Untitled 1

महाशिवरात्री २०२० साठी अजपा कुंडलिनी साधना

या आठवड्यात दिनांक २१ फेब्रुवारी २०२० रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे.  वाचकांपैकी अनेकांनी आपापल्या परीने महाशिवरात्र साजरी करण्याचे योजले असणार यात शंका नाही. मागील महाशिवरात्रीला कुंडलिनी मंत्रयोगातील एक साधना दिली होती. अनेकांनी ती आवडल्याचे आवर्जून सांगितले होते. तोच धागा पकडून या वर्षी सुद्धा काही साधना देत आहे. जे वाचक नित्य नेमाने या वेब साईटवर विषद केलेली अजपा साधना करत आहेत त्यांच्यासाठी हे अजपा साधनेचे एक विशिष्ठ आवर्तन आहे.  हे आवर्तन चतुर्दशी तिथीच्या रात्रीच्या चार प्रहरांमध्ये करायचे आहे. एकाच बैठकीत या साधना-क्रिया करायच्या नाहीत हे लक्षात घ्यावे.

प्रथमतः आपण २०२० च्या महाशिवरात्रीच्या मुहुर्ता विषयी थोडे जाणून घेऊ. आजकाल लोकांचं दैनंदिन जीवन एवढं वेगवान आणि धकाधकीच झालेलं आहे की लोकं जेमतेम दिनदर्शिकेमधील महाशिवरात्रीचा ठळक लाल रंगात छापलेला दिवस बघतात आणि त्या दिवसाप्रमाणे जेंव्हा जमेल तेंव्हा शिव उपासना करतात. काहीच न करण्यापेक्षा हा प्रकार नक्कींच चांगला आहे हे खरं पण जर थोडी माहिती करून घेतली तर त्या दिवशीची उपासना तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. खाली मी महाशिवरात्रीचे मुहूर्त ढोबळमानाने देत आहे. जी अजपा साधना मी देणार आहे त्यासाठी ते पुरेसे आहेत.

महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथी ही २१ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी साधारण ५:२० ला सुरु होणार आहे आणि २२ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी साधारणपणे ७:०२ रोजी संपणार आहे. महाशिवरात्रीच्या उपासनेत रात्रीचे चार प्रहर आणि निशीथ काळ यांचे विशेष महत्व आहे. त्यामुळे ते कालखंड कोणते ते सांगतो.

प्रथम प्रहर २१ तारखेला साधारणपणे सायंकाळी ६:३० ते ९:३० या दरम्यान आहे. दुसरा प्रहर ढोबळमानाने रात्री ९:३० ते १२:४० या वेळेत आहे. तिसरा प्रहर साधारणतः रात्री १२:४० ते पहाटे ३:४५ (म्हणजे २२ फेब्रुवारीला) पर्यंत आहे. चौथा प्रहर त्यानंतर ६:५५ पर्यंत आहे. सर्वात महत्वाचा काळ ज्याला निशीथ काळ म्हणतात तो रात्री १२:१५ ते १:०५ या दरम्यान सुमारे ५० मिनिटे आहे.

आता या प्रत्येक प्रहरात कधी आणि काय साधना करायची ते सांगतो. लक्षात घ्या येथे फक्त साधनेची रूपरेषा देत आहे. यात सांगितलेया क्रिया तुम्हाला येत आहेत असं मी गृहीत धरत आहे. त्या क्रिया शिकवणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. साधना करायला लोकरीचे आसन वापरावे. दिशा उत्तर किंवा पूर्व किंवा घरातल्या देवाकडे तोंड करून. आसन एकदा घातले की तसेच ठेवायचे. चारही प्रहरांची साधना झाली की उचलायचे. जर मधल्या काळात आसनावर अन्य कोणाचा पाय पडण्याची शक्यता असेल तर मात्र उचलून ठेवावे. या काळात एकतर मौन पाळावे किंवा कमीत-कमी बोलावे. स्थूल पूजा, अभिषेक, माळेवरचा जप वगैरे गोष्टी करायच्या असतील तर आपापल्या श्रद्धेनुसार कराव्यात. त्या विषयी मी काही सांगू इच्छित नाही.

प्रथम प्रहरातील साधना २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ ते ७:२१ या दरम्यान करायची आहे. या साधनेत तुमच्या इष्ट मंत्राचा दीर्घ अजपा सहित जप करायचा आहे. जर इष्टमंत्र नसेल किंवा तुम्ही तो विसरला असाल (खरं तर ही विसरण्याची गोष्ट नाही तरी पण जर...) तर भगवान शंकराचा तुमच्या आवडीचा कोणताही मंत्र घ्यावा. साधना संपली की साधना भगवान शंकराला आणि जगदंबा आदिशक्तीला अर्पण करायची.

दुसऱ्या प्रहरातील साधना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते १०:२१ या काळात करायची आहे. यामध्ये ज्ञानमुद्रा धारण करून हंस मंत्रासहित अजपा साधना करायची आहे. लक्षात असुदे श्वास आणि प्रश्वास दोन्ही महत्वाचे आहेत. ही साधना सुद्धा भगवान शंकराला आणि जगदंबा आदिशक्तीला अर्पण करायची आहे.

तिसऱ्या प्रहरातील साधना ही रात्री १ ते १:२१ (आता २२ फुबृवारी सुरु झालेला असेल) या दरम्यान करायची आहे. या साधनेचा मंत्र असेल सोहं आणि पूर्वीप्रमाणेच अजपा विधी नुसार साधना होईल. साधना भगवान शंकराला आणि जगदंबा आदिशक्तीला अर्पण करायची आहे. ज्यांना शक्तीचालन मुद्रा माहित आहे त्यांनी त्याची जोड द्यायला हरकत नाही.

चौथ्या प्रहरातील साधना २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते ४:२१ या काळात करायची आहे. या साधनेसाठी अजपा शांभवी मुद्रे सहित करायची आहे. यावेळी वापरायचा मंत्र जो सांगितला असेल तो वापरायचा आहे. बदलायचा नाही. हा मंत्र वेगळा-वेगळा असू शकतो साधना पूर्वोक्त विधीनुसार भगवान शंकराला आणि जगदंबा आदिशक्तीला अर्पण करायची आहे. येथे चार प्रहरांची साधना संपते.

ज्या साधकांना अजपा योनी मुद्रा माहित आहे त्यांनी ती निशीथ काळी २१ मिनिटे करायची आहे. अद्भुत, अद्भुत, अद्भुत लाभदायक साधना आहे ती या काळात. खरी योनी मुद्रा माहित असलेले साधक कमी असतात. योनी मुद्रेच्या नावाखाली अनेक साधक चुकीच्या काहीतरी वेगळ्याच क्रिया करतात. काही महिन्यांपूर्वी त्याविषयी विस्ताराने लिहिले होते. त्यामुळे आज फार काही येथे सांगत नाही. ज्यांना माहित आहे त्यांना "त" वरून "ताकभात" नक्कीच कळेल. चार प्रहरातील साधना आणि निशीथ काळातील साधना तुम्हाला कदाचित adjust करावी लागेल. ही निशीथ काळातील अजपा योनी मुद्रा साधना "गुरुमंडलाला" पूर्ण श्रद्धेसहित अर्पण करायची आहे.

ज्या नवीन वाचकांना अजून अजपा बरोबर करण्याच्या अन्य मुद्रा आणि क्रिया ठावूक नाहीत त्यांना एवढंच सांगीन की -

श्वासरूपी हंसावर मन असू द्यावे, एक दिवस मन आपोआप उन्मन होऊन जाईल.

तर अशी ही महाशिवरात्रीची अजपा साधना. करून तर बघा कसं छान समाधान मिळत ते. रात्रीच्या गुढरम्य वातावरणात भगवान शंकराला साक्षी मानून कुंडलिनी साधना करण्यातील मजा काही औरच असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तरी ती अवश्य चाखायला हवी.

असो.

येऊ घातलेली महाशिवरात्र सर्व योगाभ्यासी वाचकांना कुंडलिनी योगमार्गावर उषःकाल दाखवणारी ठरो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 February 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates