Untitled 1

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने...

कोणा एका गावी एक सत्पुरुष रहात असे. पंचक्रोशीत त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा बोलबाला होता. त्याच्या आश्रमात त्याला मानणाऱ्या अनेक भक्त मंडळींचा सदोदित राबता असे. असं असलं तरी त्याने केवळ एकच शिष्य केला होता. थोडक्यात सांगायचं तर भक्त अनेक पण शिष्य एक अशी अवस्था होती. एकदा त्याच्या भक्त मंडळींपैकी कोणीतरी कुतूहलाने त्याला विचारले - "बाबाजी, तुम्ही आजवर फक्त एकच शिष्य केलात. असं का?" या प्रश्नावर त्या सत्पुरुषाने मोठे समर्पक उत्तर दिले. तो म्हणाला - "आजकाल तपश्चर्या करायचीय कोणाला?!"

गोष्टीचा मतितार्थ सुस्पष्ट आहे त्यामुळे फार विस्ताराने काही सांगण्याची गरज नाही.

आषाढ पौर्णिमा जरी कालच सुरु झाली असली तरी गुरुपौर्णिमा आज ५ जुलै २०२० रोजी साजरी होत आहे. आधुनिक काळात गुरुचे आणि शिष्यांचे स्वरूपही बदलले आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भौतिक ज्ञानाची व्याख्या आणि कक्षा विस्तारित झाली आहे. ज्ञान जतन करण्याचे आणि प्रसारित करण्याचे अनेकानेक प्रकार आज उपलब्ध झालेले आहेत. आधुनिक भोगवादी जीवनशैलीचा प्रचंड रेटा सर्वच स्तरांवर सहन करावा लागत आहे. विशेषतः गेल्या काही दशकांमध्ये आधुनिकीकरण आणि शहरीकरण एवढे प्रचंड वाढले आहे की प्राचीन ग्रंथांत आढळणाऱ्या गुरु-शिष्य संबंधांचा मापदंड आजच्या काळाला लावतांना नवख्या साधकांची तारांबळ उडत आहे. अशा वेळी गुरु-शिष्य स्वरूप आणि संबंध यांत कालसापेक्ष बदल न घडतील तरच नवल.

कोणी आपल्या इष्ट दैवतेला गुरु मानतो. कोणी एखाद्या संत-सत्पुरुषाला आपला गुरु मानतो. कोणी एखाद्या देहधारी जाणकार व्यक्तीला आपला गुरु मानतो. एवढंच नाही तर काही एखाद्या ग्रंथाला आपला गुरु म्हणून स्वीकारतात. कोणा एका आत्मानंदात डुंबणाऱ्या अवधूताने तर आजूबाजूच्या चोवीस सजीव-निर्जीव गोष्टींना आपले गुरु मानले. मुर्तीपुजेच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं की दगडी मूर्तीत देव आहे की नाही हे त्या मूर्तीपेक्षा तुमची श्रद्धा ठरवत असते. जर तुमची श्रद्धा असेल तर रस्त्याच्या कडेला शेंदूर फासून ठेवलेल्या दगडात सुद्धा तुम्हाला देव दिसेल. जर श्रद्धा नसेल तर सात्विक शृंगार न्यालेली देवाची सुबक मूर्तीसुद्धा तुम्हाला निरर्थक वाटेल. तसाच काहीसा प्रकार गुरुच्या बाबतीत सुद्धा असतो.  तुम्हाला गुरु म्हणून कोण आवडावं किंवा आपलंसं वाटावं हे बरचसं तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आणि श्रद्धेनुसार आपल्या आध्यात्मिक प्रेरणेचा आणि मार्गदर्शनाचा स्त्रोत निवडत असतो.

आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करत असतांना मार्गदर्शनाचे हे स्त्रोत प्रसंगी बदलूही शकतात किंवा उत्क्रांतही होऊ शकतात. एखाद्या लहान बालकाला अंक मोजायला शिकवण्यासाठी कोणा गणित तज्ञाची गरज नसते. त्याच्या घरातील थोरले भावंडही ते शिकवू शकते. तेच बालक जेंव्हा शाळेत जाऊ लागते तेंव्हा शाळेतील गणिताच्या शिक्षकांकडून त्याला गणिताचे ज्ञान मिळवणे क्रमप्राप्त ठरते. कॉलेजला जाऊ लागल्यावर तेथील गणिताचे प्रोफेसर त्याला तो विषय शिकवतात. जेंव्हा गणितातील उच्च शिक्षण घेण्याची वेळ येते तेंव्हा कोणी गणितातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन त्याला आवश्यक ठरते. तात्पर्य हे की साधकाच्या त्या-त्या वेळेच्या पात्रते नुसार आणि आवश्यकते नुसार त्याच्या ज्ञानाच्या स्त्रोतांमध्ये सुद्धा बदल किंवा उत्क्रांती संभवते.

गुरुचे स्वरूप कोणतेही असो गुरु आणि साधक यांतील संबंध अतिशय पवित्र आणि तरल असतात. परस्पर विश्वास हा या संबंधांचा गाभा असतो. जोवर हा गाभा टिकून आहे तोवर हे नातं छान टिकून रहातं, फुलतं. जर परस्पर विश्वास आटला तर हे नातंही टिकू शकत नाही. गुरुतत्वाची एक गंमत अशी की त्याला कोणत्याही ठराविक अशा साच्यात ओतून चालत नाही. ते नाना प्रकारांनी आणि नाना मार्गांनी अभिव्यक्त होत असतं. गुरुतत्वाला साचेबद्ध "गुरुपणात" बांधायचा जेवढा प्रयत्न करावा, रूढीबद्ध संकल्पनांच्या चौकटीत त्याला जेवढं डांबून ठेवावं तेवढं ते अधिक दुरावतं. त्यामुळे योग्य हेच आहे की गुरुतत्वाला कोणत्याही साच्यात न ओतता, कोणत्याही पूर्वग्रहांच्या ऐरणीवर त्याला घासून न पहाता त्याला अंतरंगात झिरपू द्यावं. त्याच्यापुढे नतमस्तक व्हावं. त्यातंच कल्याण आहे. त्यातंच आध्यात्मिक जीवनाची सार्थकता आहे.

आजचा काळ असा आहे की तुम्ही ज्या कोणाला श्रध्येय मानत आहात त्याने दिलेली साधना-उपासना आणि शिकवण "श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण" या चतुःसूत्रीद्वारे अंगी भिनवणे हीच एक मोठी तपश्चर्या ठरावी.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक आपापल्या प्रेरणा सूर्याच्या शिकवणीचे आदर, भक्ती आणि समर्पण यांद्वारे अनुशीलन करोत आणि आपले कल्याण साधून घेवोत या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 05 July 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates