Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

ध्यान-धारणेचा मनोवांछित परिणाम

मानसिक ताणताणावांवर रामबाण उपाय म्हणून ध्यान-धारणेकडे पाहिले जाते. जर चिंता, काळज्या, तणाव यांपासून मुक्तता हवी असेल तर ध्यान करा असा सल्ला सर्रास दिला जातो. ढोबळमानाने हा सल्ला बरोबरच असतो परंतु असेही लोकं आढळतात ज्यांना ध्यान-धारणा करूनसुद्धा या बाबतीत म्हणावा तसा फायदा झालेला नसतो. अशा लोकांचा मग ध्यान-धारणे वरील विश्वास तरी उडतो किंवा त्या विषयी ते उदासीन तरी बनतात. असं का बरं होत असावं? ध्यान करून सुद्धा ध्यानाचा फायदा न मिळण्याला कारण काय बरे असावे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आधी आपल्याला ध्यानासंबंधी काही गोष्टींची माहिती करून घ्यावी लागेल.

जर वेगवेगळ्या योगग्रंथांत दिलेल्या ध्यानाच्या व्याख्या तुम्ही अभ्यासल्यात तर त्या व्याख्या प्रामुख्याने खालील दोन गोष्टींच्या भोवती घुटमळतांना दिसतील:

  • ध्यान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करणे
  • ध्यान करणे म्हणजे मनातील विचारांचे दमन करून मनाला निर्विचार बनवणे

ध्यानामार्गावर नवीन असलेल्या साधकांना या दोन व्याख्यांमध्ये काहीसा विरोधाभास किंवा तफावत वाटेल परंतु नीट समजून घेतल्यास त्या एकच गोष्ट सांगत आहेत असं आढळून येईल. विषयाचे नीट आकलन होण्यासाठी थोडं विस्ताराने जाणून घेऊ.

क्षणभर असं समजा की तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेला आहात. आजूबाजूची हिरवीगार झाडेझुडुपे, मऊ गवताचा गालीचा, नाजूक किलबिल करणारे पक्षी, रंगीवेरंगी फुले, रम्य सरोवर इत्यादी गोष्टींचा आस्वाद तुम्ही घेत आहात. वाऱ्यानी हलके थरथरणाऱ्या त्या तलावाच्या काठाशी येऊन तुम्ही निवांत बसलेला आहात. तेवढ्यात तुमची नजर त्या तलावाच्या काठाशी असलेल्या एका कमळावर पडते. त्या कमळाच्या सौंदर्याने तुम्ही मोहित होता आणि त्याकडे टक लावून काळजीपूर्वक पाहू लागता. त्या कमळाच्या पाकळ्या, पाने, रुंजी घालणारे भ्रमर वगैरे गोष्टींत तुम्ही गुंगून जाता. आता तुम्ही त्या कमळाचे जणू "ध्यान" करत असता.

तुम्ही जेंव्हा त्या कमळाकडे एक टक पहात नव्हतात त्यावेळी तुमच्या मनात किती गोष्टींबद्दल विचार होते? झाडे, पक्षी, फुलपाखरे, फुले वगैरे अशा बारा-पंधरा गोष्टींनी तुमचे मन व्यापून गेले होते. त्या कमळाकडे टक लावून पहायला लागल्यावर तुमच्या मनातील या बारा-पंधरा गोष्टी जणू पुसल्या गेल्या आणि तुमच्या मनाला कमळ या एकाच गोष्टीचे आलंबन प्राप्त झाले. याचाच अर्थ एका गोष्टीवर लक्ष एकाग्र झाल्यावर मन अन्य गोष्टींचा आपोआप त्याग करते परिणामी "एकाग्रचित्त होणे" आणि "निर्विचार होणे" अशा दोन्ही गोष्टी घडून येतात. आता वर दिलेल्या ध्यानाच्या दोन व्याख्या प्रत्यक्षात एकच कशा आहेत ते तुम्हाला नीट कळू शकेल.

आता ध्यानाविषयीचा दुसरा मुद्दा जाणून घेऊ.

तुमच्या आयुष्यातील मानसिक चिंता, काळज्या, आणि तणाव यांपासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही ध्यान करत असलात तरी त्या मानसिक अवस्थेचे मूळ कारण माहित असणे आवश्यक आहे. असं समजा की तुम्ही काही कारणाने आजारी आहात आणि उपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे गेला आहात. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर लगेच ते काही तुम्हाला पुडीत औषधं बांधून देत नाहीत. ते आधी तुमच्या प्रकृतीची नीट चौकशी करतात. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून आधी रोगाचे निदान करतात आणि यानंतर त्या रोगावरचे औषध तुम्हाला देतात.

मानसिक तणावांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ध्यानाभ्यास करत असतांना सुद्धा ताणावाचे कारण सूक्ष्मपणे शोधावे लागते. हा मुद्दा नीट कळण्यासाठी काही उदाहरणे देतो.

  • एकाद्या व्यक्तीला त्याच्या ऑफिस मधील प्रोजेक्ट संबंधी चिंता आणि तणाव असू शकतो.
  • एखाद्या व्यक्तीला काही कारणाने नेहमी असुरक्षिततेच्या भावनेने घेरलेले असते आणि त्यामुळे तो तणावग्रस्त असतो.
  • कोणी काही रोग-व्याधींनी त्रासलेला असतो आणि आपल्या आरोग्याविषयीची चिंता त्याला सतावत असते.
  • काही लोकांना नोकरी जाण्याची भीती, नोकरीतील प्रमोशन संबंधी काळजी, नोकरीतील बदली संबंधी चिंता इत्यादी गोष्टींनी घेरलेले असते.
  • एखाद्याला आपल्या कुटुंबाची फार काळजी वाटत असते आणि त्यामुळे तो चिंतातूर असतो.
  • एखाद्याला भौतिक सुखांची आत्यंतिक ओढ असते आणि ती सुखे हिरावली जाण्याची भीती किंवा चिंता असते.
  • कोण्या अध्यात्ममार्गी साधकाला आपली साधनेतील प्रगती, इष्ट देवतेची प्रसन्नता, कर्मसंचय, वैराग्य वगैरे गोष्टींची काळजी सतावत असते.

आता गंमत बघा. वरील सर्व गोष्टी या "मानसिक चिंता अथवा तणाव" या सदरात मोडतात परंतु यांतील प्रत्येक तणावाची स्वतःची अशी खासियत आहे, स्वतःची अशी वैशिष्ठ्ये आहेत. वरील चिंता आणि तणावाने ग्रसित असलेल्या लोकांना आधीच्या उदाहरणातील "कमळावरील ध्यान" करायला सांगितले तर त्यांना फायदा होईल का?

कोणत्याही ध्यानात मानातील विचार काही काळापुरते तरी कमी होत असल्याने अशा लोकांना अल्पकालीन फायदा नक्कीच होईल परंतु अशा "सर्वसाधारण" ध्यानाभ्यासाने चिंतेचे मूळ कारण काही दूर होणार नाही. मनाच्या स्वभावानुसार परत काही तासांनी किंवा दिवसांनी त्या व्यक्तीच्या मनात चिंता घर करू लागेल.

तात्पर्य हे की जर ध्यान-धारणेचा मनोवांछित परिणाम साधायचा असेल तर ध्यान करण्याबरोबरच त्या ध्यानाचा प्रकार आणि विधी-विधान बरोबर निवडले गेले आहे का त्याचाही विचार ध्यानाभ्यासींनी करायला हवा. ज्याप्रमाणे रोगानुसार औषध हा नियम आपण पाळतो त्याचप्रमाणे चिंतेनुसार ध्यानाभ्यास हे सूत्र पाळल्यास ध्यानाचा फायदा दीर्घकालीन टिकणारा ठरतो. सर्वसाधारतः ध्यानाभ्यासाचे उद्दिष्ठ परमेश्वर प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार असे मानले गेले आहे. त्यामुळे हे सूत्र बऱ्याच वेळा दुर्लक्षिले जाते परंतु त्याची आवश्यकता वरील विवेचनावरून लक्षात आली असेल अशी आशा आहे. One-size-fits-all असा प्रकार त्याबाबतीत करून चालत नाही. प्राचीन योगसाहित्यात आपल्या ध्यानाचे विविध प्रकार आणि पद्धती आढळतात त्यामागचे कारण हेच आहे.

अजून एक समांतर उदाहरण देतो. आपल्याकडे अनेक देवी-देवतांची स्तोत्रे प्रचलित आहेत. त्यातील अनेक स्तोत्रांमध्ये त्या-त्या देवी-देवतेच्या ध्यानाचा श्लोक आपल्याला हमखास आढळतो. भगवान शंकराच्या स्तोत्रात मनात शिवध्यान असावे, भगवान विष्णूचे स्तोत्र वाचत असतांना श्रीहरीचे ध्यान मनी ठसावे आणि देवीचे स्तोत्र म्हणत असतांना चित्तात जगदंबेचे रूप व्याप्त असावे असा त्यामागचा उद्देश असतो. एवढंच कशाला एकाच देवी-देवतेच्या भिन्न-भिन्न स्तोत्रांमधील ध्यानात सुद्धा फरक दिसून येतो. एकाच देवतेचे ध्यान कधी सौम्य स्वरूपात तर कधी रौद्र स्वरूपात तर कधी मिश्र स्वरूपात धरले जाते. असा फरक असण्याचे कारण सुद्धा हेच आहे. स्तोत्र पठणातून जी फलप्राप्ती अपेक्षित आहे त्याला साजेसं ध्यान केल्यास स्तोत्र अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असा विचार त्यामागे असतो.

पतंजली योगसूत्रांत धारणा, ध्यान, आणि समाधी यांच्या एकत्रीत अभ्यास प्रक्रियेला संयम असं म्हटलेलं आहे. योगमार्गावरील विभूती किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा संयमाचा अभ्यास आवश्यक मानला गेला आहे. संयमाचे वर्णन करत असतांना पतंजली मुनींनी वेगवेगळ्या विभूतींच्या किंवा सिद्धींच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर संयम करण्याचा उपदेश केलेला आहे. ह्या सर्व विभूतीप्राप्तीच्या खटाटोपामागे सुद्धा वर विषद केलेले "जशी इच्छा तसे ध्यान" हेच सूत्र आहे.

तात्पर्य हे की ध्यान करण्याची जी पद्धती तुम्ही स्वतःसाठी निवडाल ती तुमच्या उद्दिष्ठासाठी पोषक असायला हवी. त्याने तुमचे ध्यान अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल यात शंका नाही. जर ही पद्धती तुम्ही अचूक निवडलीत तर ध्यानाभ्यास हा केवळ Mental Relaxation पुरता मर्यादित न रहाता तो भौतिक आणि आध्यात्मिक इच्छापूर्तीला सहाय्यक असे एक सक्षम साधन बनू शकतो. अजपा ध्यानाचे मूळ उद्दिष्ठ हे आत्मसाक्षात्कार अथवा सोहंबोध असले तरी अजपा ध्यान योग्य प्रकारे Fine Tune केल्यास आणि त्याला अन्य काही सूक्ष्म क्रियांची जोड दिल्यास ते भौतिक स्तरावर सुद्धा आत्यंतिक फलप्रद ठरू शकते. ते कसे साधायचे हा विस्तृत विषय आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी जाणून घेऊ.

असो.

ज्या भगवान शंकराला ध्यानातून जागं करण्यासाठी जगन्माता आतुर झालेली असते तो जगद्नियंता सदाशिव सर्व वाचकांच्या जीवनात ध्यानप्रकाश प्रज्वलित करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 24 October 2022