Untitled 1

सुकृत आणि दुष्कृत

फार जुनी गोष्ट. एकदा गोरक्षनाथ एका गावाहून दुसऱ्या गावात भटकंती करत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांना एक गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकान दिसले. ते त्या गांजा विकणाऱ्याकडे गेले. म्हणाले एक तोळा दे.

दुकानदार गोरक्षनाथांच्या अंगावर खेकसला -

"जोगड्या, या जगात फुकट काही मिळत नाही. तुझ्याकडे काही असेल ते दे आणि त्याच्या बदल्यात गांजा घेऊन जा."

दुकानदाराच्या मूर्खपणाचं गोरक्षनाथांना खुप हसू आलं. बरं म्हणत त्यांनी दुकानदाराकडून गांजा घेतला आणि पटकन त्याच्या मस्तकी आपला हात ठेऊन त्याला समाधी दिली. दुकानदार तत्क्षणी देहभान विसरून प्रगाढ समाधीत गेला.

गांजा फक्त पोकळ निमित्त होतं. दुकानदाराच्या पूर्वजन्मीची पुण्याई फळाला यायची होती म्हणून त्याला गांजाच्या बदल्यात समाधी मिळाली.

संत निवृत्तीनाथांना नाही का ध्यानीमनी नसतांना गुहेत ध्यानस्त बसलेल्या गहिनीनाथांकडून शक्तिपात मिळाला. तसच काहीसं.

पूर्वजन्मीच सुकृत आणि दुष्कृत ही अशी गमतीशीर गोष्ट आहे. प्रत्येकापाशी त्यांचं गाठोडं असतं पण त्या गाठोड्यात काय आहे ते फारच थोड्यांना माहिती असतं.

असो.

सर्व वाचकांना सत्कर्मरत रहाण्याची बुद्धी परमेश्वर देवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 December 2018