Untitled 1

षटचक्रांच्या योगगम्य मातृका शक्ती

कुंडलिनी योग ही जरी शिव-शक्ती अशा दोघांची उपासना असली तरी त्यात शक्ती प्रधानता स्पष्ट दिसून येते. मुळात कुंडलिनी ही शक्ती स्वरूपा असल्याने ते साहजिकच आहे. मेरूदंडातून जाणाऱ्या सुषुम्ना मार्गावर मुलाधार ते सहस्रार अशी सात चक्रे आहेत हे सर्वाना ठावूक आहे. या चक्रांमध्ये गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, जीवात्मा, आत्मा इत्यादी देवतांचा वास मानला गेला आहे. त्याविषयी आपण आगोदरच जाणून घेतले आहे. मुलाधार ते आज्ञा या सहा चक्रांमध्ये काही विशिष्ठ मातृका शक्तींचे अधिष्ठान सुद्धा मानले गेले आहे. आज त्या मातृका शक्तींविषयी काही सांगणार आहे.

कुंडलिनी योग हा मंत्र, हठ, लय आणि राज अशा चार योगांनी बनलेला आहे. यांतील प्रत्येक मार्ग अतिशय विस्तृत आणि नाना शाखा-उपशाखांनी शोभायमान असा आहे. आज षटचक्रांच्या ज्या शक्तींविषयी सांगणार आहे त्या शक्ती मंत्रायोगांतर्गत येतात. अर्थात विस्तार भयास्तव येथे फार खोलात न जाता सर्वसाधारण योगाभ्यासी साधकाला समजेल आणि उपयोगी पडेल इतपतच माहिती आपण घेणार आहोत.

सुशुम्नेतील चक्रांचा आणि संस्कृत वर्णमालेचा अत्यंत जवळचा संबंध आहे. समस्त मंत्र हे या वर्णमालेपासूनच उदयास आलेले आहेत. संस्कृत वर्णमालेतील अक्षरे म्हणजे प्रत्यक्षात ध्वनी स्पंदने किंवा नाद / शब्द आहेत. या प्रत्येक अक्षराची एक स्वतःची अशी शक्ती आहे जिला कुंडलिनी योगाच्या आणि मंत्रशास्त्राच्या भाषेत मातृका असं म्हणतात. मातृकांना देवी स्वरूपा मानण्यात आले आहे. त्यामुळे मातृका ह्या आदिशक्ती स्वरूपा किंवा आदिशक्तीच्या सख्या मानल्या गेल्या आहेत. सहस्रार चक्रात संपूर्ण वर्णमाला समाविष्ट आहे तर मूलाधार ते आज्ञा या सहा चक्रांत त्या वर्णमालेतील काही विशिष्ठ मातृका विद्यमान आहेत. मुलाधार ते आज्ञा या सहा चक्रांचे आधिपत्य या मातृकांतील काही विशिष्ठ शक्तीना प्रदान करण्यात आले आहे. त्या-त्या शक्तीच्या प्रभावाखाली ते-ते चक्र कार्य करत असते. त्या-त्या चक्राच्या जागरणा करीता त्या-त्या मातृका शक्तीची कृपा आवश्यक आहे हे ओघाने आलेच. थोडक्यात सहा शक्ती प्रमुख आहेत. त्यांविषयी शास्त्र ग्रंथ सांगतात -

डाकिनी राकिनी देवि लाकिनी काकिनी ततः ।
शाकिनी हाकिनी संज्ञा सत्व-रूपा ततः प्रिये ।
रजोरूपा तमोरूपा मातृका रूपिणी गुरुः ।
एतास्तु परमेशानी मृर्त्तिः पंचाशदक्षरम् ।

याचा थोडक्यात अर्थ असा की डाकिनी, राकिनी, लाकिनी, काकिनी, शाकिनी, आणि हाकिनी या षटचक्रांच्या अधिष्ठात्या शक्ती देवता आहेत. या सर्व सत्व-रज-तम गुणांनी युक्त असून मातृका स्वरूप आहेत. या सहा मातृका शक्तींचे स्वरूप कसे आहे त्यावर देखील प्राचीन योगाग्रंथ प्रकाश टाकतात.

डाकिनी देवी ही मुलाधार चक्राची अधिष्ठात्री शक्ती मानली गेली आहे. तिचा वर्ण चंद्राप्रमाणे शुभ्र आहे. काजळाने सुशोभित असे तिचे नेत्र चंचल असून आकर्षक आहेत. डाकिनी देवीने कृष्णवर्णी वस्त्रे परिधान केली आहेत आणि नाना अलंकार धारण केले आहेत. अशी ही डाकिनी देवी अणिमा नामक सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे.

राकिनी देवी स्वाधिष्ठान चक्राची स्वामिनी मानली गेली आहे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या रंगाप्रमाणे अंगकांती असलेली ही देवी मृगनयनी आहे. सिंदूर, तिलक आदी शृंगारांनी युक्त असलेल्या राकिनी देवीने शुभ्र रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. चंद्राप्रमाणे सुंदर मुख असलेली राकिनी देवी लघिमा सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे.

लाकिनी देवी मणिपूर चक्राची अधिष्ठात्री देवता मानली गेली आहे. तीची अंगकांती तेजस्वी रक्तवर्णी असून ती सुद्धा आकर्षक नेत्रांची आणि चंद्राप्रमाणे सुंदर मुख असलेली आहे. लाकिनी देवी प्राप्ति नामक सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे.

काकिनी देवी अनाहत चक्राची देवी मानली गेली आहे. ती सुद्धा आधीच्या मातृकांप्रमाने सुंदर, तेजस्वी, अलंकारांनी विभूषित अशी आहे. काकिनी देवीने शुभ्र वस्त्रे परिधान केली असून ती प्रकाम्य नामक सिद्धी प्रदान करणारी आहे.

शाकिनी देवी विशुद्धी चक्राची देवी असून तिचा वर्ण शुभ्र ज्योती प्रमाणे तेजस्वी आहे. सिंदूर, तिलक, काजळ वगैरे शृंगाराने युक्त असा तिचा मुखचंद्र प्रसन्न करणारा आहे आणि तिने कृष्णवर्णी वस्त्रे परिधान केली आहेत. शाकिनी देवी महिमा नामक सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे.

हाकिनी देवी आज्ञा चक्राची देवी मानली गेली आहे. तिची कांती शुभ्र-कृष्ण-अरुण वर्णाची आहे. तिचे केस वाऱ्या बरोबर भ्रमरासारखे उडत आहेत. ती मृगनयनी असून चंद्राप्रमाणे सुंदर आहे. हाकिनी देवीने रक्तवर्णी आणि श्वेत वस्त्रे परिधान केली आहेत. हाकिनी देवी वशिता नामक सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे.

या सहा मातृका शक्तींच्या सिद्धी प्रदान करणाऱ्या गुणधर्माविषयी योगग्रंथांत खालील उल्लेख सापडतो -  

डाकिनी च महादेवि अणिमा सिद्धि दायिनी ।
राकिनी लघिमा सिद्धिदायिनी लाकिनी तथा ।
प्राप्ति सिद्धिदायिनी च काकिनी काम्यदायिनी ।
शाकिनी माहिमा सिद्धि हाकिनी ततः ।
कामावशायिता सिद्धि जपादेव प्रयच्छति ।

तर अशा ह्या षटचक्रांच्या शक्ती देवता. वरील प्रत्येक देवतेची उपासना कुंडलिनी योगशास्त्रात सांगितली गेली आहे. ही उपासना भोग आणि मोक्ष अशी दोनही प्रकारची फळे प्रदान करणारी मानली गेली आहे. या देवी स्वरुपांचा संबंध योगशास्त्रातील सिद्धींशी जरी जोडलेला असला तरी त्या सिद्धींच्या मागे लागून ठेऊन मूळ आध्यात्मिक उन्नतीचे लक्ष्य विसरणे योग्य ठरणार नाही. मातृका शक्तींच्या उपासनेद्वारा अन्यही अनेक लाभ मिळवता येतात जे आध्त्यात्मिक प्रगतीला पोषक ठरू शकतात. येथे हे अवश्य सांगायला पाहिजे की ही उपासना पद्धती सर्वसामान्य नवीन साधकासाठी नाही. या उपासनेत अनेक बारकावे आणि खाचाखोचा आहेत ज्या नीट समजून-उमजून घेणे आवश्यक आहे.  त्यामुळे येथे त्यांचे मंत्र आणि उपासना पद्धती देणे योग्य ठरणार नाही. या छोटेखानी लेखात ते शक्यही होणार नाही.

कुंडलिनी योगात सर्वत्र शिव-शक्ती युगुल मानले गेले आहे. जिथे शिव आहे तेथे शक्ती आहे आणि जेथे शक्ती आहे तेथे शिव सुद्धा आहे. त्याचं न्यायाने वरील सहा शक्तींचे शिवस्वरूप सिद्ध सुद्धा शास्त्रात सांगितले गेले आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊ.

काही आठवड्यांनी नवरात्रीचे मंगल पर्व सुरु होणार आहे. मातृका शक्तींची आणि कुंडलिनी शक्तीची उपासना करण्यासाठी त्याहून श्रेष्ठ काळ कोणता असणार! योगाभ्यासात मुरलेले अनुभवी उपासक या पर्वात शक्ती उपासनेचे सम्यक ज्ञान प्राप्त करून उपासनारत होतील अशी आशा आहे.

असो.

सहस्रारातील शिवाशी एकरूप होऊन संतोषाचे अमृत प्राशन करणारी कुल-कुंडलिनी सर्व अभ्यासू वाचकांना मातृका शक्तीची ओळख करून देवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 28 September 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates