नववर्षाच्या निमीत्ताने

नववर्षाच्या निमीत्ताने...

लेखक : बिपीन जोशी

माझ्या अजपा ध्यानाच्या काही विद्यार्थ्यांनी विनंती केली की नव्या वर्षाच्या आगमनानिमीत्त काहीतरी लिहावे म्हणून सध्या चालू असलेली हठयोग प्रदीपिकेवरील लेखमाला क्षणभर बाजूला ठेवून हे लिहिण्याचे ठरवले. थोडे आधीच लिहितोय कारण नाताळनंतर बरेच जण 'फेस्टिव्ह मूड' मधे असतात. काहींना सुट्ट्याही असतात. 

जुन्या वर्षाची संध्याकाळ दृष्टीपथात आहे. लवकरच जुने वर्ष इतिहासाच्या अंधारात गुडूप होईल आणि अजून एक नवे वर्ष आशा-आकांक्षांच्या सूर्यप्रकाशात न्हावून आपल्यापुढे हजर होईल. खरंतर वर्षामागून वर्षे येत असतात आणि जात असतात. आपण त्यांच स्वागत केले नाही तरी. मग या अनादी कालापासून घडणार्‍या घटनेचे स्वागत का करायचे? वर्षामागून वर्षे सरणे ही जरी एक सामान्य घटना असली तरी आपल्या प्रत्येकासाठी ती एक संधी असते. आपल्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची. आपण आतापर्यंत काय कमावले आणि काय गमावले हे अंतर्मुख होऊन तपासण्याची. यापूढच्या आयुष्याची दिशा ठरवण्याची. आपण कोण आहोत? काय करत आहोत? आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? आपण त्यापर्यंत कसे पोहोचणार आहोत? या आणि अशा अनेक प्रश्नांवर नव्या उमेदीने विचार करण्याची ही संधी असते. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो पंचेंद्रियांमधे फार गुरफटून जातो. त्याला वारंवार त्याच्या आध्यात्मिक ध्येयाची आठवण करून द्यावी लागते. वारंवार प्रोत्साहित करावे लागते. तेव्हा कुठे अध्यात्ममार्गावरचा प्रवास अखंडीतपणे सुरू रहातो. नवे वर्ष हे सर्व करण्याची संधी प्रदान करत असते.

माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून एक गोष्ट मी नेहमी सांगतो ती म्हणजे - पुस्तकी ज्ञानाचा या मार्गावर तुम्हाला फारसा उपयोग नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला कोणतेही पुस्तकी ज्ञान पाजणार नाहिये. मी तुम्हाला जगदगुरू रामकृष्ण परमहंस यांच्या तीन छोट्या गोष्टी सांगणार आहे. यातील प्रत्येक गोष्ट एक साधक म्हणून तुम्हाला काहीतरी शिकवते. तेव्हा त्या काळजीपूर्वक वाचा. त्यांवर मनन करा. नव्या वर्षात तुमच्या आयुष्यात त्या कशा उपयोगात आणता येतील याचा विचार करा.

गोष्ट पहिली

एकदा रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे वेदांतशास्त्रातील गुरू तोतापुरी बोलत बसले होते. रामकृष्ण त्यांना न्यांगटा असे संबोधत असत. बोलता बोलता रामकृष्णांनी त्यांना विचारले, "काय रे न्यांगटा! तु एवढा निर्विकल्प समाधी सिद्ध केलेला माणूस. मग अजूनही साधना कशाला करतोस?". त्यावर न्यांगटा सावकाश उठले आणि आपला पाणी प्यायचा पितळेचा लोटा घेवून आले. तो रामकृष्णांना दाखवत ते म्हणाले, "हा लोटा मला रोज जेवण झाल्यावर घासून पुसून लख्ख ठेवावा लागतो. मी तसे न करीन तर काही दिवसातच तो डागाळून जाईल. अध्यात्ममार्गाचेही तसेच आहे."

तात्पर्य:

पहा. न्यांगटा हा रामकृष्णांचा गुरू. त्याचा अधिकार काय भारी असला पाहिजे. निर्विकल्प समाधी सिद्ध केलेला तो पण तरीही साधनारत असे. तुम्हाला जर योगी व्हायचे असेल तर साधनेला कधीही अंतर देवू नका. एखाद दिवस जरी साधना चुकली तर स्वतःचा धिक्कार करा. तुम्ही जेवण चुकवता का? श्वास घेणे चुकवता का? मग साधनाही तशीच रक्तात भिनली पाहिजे. साधनेशिवाय योग साधणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. दैनंदीन कार्ये, घर, संसार, नोकरी, पैसा, मित्रमंडळी, नातेवाईक हे सर्व ठिक आहे पण त्यांच्या संगतीमुळे साधना सुटता कामा नये.

गोष्ट दुसरी

रामकृष्णांचे वेदांतगुरू न्यांगटा स्वतःजवळ नेहमी एक चिमटा बाळगत असे. त्या चिमट्याने तो त्याच्या धूनीतील निखारे सारखे करत असे. या चिमट्याला दुसर्‍याकोणीही हात लावलेला त्याला खपत नसे. एकदा रामकृष्ण परमहंस आणि न्यांगटा वेदांतशस्त्रावर चर्चा करत बसले होते. तेवढ्यात एका माणसाने न्यांगट्याचा चिमटा पळवला. न्यांगटा रागावून त्या माणसावर धावून गेले. त्याचा पाठलाग करून, त्याला रागाने बोल लावत त्यांनी तो चिमटा परत मिळवला. हे सर्व घडत असताना रामकृष्ण पोट धरून 'खो-खो' हसत होतो. परत आल्यावर न्यांगटा त्याना म्हणाला, "काय रे! त्याने माझा चिमटा पळवला आणि तु का मोठ्याने हसतोयस?". त्यावर रामकृष्ण उत्तरले, "अरे न्यांगटा! तु आता ना मला सांगत होतास की सर्व जग ब्रह्म आहे. प्रत्येक जीवात ब्रह्म ठासून भरलेले आहे म्हणून. आणि त्या माणसाने तुझा चिमटा काय पळवला तु हे सर्व विसरून त्याला मारायला धावलास." उत्तर एकून न्यांगटा वरमला. म्हणाला, "खरे आहे! माझे चुकले खरे. आजपासून मी कोणावरही क्रोध करणार नाही."

तात्पर्य:

पहा. जर न्यांगटा सारख्या सिद्ध योग्याची ही अवस्था तर इतरांची काय कथा. अध्यात्ममार्गावर तुम्हाला कितीही अनुभव येवोत पण कधीही आपले हात आकाशाला पोहोचले असे समजू नका. आदिशक्तीची माया अत्यंत गहन आहे. ती तरून जाणे महाकठीण गोष्ट. आयुष्यभर नम्रभावाने साधनारत रहा. योगभ्रष्ट होण्याचा धोका पदोपदी असतो. दुसर्‍यापुढे आढ्यताखोरपणे तुमच्या आध्यात्मिक ज्ञानाचे आणि प्रगतीचे जाहिर प्रदर्शन करू नका.

गोष्ट तिसरी

रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना गोष्ट सांगत होते.

एकदा एक सोनार होता. एक दिवस अचानक त्याची जीभ उलटी होवून टाळूला घट्ट चिकटली (योगशास्त्रात याला खेचरी मुद्रा असे म्हणतात). तो जणू समाधीत गेला. त्याचे बाह्य जगताचे भान हरपले. त्याच स्थितीत तो बराच काळ होता. लोकांना हे समजले. ते त्याला पहायला येऊ लागले. लांबच लांब रांगा लागल्या. लोक त्याला नमस्कार करू लागले. त्याला हार-फुले अर्पण केले जाऊ लागले. अनेक वर्षांनंतर अचानक त्याची जीभ परत खाली आली आणि तो भानावर आला. शुद्ध आल्यावर तो परत घरी गेला. आपला संसार, मुले-बाळे, सोनारकी यात गर्क झाला.

गोष्ट सांगून झाल्यावर परमहंस म्हणाले, "या सगळ्या (जीभ चिकटणे वगैरे) बाह्य गोष्टी झाल्या. त्यांचा काय उपयोग?"

तात्पर्य:

पहा. त्या सोनाराला खेचरी सिद्ध झाली. समाधी लागली. परतल्यावर त्याने काय केले? स्वतःला संसारात गुरफटवून घेतले. काय उपयोग त्या खेचरीचा आणि जड समाधीचा? उत्फुर्त क्रिया, दर्शने, शरीरावर ताबा, प्राणायाम, बन्ध इत्यादी सर्व गोष्टी केवळ बाह्य आहेत. बहुतेक साधक याच गोष्टींमधे धन्यता मानतात. या गोष्टींचा स्वतःचा असा काही अर्थ आहे नाही असे नाही पण त्या म्हणजे सर्वस्व नाहीत. खर्‍या आध्यात्मिक प्रगतीची केवळ दोनच लक्षणे आहेत - मनोलय आणि वैराग्य. साधनेद्वारे जर तुमच्या मनी वैराग्य प्रगट होत नसेल, चित्तवृत्ती क्षीण होत नसतील तर अशी साधना म्हणजे व्यर्थ भारच आहे. काही तात्पुरती शारीरिक लक्षणे म्हणजे योग नव्हे. तेव्हा केवळ त्यांतच समाधान मानू नका.

 

बस. सध्या एवढेच. आदिगुरू भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना की नवीन वर्षी त्याने सर्वांना अध्यात्ममार्गावर उत्तरोत्तर अग्रेसर करावे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 December 2009


Tags : योग अध्यात्म कथा विचार