Untitled 1

मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग २

मागील भागात आपण प्रभू श्रीरामांच्या मुखातून मुक्तीचे पाच प्रकार कोणते ते ऐकले. सालोक्य, सामीप्य, सारुप्य आणि सायुज्य या चार प्रकारांपेक्षा कैवल्यमुक्ती श्रेष्ठतम आहे हे ही आपण पाहिले. कैवल्यमुक्ती हस्तगत करण्याचा मार्ग म्हणून उपनिषद प्रणीत ज्ञानमार्ग "मुक्तीकेने" आपल्याला सांगितला आहे. मुक्तीच्या प्रथम चार श्रेण्या ह्या मानवाला त्याच्या पाप-पुण्यादी कार्मांनुसार मानवी देह सांडल्यानंतर प्राप्त होणाऱ्या आहेत. कैवल्यमुक्ती ही ह्याच देहात जिवंतपणी अनुभवायची आहे आणि म्हणूनच ती श्रेष्ठ आहे.

"मुक्तिका" आपल्याला स्पष्टपणे सांगते की जर साधक आधी निर्देश केलेल्या एकशे आठ उपनिषदांचा अभ्यास योग्य अशा गुरुच्या मार्गदर्शनाखाली करेल तर तो जीवनमुक्त होईल. तदनंतर प्रारब्धाचा पूर्ण नाश झाल्यावर यथावकाश तो विदेह्मुक्ती मिळवेल. विस्तारभयास्तव येथे जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या संज्ञांच्या फार खोलात जात नाही. थोडक्यात सांगतो. सर्वसामान्य माणूस हा कर्माभिमानी असतो. त्याच्या हातून घडत असलेल्या प्रत्येक कार्मामागे "मी" पणा असतोच. अगदी उच्च कोटीच्या साधकांमध्ये सुद्धा तो पूर्णपणे लोप पावलेला नसतो. जोवर हा "मी" पणा जागृत आहे तोवर कैवल्यप्राप्ती अशक्य आहे. जेंव्हा साधकाचा हा "मी" पणा पूर्णतः गळून पडतो तेंव्हा त्याच्या हातून घडणारे कर्म निष्काम भावनेने घडू लागते. "मी" पणा गळून पडलेला असा साधक जीवनमुक्त होतो कारण कर्म "तो" करत नसल्याने त्याला कर्मफळ सुद्धा उरत नाही. लक्षात घ्या की ही साधीसुधी गोष्ट नाही. फार उच्च कोटीची ही अवस्था आहे.

जीवनमुक्त झालेला साधक "मी" पणा टाकून जीवन व्यतीत करत असतो. जीवनमुक्त झाल्यावर सुद्धा त्याला देह धारण करणे भाग पडते कारण त्याच्या प्रारब्धाचा पूर्ण नाश अजून झालेला नसतो. जोवर प्रारब्धभोग शिल्लक आहेत तोवर ते भोग फेडण्यासाठी देहधारणा आवश्यक आहे. सर्व प्रारब्धभोग संपल्यावर अशा जीवनमुक्त साधकाचा देह सुद्धा निसर्गनियमानुसार झाडाचे पान गळावे तसा अलगद गळून पडतो. जीवनमुक्ती कडून तो विदेहमुक्तीकडे जातो. आत्मा परमात्म्यात विलीन होतो. "मुक्तीकेत" ही अवस्था एका फार छान उदाहरणाने सांगितलेली आहे. एखाद्या मातीच्या रिकाम्या घड्यात आत आणि बाहेर आकाश ओतप्रोत भरलेले असते. तो घडा म्हणजे तो जीवनमुक्ती हस्तगत केलेला साधक. निष्काम कर्मयोगात मुरल्याने त्याच्या अंतरंगात चराचरात भरलेले ब्रह्मतत्वच भरलेले असते. जर तो मातीचा घडा फुटला तर काय होईल बरे. तर घड्यातील आकाश घड्याबाहेरील आकाशात विलीन होईल. जीवनमुक्त साधकाने प्रारब्धभोग पूर्ण करून त्याचा देह निसर्ग नियमांनुसार ठेवला की जणू त्याचा "घट फुटतो" आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो.

वरील सर्व विवेचन मुद्दाम सोप्या भाषेत दिलेलं आहे. या लेखाच्या दृष्टीने तेवढे पुरेसे आहे. येथे एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी. जोवर प्रारब्ध शिल्लक आहे तोवर देहधारणा आवश्यक आहे. प्रारब्ध हा सुद्धा एका वेगळ्या लेखाचा विषय होतील. जाणकारांनी कर्म आणि प्रारब्धाचे दृढ, अदृढ आणि दृढादृढ असे भेदही सांगितले आहेत. अवतारी मानले गेलेल्या सत्पुरुषांच्या आयुष्याकडे पाहिले की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांनाही प्रारब्धभोग शेष असेपर्यंत देहधारणा करावीच लागली. त्यांच्या आयुष्यात सुद्धा सुख-दु:खाचा खेळ मांडला गेलाच. तो त्यांनी जीवनमुक्त होऊन साक्षीभावाने खेळला. योगमार्गावर योगसाधना जशी महत्वाची आहे तसच प्रारब्धनाश सुद्धा महत्वाचा आहे. त्याविषयी अधिक विस्ताराने "मुक्तिका" आपल्याला नंतर सांगणारच आहे त्यामुळे सध्या अधिक काही सांगत नाही.

मुक्ती विषयक विवेचन केल्यावर आणि एकशे आठ उपनिषदांची नामावली सांगितल्यावर "मुक्तिका" आता उपनिषद ज्ञानाचा अधिकारी शिष्य आणि अधिकारी गुरु यांच्याविषयी काही सांगते. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की मुक्तिका ज्या काळी सांगितले गेले त्या काळी ज्ञान संपादनाची प्रक्रिया ही गुरु-शिष्य परंपरेतूनच होत असे. आजच्या काळातील ज्ञान प्राप्तीचे मार्ग आणि प्राचीन काळचे मार्ग यांत अर्थातच फार मोठा कालसापेक्ष बदल झालेला आहे. त्यामुळे मुक्तीकेच्या या मार्गदर्शनाकडे सुद्धा कालसापेक्ष दृष्टीनेच पहायला हवे. ज्ञान घेणारा आणि ज्ञान देणारा यांच्या प्रात्रापात्रतेबद्दल शास्त्रग्रंथांत बरेच काही सांगितलेले आहे. या सर्व गोष्टींचा उद्देश साधकाला नाउमेद करणे किंवा त्याच्यासमोर काहीतरी बागुलबुवा उभा करणे असा नसून त्याची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सक्षम बनवणे हा आहे. ज्या प्रमाणे आधुनिक काळात शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी काही नियम आणि निकष पाळावे लागतात तसाच प्रकार येथेही आहे.

उपनिषदांतील ज्ञानाची श्रेष्ठता अधोरेखित करण्यासाठी मुक्तिका आपल्याला सांगते की ही एकशे आठ उपनिषदे सर्व उपनिषदांचे सार आहेत. ही उपनिषदे जाणणाऱ्याने एकवेळ आपले राज्य द्यावे पण त्यांतील ज्ञान नास्तिक, कृतघ्न, माझ्या (श्रीरामाच्या) भक्तीला विरोध करणाऱ्या, अयोग्य शास्त्रग्रंथांमुळे भरकटलेल्या आणि गुरुप्रती भक्ती नसलेल्या कोणालाही देऊ नये. या एकशे आठ उपनिषदांतील ज्ञान अशा व्यक्तीला द्यावे जो परोपकारी आहे, ज्याचे वर्तन चांगले आहे, जो शुभ-लक्षणांनी युक्त असून ज्ञानवान आहे. अशा व्यक्तीची आधी नीट पारख करावी आणि मगच त्याला हे ज्ञान प्रदान करावे असा निर्देश सुद्धा मुक्तिका आपल्याला देते.

मुक्तीकेने थोडक्यात अधिकारी शिष्याच्या लक्षणांकडे निर्देश केलेला आहे. हा निर्देश स्पष्ट असला तरी काहीसा ढोबळ आणि त्रोटक आहे. वेदांत शास्त्रात ज्ञानप्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीची पारख करण्याची एक अधिक सुस्पष्ट व्याख्या आहे. मुक्तिका त्याकडेही निर्देश करते - साधन चतुष्टय. वेदांत ज्ञानाच्या गाभ्यात ज्याला प्रवेश करायचा आहे त्याच्या कडे चार प्रकारच्या योग्यता असणे आवश्यक मानले गेले आहे. त्यालाच साधन चतुष्टय म्हणतात. आदी शंकराचार्यांसाराख्या वेदांत मार्गावरील दिग्गजाने "साधन चतुष्टय" आपल्या ग्रंथांत विषद केलेला आहे यावरून त्याचे महत्व सहज लक्षात यावे.

साधन चतुष्टय म्हणजे - विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी साधकाची मनोभूमी तयार असणे आवश्यक आहे. या चार गुणांनी युक्त असलेला साधक उपनिषदांतील ज्ञान ग्रहण करण्यास पात्र मानला जातो. यांतील प्रत्येक गुण फार महत्वाचा आहे. बहुतेक वेळा आध्यात्मिक प्रगती न होण्याचे किंवा संथ गतीने होण्याचे कारण या गुणांचा अभाव हे असते. जर माती सुपीक नसेल तर कितीही चांगले बियाणे पेरले तरी चांगले पिक येणार नाही हे उघड आहे.

विवेक म्हणजे सत काय आणि असत काय याचा स्पष्ट निर्णय. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा अंतर्मनाने दिलेला स्पष्ट कौल. एका अर्थाने विवेक हा साधकाचा आंतरिक गुरूच असतो कारण तो साधकाला काय करावे आणि काय करू नये ते अगदी सुस्पष्टपणे सांगत असतो. साधकाकडे जर खरा विवेक असेल तर तो वैराग्याला जन्म देतो. ज्यावेळी शाश्वत आणि अशाश्वत यांतील भेद स्पष्टपणे कळतो त्यावेळी आपसूक अशाश्वत गोष्टींची आवड कमी होऊ लागते आणि शाश्वत गोष्टीची आवड वाढू लागते. भौतिक आयुष्य जगण्यासाठी अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी अत्यावश्यक गोष्टींची गरज असली तरी त्यात वैरागी साधक गुरफटून जात नाही. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी त्याच्या व्यक्तिमत्वात स्वयमेव उमटू लागते. विवेक आणि वैराग्य अंगात मुरलेल्या साधकाकडे षटसंपत्ती आपसूक चालून येते. षटसंपत्ती म्हणजे शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरति आणि तितिक्षा हे गुण. त्यांविषयी आगोदर विस्ताराने सांगितले आहे त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही.

मुमुक्षुत्व म्हणजे मोक्ष प्राप्तीची प्रबळ आणि स्थायी इच्छा. सर्वसाधारणतः मुमुक्षु म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारा अशी व्याख्या केली जाते. ढोबळमानाने ती बरोबरच आहे परंतु येथे "प्रबळ" आणि "स्थायी" ही विशेषणे मुद्दम जोडली आहेत. काही वेळा साधकांच्या मनात मोक्ष प्राप्तीची इच्छा तर असते पण अत्यंत मंद प्रमाणात. आधी सर्व सुखोपभोग भोगू आणि मग यथावकाश मुक्ती-मोक्ष वगैरे बघू अशी त्यांची विचारसरणी असते. अशी विचारसरणी असायला हरकत नसली तरी येथे ती अपेक्षित नाही. येथे वेदांताच्या खोल अंतरंगात शिरकाव करून जीवनमुक्ती हस्तगत करण्याची गोष्ट सुरु आहे. त्यासाठी मोक्षप्राप्तीची प्रबळ इच्छाच हवी हे उघड आहे. काही वेळा साधक आध्यात्माकडे वळतो ते त्याच्या आयुष्यातील प्रारब्धभोगांपासून दूर पाळण्यासाठी. आयुष्यात काही दु:खद घडले की माणसाला तात्पुरते वैराग्य येते. सर्वकाही सोडून निघून जावे वगैरे विचार त्याच्या मनात घोळू लागतात. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या त्याचे हे वैराग्य काही खरे वैराग्य असत नाही. वाईट काळ सरला की असं तात्पुरतं वैराग्य असलेला व्यक्ती परत भौतिक आयुष्यात रमून जातो. त्यासाठी "स्थायी" असं म्हटलं आहे. 

उपनिषद ज्ञानाचा अधिकारी शिष्य कसा असावा ते सांगितल्यावर साधकाने कशा प्रकारचा गुरु ग्रहण करावा ते मुक्तिका सांगत आहे. हा गुरु कसा हवा तर उपनिषद प्रणीत जीवनशैलीला ज्याचे आयुष्य समर्पित आहे असा हवा. तात्पर्य हे की "लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण" असा तो असू नये तर तो स्वतः अध्यात्ममार्गाचा प्रामाणिक वाटसरू असला पाहिजे. तो अर्थातच वेद-शास्त्रांचा गाढा अभ्यास असलेला असायला हवा कारण तरच तो उपनिषदांचे अंतरंग शिष्यापुढे प्रकट करू शकेल. तो साध्या सरळ स्वभावाचा असावा. त्याला चांगल्या सर्वसंमत शास्त्रांत रस असावा. परोपकार आणि भूतदया यांविषयी तो सजग असावा अर्थात तो दयाशील असावा. अशा गुरूकडे अत्यंत विनयाने जावे. त्याच्या पुढे नतमस्तक होऊन उपहार वगैरे देऊन त्याला प्रसन्न करावे आणि त्याच्याकडून यथाविधी एकशे आठ उपनिषदांतील ज्ञान ग्रहण करावे.

उपनिषदांतील ज्ञान ग्रहण करणे हा या प्रक्रियेतील एक भाग झाला. त्याच बरोबर मनाने त्या ज्ञानात अधिष्ठित होणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. ते कसे साधायचे त्याविषयी आपण पुढल्या भागात जाणून घेऊ.

असो.

बुद्धी आणि विवेक यांची देवता असलेल्या गणरायांचे आगमन लवकरच होणार आहे. त्यांच्या आशीर्वादाने योगाभ्यासी वाचकांच्या ज्ञानग्रहणाचा "श्रीगणेशा" होवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 August 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates