Untitled 1

कुंडलिनीची पिपीलिका, मर्कट आणि विहंग गती

कुंडलिनी जागृती हा योगसाधकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यापासूनच पुढे खरी आध्यात्मिक प्रगती होत असते. हठयोगातील प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे योगक्रीयांचे आध्यात्मिक उद्दिष्ठ कुंडलिनी जागृती हेच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे साधकही असंख्य प्रकारचे असतात. प्रत्येक साधकाची जागृत झालेली कुंडलिनी सहस्रार चक्रातील शिवाला भेटण्यासाठी आसुसलेली असते हे जरी खरं असलं तरी कुंडलिनीचा हा मार्ग आणि या मार्गावरील तिची गती ही भिन्न भिन्न प्रकारची असते.

प्राचीन योगाग्रंथांमध्ये कुंडलिनीची गती तीन प्रकारची असल्याचा उल्लेख आढळतो. कुंडलिनीचा संबंध थेट आध्यात्मिक प्रगतीशी असल्याने आध्यात्मिक प्रगतीची गतीही तीन प्रकारची असते. हे तीन प्रकार खालील प्रमाणे:

  • पिपीलिका गती
  • मर्कट गती
  • विहंग गती

पिपीलिका म्हणजे मुंगी. या प्रकारात जागृत झालेली कुंडलिनी सहस्त्रारात मुंगीसारखी हळू-हळू सावकाश पण स्थिरपणे जाते. समजा एका मुंगीला जमिनीवरून झाडाच्या शेंड्यापर्यंत जायचे आहे तर ति कशी जाईल? अर्थातच हळू-हळू पण अथक प्रयत्नाने ती तेथपर्यंत पोहोचेल. असा साधकही प्रगती अशीच अगदी सावकाशपणे करतो पण एक ना एक दिवस तो आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतोच. ज्या साधकांना साधनेला बसल्यावर हातापायाला मुंग्या येतात, मेरुदंडाला मुंग्या किंवा गुदगुल्या होताहेत असं वाटते. क्वचित प्रसंगी शरीरात हळुवार कंपने उमटतात आणि प्राणायाम केल्यावर हलका घाम आल्यासारखं वाटतं असे साधक साधारणतः पिपीलिका गतीने प्रवास करत असतात. ही झाली शारीरिक लक्षणे. मानसिक स्तरावर अशा साधकाला अध्यात्मात रस तर असतो परंतु पराकोटीचे वैराग्य किंवा संसाराविषयी उदासीनता अशा गोष्टींचा अभाव असतो. त्याचे मन भौतिक गोष्टींत गुंतलेले असते. प्रथम सुखोपभोग आणि मग अध्यात्म अशी त्याची जीवनशैली असते. पिपीलिका गती सर्वात संथ असल्याने अशा साधकाची प्रगती होण्यासही बऱ्याच वर्षांचा काळ जाऊ शकतो.

मर्कट गती अर्थात माकडा सारखी गती. माकड झाडावर कसे चढते? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर. कधी थांबत, विश्रांती घेत. कधी एखादे फळ तोडून त्याचा आस्वाद घेत. मुंगीपेक्षा मर्कट गती जास्त वेगवान असते हे खरे पण या गतीमुळे साधक गोंधळून जाण्याची शक्यता असते. असा साधक कधी दिवसाच्या दिवस ईश्वर प्रेमाने ओतप्रोत भरलेला दिसतो तर कधी सामान्यातला सामान्य माणूस भासतो. साधनारत असतांना त्याला कधी अतिशय छान अनुभव येतात तर कधी महिनोंमहिने काहीच अनुभव येत नाही. अशा वेळी तो निराश होऊ शकतो. मर्कट गती साधकाच्या क्रीयांमाध्येही उमटू शकते. साधनेला बसल्यावर शरीर चेंडू उसळल्यावर जसे हलते तसा अनुभव येतो. साधक प्राणायामाचा अभ्यास करत असेल तर प्राण शरीरात बेडकासाराखा उसळ्या मारतो परिणामी आसन स्थिर राहू शकत नाही. कधी क्रिया होतात, शरीर-मन हलकं झाल्यासारखं वाटतं तर कधी साधना कंटाळवाणी वाटते. कधी तो भौतिक सुखोपभोगात मग्न असतो तर कधी आध्यात्मिक आनंदात डुंबत असतो. असे टप्पे पार करत करत एक दिवस तो "शेंड्या पर्यंत" पोहोचतो.

विहंग म्हणजे पक्षी. एखादा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडाच्या शेंड्यावर कसा जाईल? अर्थातच तो एका झाडावरून उडून अधेमधे कुठेही न थांबता थेट दुसऱ्या झाडाच्या शेंड्यापर्यंत जाईल. विहंग गती ही अशी वेगवान असते. कुंडलिनी जागृत झाली कि ती इकडे तिकडे न रेंगाळता थेट सहस्रारात झेपावते. असा साधक अर्थात उच्च कोटीचा असतो. काहीच काळात आत्मसाक्षात्कार रुपी फळ तो हस्तगत करतो. आधुनिक काळात असा साधक क्वचितच आढळतो. वैराग्याच्या लाटेवर स्वार होऊन, सुखोपभोग, जनसंग आणि अहंकार रुपी अडथळे पार करून तो थेट आत्मानंदात डुबकी घेतो.

जगद्नियन्ता श्रीशंकर सर्वाना योगमार्गावर अग्रेसर करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

आता वाचकांच्या काही निवडक प्रश्नांकडे वळू.

प्रश्न : मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावं लागेल? कुंडलिनी जागृती विषयी मला काही माहिती नाही. काही पुस्तकं सुचवू शकाल का?

मनाची एकाग्रता वाढवण्यामागाचे तुमचे उद्दिष्ठ काय आहे त्यावर साधना अवलंबून आहे. समजा एखाद्या शाळेतल्या मुलाला अभ्यासात लक्ष चांगल्याप्रकारे लागावे म्हणून एकाग्रता वाढवायची आहे. त्याचे उद्दिष्ठ आध्यात्मिक प्रगती हे नसल्यामुळे त्याला कुंडलिनी जागृतीची गरज असणार नाही. त्याला हठयोगातील त्राटक, ओंकार किंवा गायत्री मंत्राचा जप अशा साधना जास्त उपयुक्त ठरतील. याउलट जर एखाद्या साधकाला आध्यात्मिक प्रगती साठी आणि ध्यान उत्तम प्रकारे लागण्यासाठी एकाग्रतेची गरज असेल तर जप आणि अजपा साधना जास्त उपयोगी ठरतील.

कुंडलिनी जागृती विषयी या वेब साईटच्या मुख्यपृष्ठावर विस्तृत विवेचन दिलेले आहे ते वाचावे.  आमच्यातर्फे प्रकाशित झालेली दोन पुस्तके - देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु - अवश्य वाचावीत. त्यात या विषयाचे विस्तृत विवरण आणि साधना दिलेल्या आहेत.

जगद्नियन्ता श्रीशंकर तुम्हाला योगमार्गावर अग्रेसर करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

प्रश्न : मुलाधार ते सहस्रार या चक्रांचे बीजमंत्र अनुक्रमे लं, वं, रं, यं, हं, क्षं आणि ॐ असे आहेत. प्रत्येक चक्राच्या एकेका दलावरही बीजाक्षरे आहेत. परंतु बीजमंत्र आणि बीजाक्षरे यांची तुलना केल्यास स्वाधिष्ठानाच्या दलावरील लं हा मूलाधाराचा बीजमंत्र , मूलाधाराच्या दलावरील वं हा स्वाधिष्ठानाचा बीजमंत्र, स्वाधिष्ठानाच्या दलावरील रं हा मणिपूराचा बीजमंत्र असे एका दलावरील अक्षर दुसर्‍याच दलावरील बीजमंत्र आहे, असे आढळते. यामागे शास्त्र काय? आणि याचा अर्थ काय? हे कृपया सांगावे.

चक्रांच्या पाकळ्यांवरील बीजाक्षरे आणि चक्राचे बीजाक्षर या दोन भिन्न गोष्टी आहेत. जर नीट लक्षपुर्वक पाहिले तर असं आढळेल की मुलाधार ते सहस्रार या चक्रांच्या दलांवर संस्कृत वर्णमालेतील जवळजवळ सगळी अक्षरे पसरलेली आहेत. याला कुंडलिनी योगशास्त्रात मातृका शक्ती म्हणतात. तर पाकळ्यांवर आहेत त्या मातृका. चक्रांचे बीजमंत्र हे खरंतर त्या त्या स्थावरील तत्वांचे बीजमंत्र आहेत. उदाहरणार्थ मुलाधारात पृथ्वीतत्वाचे आधिक्य आहे आणि पृथ्वीतत्वाचा बीजमंत्र आहे लं. म्हणून मुलाधाराचा बीजमंत्र लं मानला गेला आहे. हाच प्रकार अन्य चक्रांच्या बाबतीतही आहे.

जगद्नियन्ता श्रीशंकर तुम्हाला योगमार्गावर अग्रेसर करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

 


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Posted On : 14 September 2015


Tags : योग कुंडलिनी

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates