Untitled 1

बिझी लोकांसाठी अजपाचे विशेष लघु आवर्तन

आधुनिक काळातील बहुतेक लोकांची जीवनशैली ही अत्यंत धकाधकीची आणि व्यस्त झालेली आहे. स्वतःसाठी दोन-पाच मिनिटेही काढणे लोकांना अवघड झाले आहे. अहोरात्र कशाततरी "बिझी" राहायचे हा संदेश आधुनिक जीवनशैलीने मानवी मनावर जणू गोंदवलेला आहे. त्यामुळे सध्या काही लोकांची काय गंमत काय होते आहे पहा. एरवी माणसं "बिझी" पणाच्या ओझ्याखाली दैनंदिन जीवनाचे गाडे ओढत असतात. सध्या त्यांना भरपूर वेळ उपलब्ध होतो आहे तर त्या उपलब्ध वेळाचे नेमके करायचे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. एरवी "छंद जोपासता येत नाहीत", "स्वतःसाठी वेळ मिळत नाही", "साधनेसाठी फुरसत नाही" अशा तक्रारी करणारी मंडळी हा काहीसा अनपेक्षितपणे मिळालेला वेळ सत्कारणी लावू शकत नाहीत. कारण आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय, आपण नक्की आयुष्यातून काय शोधतोय, आपल्याला आनंद नक्की कशातून मिळेल, आजूबाजूच्या छोट्या-छोट्या गोष्टींनी आयुष्याचे कोलाज कसे सजवता येईल वगैरे कुटप्रश्नांचा विचार त्यांनी कधी केलेलाच नसतो. ज्यांनी ह्या प्रश्नांचा स्वतःशी उहापोह केलेला आहे त्यांना वेळेचा सदुपयोग शिकवावा लागत नाही. तो त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो.

असो.

ज्या लोकांना अशा "बिझी" पणाचा दररोज सामना करावा लागतो त्यांची एक नेहमीची तक्रार असते. साधनेसाठी वेळ काढणे त्यांना दुरापास्त झालेले असते. साधनेचा कंटाळा करणे हा एक भाग झाला पण त्याच बरोबर साधनेला वेळ न मिळणे हा सुद्धा त्यांना भेडसावणारा प्रश्न असतो. अजपा साधनेसाठी तासन-तास तर सोडाच पण २१ मिनिटेही देणं त्यांना शक्य होत नाही. अशाच साधकांसाठी आज एक उपाय सांगणार आहे. एक लक्षात ठेवा की अजपा साधनेचे हे लघु आवर्तन जेंव्हा पूर्ण आवर्तन करण्यास वेळ मिळणार नाही तेंव्हाच करायचे आहे. पूर्ण आवर्तनाचे फायदे अर्थातच अधिक असतात. आयुष्यात जेंव्हा कामकाजात पूर्णतः गुरफटलेले असाल किंवा अन्य काही कारणांनी "अजपा गायत्रीला" आवश्यक तो वेळ देता येणार नसेल तर हे लघु आवर्तन करावे.

या लघु आवर्तनाचे दोन फायदे होतात. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे साधना खंडित होत नाही. साधनेची continuity टिकून रहाते. आपक्या शरीराचे जसं body clock असतं तसच साधनेचे सुद्धा मोजमाप आपोआप घडत असते. साधना जर पूर्ण खंडित झाली तर तिला गंज चढतो. पुन्हा चालू केल्यावर मग परत पूर्वपदावर यायला जास्त वेळ लागतो. दुसरा फायदा हा की अजपाचे फायदे अखंडित मिळत रहातात. अजपा ही ध्यानात्मक साधना असल्याने तणाव-मुक्ती पासून ते आध्यात्मिक प्रगतीपर्यंत जे काही फायदे आहेत ते कमी प्रमाणात का होईना पण अव्याहत पणे साधकाला मिळत रहातात.

चला तर आता फार चर्चा न करता पटकन तुम्हाला हे अजपाचे लघु आवर्तन कसे करायचे ते सांगतो. हे आवर्तन करण्यासाठी जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर अति उत्तम. घड्याळावर सुद्धा हे आवर्तन बसवू शकता पण मग मधून-मधून घड्याळ बघायला लागतं आणि मन अस्थिर होण्याचा धोका असतो. मी असं गृहीत धरतो की तुम्ही जपमाळ वापरणार आहात. या जपमाळेला दर २७ मणी झाले की सुताने खुणेची गाठ बांधा. म्हणजे माळेचे २७-२७-२७-२७ असे चार भाग तयार होतील.

आपल्या नेहमीच्या आसनावर डोळे मिटून बसा. पाठीचा कणा ताठ. डोकं सरळ ठेवा. आता उजव्या हातात जपमाळ घ्या. मध्यमा आणि अंगठा यांच्या सहाय्याने तुम्हाला मणी फिरवायचे आहेत. तुमच्या पैकी जे जप करतात त्याना हे ठावूक असेलच.

आता प्रथम तुमचा जो इष्ट मंत्र आहे त्याची शांत चित्ताने २७ आवर्तने करा. आवर्तने करत असतांना अर्थातच जपमाळेचा उपयोग करून ती आवर्तने मोजा. इष्टमंत्राचा जप सत्तावीस वेळा करून झाला की पहिला टप्पा संपला.

आता न थांबता किंवा माळ खाली न ठेवता दुसऱ्या टप्प्याकडे जायचे आहे. दुसऱ्या टप्प्यात दीर्घ श्वसना सहित अजपा जप करायचा आहे. याचा अर्थ "सो" च्या मानसिक जपा सहित दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि "हं" च्या मानसिक जपा सहित दीर्घ उच्छ्वास करायचा आहे. श्वास आणि प्रश्वास यांची "लांबी" सारखी असायला सारखी अर्थात १:१ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे सत्तावीस वेळा दीर्घ अजपा मोजायचा आहे. जर तुम्ही "सोहं" ऐवजी "हंस" मंत्र वापरत असाल तर त्यानुसार वरील प्रक्रियेत बदल करा.

आता आवर्तनाचा तिसरा टप्पा सुरु होतो. यात "सोहं" जप वरील प्रमाणेच केला जातो पण श्वास दीर्घ न घेता मध्यम प्रमाणात घेतले जातात. प्रमाण वरीलप्रमाणे १:१ असेच ठेवावे. हा मध्यम जप सुद्धा सत्तावीस वेळा करायचा आहे.

आता लघु साधनेचा शेवटचा टप्पा सुरु होतो. या मध्ये नैसर्गिक श्वासांवर लक्ष देत देत अजपा जप करायचा आहे. जाणीव पूर्वक दीर्घ श्वास नाहीत, मध्यम श्वास नाहीत, फक्त नैसर्गिकपणे श्वासांमार्फात होणारी प्राणशक्तीची अभिव्यक्ती सत्तावीस वेळा मोजायची आहे.

लघु आवर्तनाचे चारही भाग मिळून १०८ ची "साधना माला" पूर्ण होईल. आता जपमाळ खाली ठेऊन १०८ चा जप आपल्या इष्ट दैवतेला समर्पित करायचा आहे. त्या नंतर क्षणभर थांबून ध्यानातून बाहेर यायचं आहे.

आशा आहे "बिझी" साधकांना हा विधी उपयोगी पडेल. एक लक्षात ठेवा की माणसाने कार्यमग्न जरूर असावे पण त्याला काही प्रमाण असावे. बिझीपणाच्या ओझ्याखाली अंतरीचा दैवी स्पंद विसरून चालणार नाही आणि अंतरीचा शोध थांबूनही चालणार नाही.

असो.

जगदंबा कुंडलिनी अजपा गायत्रीच्या स्फुरणाने योगाभ्यासी वाचकांची ज्ञानतृष्णा पूर्ण करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 20 April 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates