या काळातही तो उपदेश सर्वांसाठीच (अगदी अध्यात्ममार्गावर नसलेल्यांसाठीही) अमुल्य असा आहे. ऋषभयोगी भद्रायुला म्हणाला, "भद्रायु, श्रुती, स्मृती व पुराणे यांत सांगितलेल्या नियमांचे पालन कर. माता, पिता व गुरू यांच्या ठायी निष्ठा ठेव. त्यांची निंदा प्राणांतीही करू नये. सर्वांभूती शिव हाच आत्मरूपी असतो हे विसरू नको. स्वधर्म कधी टाकू नको. कोणतेही काम विचार न करता, उतावळेपणाने करू नये. आपल्या जवळपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोलावे. काळ कोणता आहे, मित्र कोण, शत्रू कोण, द्वेश करणारा कोण याचा विचार करावा. धानार्जन किती, खर्च किती, आपली दुर्बलता कोणती, आपले सेवक कसे काम करतात, आपल्याला यश देतात की अपयश हे पहावे. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, अग्नी, पशु, शेती व धन यांच्याकडे वारंवार लक्ष देत जावे. आपली लहान अपत्ये, पत्नी, शत्रू, दास, घर, रोग यांची उपेक्षा करू नये. दुर्लक्ष केले तर फार हानी होते. विद्वान व ज्ञानी जसे आचरण करतात तसे करावे. परोपकार करावा, परपीडा करू नये. परनिंदा टाकून सदा शिवस्मरणात रहावे. शंकराची सेवा व स्मरण हेच मोठे तप होय. परस्त्री व परधन यांची अभिलाषा धरू नये. शास्त्रे श्रेद्धेने श्रवण करावी. श्रवण, मनन, निजध्यास सतत करावा.

धर्मपत्नीविषयी प्रेम, परस्त्रीविषयी आदर व विरक्ती, शत्रूंवर क्रोध, साधुंशी नम्रता, द्वेष्ट्या जनांविषयी मद, संतभक्तांविषयी नम्रता व साम्यभाव, समाजकंटकांविषयी मत्सर, सर्वसामान्यांविषयी निर्मत्सर, दुर्जनांसी दंभ, भल्या माणसाला वंदन, पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान, द्विजांशी निरभिमान, दानाने हातचे सार्थक, तीर्थयात्रा करण्यात पदयात्रा, शंकराचे ध्यान, पुराणांचे श्रवण करावे. संतांच्या स्पर्शाने त्वचेचे सार्थ मानावे व नेत्र शंकराचे दर्शन करण्यात धन्य मानावे. जिभेचा उपयोग स्तोत्र म्हणण्यासाठी करावा. नाकाचा उपयोग शिवनिर्माल्याचा वास घेण्यासाठी करावा. कृपा करावी ती दीन व अनाथ यांवर. इश्वरावर प्रेम करावे, संतांशी मैत्री करावी, देवांचा द्वेश करणार्‍यांची उपेक्षा करावी.

योग्य काळी निद्रा घ्यावी, योग्य आहार घ्यावा. आपले वित्त गुप्त ठेवावे. आयुर्मान, गृहच्छिद्र, औषध, पुण्य, मंत्र हे गुप्त ठेवावे. आपण केलेले दान, स्त्रीभोग, मान, अपमान आपल्याजवळच ठेवावा. अति सर्वत्र वर्ज्य करावे. मैत्री असो, शिक्षण असो, स्मृती असो, पुण्य असो हे प्रमाणातच असावे. पण उत्साह, धैर्य, दान ही वाढती असावीत.

गावच्या सभेत शठ, पापी, धूर्त, चोर, व्यभिचारी, कपटी, चंचल, पोरकट, खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदक, भक्तीमार्गाचा उच्छिद करणारे, मद्यपी, अगम्य स्त्रीशी गमन करणारे, कृतघ्न, वाटमारे, धर्मनष्ट यांचे दर्शनही करू नये. पूर्वी जो शत्रू होता व आता आपला मित्र झाला आहे अशा माणसावर विश्वास टाकू नये.

पत्नी, पुत्र व धन यांविषयी कर्तव्यबुद्धीने वागावे. आसक्ती नसावी. इतर नातलगांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टी पाहून त्यांची हाव धरू नये. मोठ्या डोहात उडी मारणे, महापुरुषाशी युद्ध करणे, बलवंताशी झगडा करणे ही अनर्थाची द्वारे अहेत. हाताचे भुषण कंकण व मुद्रिका नसून दान हेच आहे. कुंडले ही कर्णांचे भूषण नसून उत्तम ग्रंथांचे श्रवण हेच भूषण आहे. ज्याची वाणी गोड, ज्याची भार्या रूपवती, जो संपत्तिमान व उदार असतो त्याचे जिवीत सफल होय.

वाणीचे व्रत म्हणजे वेद आणि खरे बोलणे. विद्येने योग्य असे जे कोणी असतील त्यांना लगेच काहितरी सन्मानाने द्यावे. विपत्तीत धैर्य धरावे, वादात वाणीने विजय मिळवावा, युद्धात पराक्रम करावा, याचकाला देण्यात हात मागे घेऊ नये. सत्समागमापुढे प्रत्यक्ष अमृतही तुच्छ आहे. दुसर्‍याच्या पराक्रमावर चरफडू नये. आपणही पराक्रम करावा. दुसर्‍याला सुख मिळाले तर त्यात आपणही आनंदित व्हावे.

पृथ्वीवर चार मोठी रत्ने आहेत - अन्न, पाणी, सत्य व मृदु वचन आणि औदार्य. बाकी मुल्यवान खडे-पाषाण ही रत्ने व्यर्थ आहेत. कोणाचेही वर्म बोलून दाखवू नये. भाग्य वाढले तरी आपला धर्म सोडू नये. गुरू व शंकर यांत भेदबाव करू नये. भाग्याचा व विद्येचा गर्व सोडून द्यावा. कुल, शील, विद्या, राज्य, तप, रूप व तारुण्य यांचा गर्व फार लवकर वाटू लागतो. असा गर्व कधीच करू नये."

असा उपदेश देऊन श्रीशंकराने भद्रायुला सामर्थ्य प्रदान केले ज्याच्या जोरावर त्याने आपले गतवैभव परत मिळवले.

शंकर गुरूरूपात वास करतो हे खरे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज पाखंडी गुरूंमुळे 'गुरू' हा शब्द अपशब्द बनतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकवेळ गुरू न मिळाला तरी चालेल पण पाखंडी गुरू मिळू नये. पाखंडी गुरू स्वतः तर नरकात जातोच पण आपल्याबरोबर साधकालाही नरकात लोटतो. निव्वळ भगव्या वस्त्रांवरून, मुंडन वा जटा संभारावरून, आश्रम व शिष्यसमुदायावरून गुरू खरा की खोटा हे कळत नसते. ही केवळ बाह्य चिन्हे आहेत जी अनेकवेळा फसवी ठरू शकतात. तेव्हा साधकाने याबाबत डोळसपणे वागावे. जोवर गुरूंची भेट होत नाही तोवर सत्पुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वाचन करावे, त्यातील शिकवण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. नामस्मरण करावे. अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. अंतरी खरी तळमळ असेल तर योग्य वेळ येताच कोणत्या ना कोणत्या रूपात गुरू अवश्य भेटतोच.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 25 July 2010


Tags : अध्यात्म वेदांत शिव साधना लेखमाला भक्ती नाथ