त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं
आज गणेश चतुर्थी. अवघ्या महाराष्ट्राचं
आराध्य दैवत म्हणजे गणपति. आज जरी गणेश उपासना प्रामुख्याने भक्तिमार्गाने केली जात
असली तरी प्राचीन काळापासून गणपति आणि कुंडलिनी योग यांचा घनिष्ठ संबंध असलेला
आपल्याला पहायला मिळतो. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे समस्त ब्रह्मांड मानवी शरीरातच
विद्यमान आहे. त्याचप्रमाणे सर्व देवी-देवताही शरीरातच स्थानापन्न आहेत.
श्रीगजाननाचे मानवी देहातील स्थान म्हणजे मूलाधार चक्र. याच अर्थाने गणपति
अथर्वशीर्षामध्ये "त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं" असे म्हटले आहे. आजच्या गणेश
चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणपतीचे हे निवासस्थान कसे आहे ते विचारात घेऊया...
तसं पाहायला गेलं तर शरीरस्थ चक्रांचे
वर्णन अनेक प्राचीन योगाग्रंथांत आढळते. उदाहरणार्थ शिवसंहिता, घेरंड संहिता,
षटचक्र निरूपण, योगचूडामणी उपनिषद, योगशिखा उपनिषद, सिद्ध-सिद्धान्त पद्धती या
ग्रंथांत मूलाधार चक्राचे विवरण आढळते. मूलाधार चक्राचे बाह्य शरीरावरील स्थान आहे
शिवण स्थान. मूत्रद्वार आणि मलद्वार यांना जोडणारी व शिवल्यासारखी दिसणारी जी जागा
असते त्याला शिवण स्थान असे म्हणतात. येथेच मूलाधाराचा बाह्य केंद्रबिन्दु आहे.
परंतु प्रत्यक्ष मूलाधार चक्र त्वचेवर नसून शिवण स्थानाच्या दोन बोट आत वरच्या
बाजूस आहे.
मूलाधार चक्राला चार पाकळ्या किंवा दले आहेत. स्थूल शरीरात ही दले म्हणजे
ज्ञानतंतु असून सूक्ष्म शरीरात ती ध्वनि कंपने (sound vibrations) आहेत. वं, शं, षं
आणि सं अशी चार ध्वनि कंपने येथे सांगितली आहेत. या कंपनांचा एक योगागर्भ अर्थ आहे.
विस्तार भयास्तव तो येथे देत नाही परंतु सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने लक्षात
ठेवण्याची गोष्ट म्हणजे सूक्ष्मशरीराची उत्पत्ति "नादापासून" झालेली आहे.
मूलाधार चक्र पृथ्वीतत्वाचे प्रमुख स्थान आहे. शरीरात मल (पृथ्वीतत्व) उत्सर्जन
करण्याची इंद्रिये येथेच आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. पृथ्वीतत्वाचे बीजाक्षर -
लं - हेच मूलाधाराचा बीजमंत्र आहे. पृथ्वी तत्वाची आणि मूलाधार चक्राची शुद्धी
करण्यासाठी हाच मंत्र सांगितला जातो. श्रीगणेशाला पृथ्वीतत्वाची देवता मानतात ते
याच कारणाने. किंबहुना गणेशाचे तुंदिलतनु स्वरूप म्हणजे जड पृथ्वीतत्वाचेच प्रतीक
आहे.
अशा या मूलाधार चक्राचा रंग "रक्तवर्ण" आहे. याचा अर्थ असा की येथे रजोगुणाचे
आधिक्य आहे. प्रत्येक शुभकार्याचा आरंभ करताना गणेशाला वंदन करतात ते याचसाठी.
कोणतेही कार्य जेव्हा काही इच्छा धरून केले जाते तेव्हा ते रजोगुणीच ठरते आणि
पृथ्वीतत्वाच्या स्थूल शरीरानेच ते संपन्न केले जाते. पर्यायाने मूलाधाराचे आणि
गजाननाचे आशीर्वाद आवश्यक ठरतात. याच ठिकाणी "क्रियाशक्ती" चे अधिष्ठान मानले गेले
आहे. मूलाधारातच निद्रिस्त कुंडलिनी प्रणवरूपी "साडेतीन वेटोळे" घालून बसली आहे.
श्रीगणेशाला ओंकाऱ स्वरूप मानले आहे ते या अर्थाने.
वरील सर्व विवेचनावरून तुम्हाला गणेशाचे योगगर्भ स्वरूप नीट कळू शकेल.
श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मूलाधार स्थित श्रीगजानन
तुम्हा सर्वांना अभिष्ट प्रदान करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम