अजपा ध्यान आणि क्रिया ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अजपा ध्यानाचा संपूर्ण विधी, सखोल माहिती आणि गाईडेड मेडीटेशन सेशन्स.

महाशिवरात्री २०२३ : अजपा अखंडनामाची योगमय क्लुप्ती

आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक गोष्ट सांगणार आहे. काटेकोर भिंगातून पाहायचं म्हटलं तर ही गोष्ट तशी काल्पनिकच म्हणावी लागेल परंतु कुठेतरी खोलवर तिला सत्यतेचा स्पर्श आहे. काल्पनिक की सत्य याबद्दल फार चिकित्सक वृत्ती न दाखवता गोष्टीच्या मूळ गाभ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे खरे मर्म हाती लागेल.

------

कोणे एके काळी एक योगी त्याचे आराध्य असलेल्या भगवान सदाशिवाच्या दर्शनाला कैलासावर गेला. भगवंताचे आणि जगदंबेचे आकंठ दर्शन घेतल्यावर तो क्षणभर त्यांच्याच चरणांशी विसावला.

ध्यानीमनी नसतांना भगवान शंकराने अचानक त्याला विचारला केली -- "बोल भक्ता, तुला काय देऊ? ज्ञान देऊ की अजून भक्ती देऊ?"

हा प्रश्न एवढा आकस्मिकपणे आला की तो योगी पुरता गोंधळून गेला. त्याला काही सुचेना. काय मागावे? ज्ञान मागावे? भक्ती मागावी? योगसिद्धी मागावी? का अजून काही मागावे?

जेंव्हा एखादे बालक गोंधळते तेंव्हा ते प्रथम आपल्या मातेकडे धाव घेते. त्या योग्यानेही तेच केले. तो प्रश्नार्थक मुद्रेने जगदंबेकडे पाहू लागला. काही क्षण असेच गेले. कोणीच काही बोलत नव्हतं.

मग जगदंबेने हळूच शंकराला कळणार नाही अशा बेताने योग्याला खुणावले. एका हाताने गुपचूप प्राणायाम मुद्रा दर्शविली आणि दुसऱ्या हाताने जप मुद्रा दर्शविली. नेत्रांनी प्रथम नासिकाग्र दृष्टी आणि मग भ्रूमध्य दृष्टी क्षणभर धारण केली. जगदंबेच्या या सर्व खाणाखुणा पाहून योग्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो आनंदित झाला.

तो भगवान शंकराला म्हणाला -- "देवा, द्यायचंच असेल तर मला अजपारूपी अखंडनाम द्या."

शंकराच्या लक्षात आले की ही काही त्या योग्याची स्वतःची अक्कलहुशारी नाही. बाकीचे फारचफार नाम, भक्ती, योग, ज्ञान वगैरे मागतात पण या पठ्ठ्याने थेट अजपा अखंडनाम मागितले. त्याने हळूच जगदंबेकडे पाहिले. दोघेही गालातल्या गालात हसले. शंकर देवीला म्हणाला -- "तू नेहमी मला मात देतेस आणि तुझ्या पोरांना वाचवतेस."

भगवान शंकराने "तथास्तु" म्हणत त्या योग्याला अखंडनामाची अजपारूपी रहस्यमयी क्लुप्ती प्रदान केली. अजपा अखंडनामाची थोरवी अशी की कर्माचरण करता-करता त्या योग्याला भक्ती तर प्राप्त झालीच पण त्याची योगसाधना सिद्धीस जाऊन ज्ञान लाभही झाला. अशा प्रकारे कर्म-भक्ती-योग-ज्ञान असे चारही सोपान पार करत तो एक दिवस शिवस्वरूपी लीन झाला.

त्या योग्याला जशी शिवभक्ती फळली तशीच ती सर्व वाचकांनाही सत्वर फळो.

------

असो.

मानव पिंडात भगवती कुंडलिनीची प्राणप्रतिष्ठा करून जीवात्म्याला श्वासोश्वास रुपी स्वयंसिद्ध उपासनेची दीक्षा प्रदान करणारा भगवान सांबसदाशिव सर्व वाचकांना अजपा योगाची कास धरण्याची प्रेरणा देवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 February 2023