Untitled 1

योग साधनेची सहा अंगे

आसन, कुंभक, मुद्रा, ध्यान, जप आणि ब्रह्मस्मरण ही सहा अंगे ईश्वराचा जणू देहच आहेत. जो योगी यांचा निरंतर अभ्यास करतो त्याला भैतिक सुखांची भुरळ पडत नाही.
~ हठ योग मंजिरी

अर्थ : योग साधना ही एका विशिष्ठ क्रमाने आणि शिस्तीने आचरणे आवश्यक असते. त्याचं कारण असं की योग शास्त्राची विविध अंगे एकमेकांशी निगडीत आणि पूरक आहेत. हठयोगाबद्दल सांगायचं झालं तर प्रथम अंग म्हणजे योगासने. योगासनांनी शरीराला स्थैर्य प्राप्त होतं जे प्राणायाम-ध्यानादी क्रीयांकरता अत्यावश्यक असतं. त्यानंतर महत्वाचं अंग म्हणजे कुंभक. येथे कुंभक म्हणजे प्राणायाम असा अर्थ आहे. कुंभकामुळे वायुला स्थिरता येते परिणामी मन स्थिर होते. अर्थात कुंभक योग्य मार्गदर्शनाखाली करावा अन्यथा नुकसान करू शकतो. प्राणायाम साधू लागला की मग मुद्राभ्यास करावा. येथे मुद्राभ्यास म्हणजे दशमुद्रा असा अर्थ आहे. दशमुद्रांत मूलबंध, उद्डीयान बंध, जालंधर बंध, महामुद्रा, महावेध, विपरीतकरणी,  खेचरी, शक्तीचालीनी वगैरे मुद्रांचा समावेश होतो. या मुद्रा प्राणधारणेसह अचूकपणे करणे फार आवश्यक आहे. प्राणायाम सहित मुद्राभ्यास केल्याने कुंडलिनी फार लवकर जागृत होते. काळजीपूर्वकच कराव्यात. मग ध्यान हे अंग सांगितले आहे. तदनंतर जप किंवा मंत्र साधना हे अंग सांगितले आहे. येथे मंत्र साधना म्हणजे नामस्मरण नव्हे. हठयोगात बीज मंत्रांचा विशिष्ठ प्रकारे उपयोग केला जातो. सगळ्यात शेवटचे अंग आहे ब्रह्मस्मरण. एवढी सगळी साधना कशासाठी करायची तर ब्रह्म प्राप्ती साठी. त्यामुळे सदैव ब्रह्म स्मरण करणे किंवा अहं ब्रह्मास्मी अथवा सोहं असा भाव ठसवणे हे महत्वाचे अंग आहे. ही अंगे एवढी महत्वाची मानली गेली आहेत की ती जणू ईश्वराची (शिवाची) अंगे आहेत अशी सांप्रदायिक मान्यता आहे. ही सहा अंगे जो नित्य नियमाने अभ्यासतो त्याला भौतिक, सांसारिक सुखांची भुरळ कधीच पडत नाही. का? कारण त्याला त्यांच्या पेक्षा उच्च कोटीचा आनंद साधनेतून प्राप्त होत असतो.बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 31 January 2017
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates