हठयोग प्रदीपिका - लेखमाला पुढे सुरू

गेले काही आठवडे शिवोपासनेवर लेखमाला सुरू होती त्यामुळे त्या आधी सुरू केलेली हठयोग प्रदीपिकेवरील लेखमाला अर्धवटच राहिली. आता परत ती सुरू करूया. आता पर्यंतच्या लेखात आपण हठयोगाची पार्श्वभूमी, योगसाधनेला पोषक आणि हानीकारक गोष्टी कोणत्या ते पाहिले. पुढच्या भागात योगजीवनाची मुलतत्वे अर्थात यम आणि नियम यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. परंतू त्या आधी काही गोष्टीं स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणजे पुढे जी मुलतत्वे आपण पाहणार आहोत त्यांचे महत्व लक्षात येईल. 

भारतवर्षामध्ये हजारो वर्षांपासून ऋषी, मुनी, तपस्वी, योगी, संन्यासी, बैरागी शाश्वत सत्याचा शोध घेण्यात मग्न होत आलेले आहेत. या सर्व लोकांनी या जगाविषयीचे आणि शाश्वत सत्याविषयीचे आपापले मत निरनिराळ्या पद्धतीने मांडले आहे. अशा एकुण सहा विचारप्रवाहांना महत्वाचे मानले जाते. त्यांना षडदर्शने असे म्हटले जाते. षड्दर्शनांमधून मुख्यतः चार महत्वाचे प्रश्न हाताळलेले दिसतात. ते चार प्रश्न असे -

  1. दुःखाचे वास्तविक स्वरूप काय आहे?
  2. दुःख कोठून उत्पन्न होते?
  3. दुःखाचा कायमस्वरूपी अभाव (अर्थात शाश्वत आनंद) असलेली स्थिती काय आहे?
  4. दुःखाचा कायमचा नायानाट कसा करता येईल?

ही षडदर्शने खालीलप्रमाणे :

  • सांख्य
  • योग
  • वेदांत
  • मीमांसा
  • न्याय
  • वैशेषिक

या सर्वच दर्शनांचा उहापोह येथे करता येणे शक्य नाही. पण सांख्य, वेदांत आणि योग यावर संक्षिप्त भाष्य अस्थानी ठरणार नाही कारण त्यांचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे.

सांख्यशास्त्र हे द्वैताधिष्ठीत शास्त्र आहे. कपिल मुनींना संख्याचे जनक मानले जाते. सांख्यशास्त्रात पंचवीस तत्वांचा समावेश होतो. ही तत्वे म्हणजे पुरुष, प्रकृती, अहंकार, बुद्धी, मन, पंच तन्मात्रा (गन्ध, स्पर्श, आकार, चव, ध्वनी), पंच ज्ञानेंद्रिये (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ), पंच कर्मेंद्रिये (हात, पाय, गुद, उपस्थ, वाक्), पंच महाभूते (पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश). या पंचवीस तत्वांचे सम्यक ज्ञान हे सांख्यांचे उद्दीष्ट होय. सांख्यशास्त्राच्या मते मुक्ती म्हणजे पुरुषाचा प्रकृतीशी वियोग घडवणे. सांख्य शास्त्रात इश्वर या संकल्पनेला स्थान नाही. तत्वसमास, सांख्यकारिका, षष्टितंत्र, सांख्यसूत्र इत्यादी ग्रंथ सांख्य तत्वज्ञान विषद करतात.

वेदांतशात्र वेदांच्या शेवटच्या भागावर अर्थात उपनिषदांवर आधारलेले आहे. आदि शंकराचार्यांनी प्रतिपादित केलेले वेदांताचे निरुपण सर्वात जास्त प्रमाणात मान्यता पावले आहे. वेदांतशास्त्र अद्वैताचा पुरस्कार करते. वेदांतानुसार एक ब्रह्मच सर्व विश्वात भरून राहिले आहे. देव-देवता या द्वैताधिष्ठीत संकल्पनेला वेदांत शाश्वत सत्य मानत नाही. एक ब्रह्मच सर्व रूपे घेत असल्याने सर्व चेतन अथवा अचेतन वस्तू म्हणजे ब्रह्मच आहेत. वेदांती साधकाच्या दृष्टीने भक्ती दुय्यम असते तर ज्ञान प्रथम असते. वेदांत शात्रानुसार मुक्ती म्हणजे 'सर्वम खलिद्वं ब्रह्म' अर्थात सर्व ब्रह्मच आहे ही प्रत्यक्ष अनुभुती होय. ज्याप्रमाणे अंधारात दोरी भ्रमाने सर्पासमान भासते त्याच प्रमाणे जीव मायेच्या प्रभावाने हे जग सत्य मानतो. मायेचा प्रभाव दुर होताच आपण ब्रह्मच आहोत असे तो जाणतो. हा मार्ग ज्ञानमार्ग म्हणूनही ओळखला जातो. वेदांत शास्त्राचे प्रमुख ग्रंथ म्हणजे उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे. अनेक विद्वान गीतेलाही वेदांत शास्त्राचा ग्रंथ मानतात पण काही तज्ञांना हे मत मान्य नाही कारण गीतेत वेदांताबरोबरच सांख्य, भक्ती आणि योग यांचेही निरूपण आढळते. 

योगशास्त्रात सांख्य आणि वेदांत यांचा सुरेख मेळ आढळतो. पतंजली मुनींना त्यांनी हे शास्त्र सुत्रबद्ध केल्याने त्यांना योगदर्शानाचे प्रणेते मानले जाते. असे असले तरी पतंजलि मुनींच्या आगोदर बराच काळ योग अस्तिवात होता. योग सांख्यांची पंचवीस तत्वे जसीच्या तशी स्विकारते पण या पंचवीस तत्वांपलीकडील इश्वरालाही मानते. योगशात्राचे उद्दीष्ट पुरूषाला (आत्म्याला) इश्वरामधे (परमात्म्यामधे) विलीन करणे हे आहे. म्हणजे योग द्वैतातून अद्वैत असा प्रवास करतो. इश्वराचे अस्तित्व महत्वाचे मानले असल्याने योगशास्त्रात भक्तीला स्थान आहे. कलियुगामधे खरा वेदांती (ज्ञानी) मिळणे अत्यंत कठीण आहे. केवळ 'नेति नेति' अशी पुस्तकी कोरडी बडबड करणे ही एक गोष्ट आणि तशी प्रत्यक्ष अनुभुती प्राप्त करणे ही वेगळी गोष्ट आहे. वेदांतशास्त्रानेही सांख्य आणि योग यांची मते जेथे अद्वैताला बाधा येत नाही तेथे ग्राह्य धरली आहेत. खरे तर वेदांती ज्या अद्वैत वस्तूबद्दल बोलत असतात त्याची प्राप्ती योगसाधनेमार्फतच शक्य आहे. तेव्हा वेदांती साधकालाही आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगशास्त्राचीच कास धरावी लागते. योगशास्त्राचे मुख्य ग्रंथ म्हणजे पतंजलि योगसूत्रे, योगोपनिषदे, शैव आणि शाक्त आगम आणि नाथसिद्धांचे साहित्य.

योगशास्त्रातील मुलतत्वे जी आपण पाहणार आहोत ती आली कोठून? ही योगशास्त्राने अन्य कोणाकडून "उचललेली" नाहीत तर स्वतःच्या अनुभवाच्या आधारे पडताळून पाहिली आहेत आणि विकसीत केली आहेत. त्यानंतर त्यांचा प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबर समांतर विकास झालेला आढळतो. एक व्यावहारीक उदाहरण घेऊ. समजा तुमच्याकडे एक मोबाईल आणि त्याचे युजर मॅन्युअल आहे. आता या दोन गोष्टींपैकी कोणती गोष्ट प्रथम बनली असली पाहिजे? अर्थातच मोबाईल. काही तंत्रज्ञ प्रथम एकत्र आले. त्यांनी संशोधन करून, अनेकानेक प्रयोग करून तो मोबाईल बनवला. तो बनवल्यानंतर त्यांनी तो नीट चालतो ना याची पारख केली. एकदा त्यांची तो व्यवस्थित मनासारखा बनल्याची खात्री बनल्यानंतर त्यांनी त्याचे युजर मॅन्युअल लिहिले. अगदी हाच प्रकार योगशास्त्राच्या बाबतीत घडला आहे. हजारो वर्षांपूर्वी योग्यांनी प्रथम स्वतःचा शरीर-मनावर प्रयोग केले. त्यांवर ताबा कसा मिळवावा याचे तंत्र आत्मसात केले. मिळवलेल्या ज्ञानाचा शाश्वत आनंदाच्या प्राप्तीकरता उपयोग होत आहे याची खात्री पटल्यानंतर त्यांनी त्याला शास्त्ररूपात मांडले. हे शास्त्रच योगदर्शनाच्या रूपाने प्राचीन भारतीय संस्कृतीमधे समाविष्ट झाले. असो.

ही तत्वे योगशास्त्रात यम आणि नियम म्हणून ओळखली जातात. दहा यम आणि दहा नियम अशी एकंदरीत वीस तत्वे योगजीवनाचे आधारस्थंभ आहेत. येथे काही वाचक अशी शंका घेतील की पतंजलि योगदर्शनामधे तर पाच यम आणि पाच नियम आहेत. ते वेगळे आहेत का? तर नाही. पतंजलि मुनींनी तीच वीस तत्वे काहीशा वेगळ्या आणि संक्षिप्त स्वरूपात मांडली आहेत. जाबालदर्शनोपनिषद, वराहोपनिषद, शांडील्योपनिषद इत्यादी उपनिषदांमधे आणि अनेक पुराणांमधेही यम-नियमांचे वर्णन आढळते (हे फक्त काही मोजके ग्रंथच उदाहरणादाखल सांगितले). काही योगग्रंथ यम-नियम वगळून योगशास्त्राची अन्य अंगेच विषद करतात (म्हणजे अष्टांगयोग च्या ऐवजी षडांगयोग). याचा अर्थ त्या ग्रंथकर्त्यांना यम-नियम माहीत नव्हते किंवा मान्य नव्हते असे नव्हे तर योगशास्त्रात यम-नियम एवढे सर्वसंमत आहेत की त्यांवर वेगळे भाष्य करण्याची गरज त्यांना वाटली नाही. हठयोग प्रदीपिकेमध्ये स्वात्मारामाने मुळचे दहा यम आणि दहा नियमच स्विकारले आहेत. पतंजलि मुनींची मांडणी जास्त तार्किक आणि सुटसुटीत असली तरी संक्षिप्ततेमुळे सामान्य साधकाला पटकन कळत नाही. हठयोग प्रदीपिकेने स्विकारलेली मांडणी सामान्य साधकाच्या दृष्टीने जास्त सोपी आणि स्पष्ट आहे आणि तीच आपण पुढील भागात विस्ताराने जाणून घेणार आहोत.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 September 2010


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे योगग्रंथ लेखमाला नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates