Untitled 1

मच्छिंद्रनाथांच्या गडावर यात्रा आणि धर्मनाथ बीज

या आठवड्यात नवनाथ भक्तांसाठी दोन महत्वाचे दिवस आहेत. आज ४ फेब्रुवारी २०१९ रोजी पौष अमावस्या आहे. आज श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर यात्रोत्सव असतो. या ठिकाणी नाथ संप्रदायाचे प्रवर्तक असलेल्या मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. नवनाथ पोथीच्या २३ व्या अध्यायात नवनाथांनी गर्भगिरी पर्वताच्या भोवताली समाध्या कशाप्रकारे घेतल्या त्याचा उल्लेख आहे. त्यांतील मच्छिंदनाथांची समाधीचे हे स्थान. यात्रेनिमित्त हे समाधी मंदिर रोषणाई वगैरे करून सजवलं जातं आणि हजारो भक्तांच्या साक्षीने यात्रा पार पडते.

मच्छिंद्रनाथांचे चरित्र हे केवळ त्यांनी दाखवलेल्या चमत्कारपूर्ण लीलांनीच भरलेलं नाही तर पराकोटीची दत्तभक्ती, कठोर साधना आणि तपश्चर्या यांचे अनोखे मिश्रण आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या नवनाथांपैकी केवळ मच्छिंद्रनाथ काही काळ का होईना पण संसारी आयुष्य जगले. उर्वरित नाथांनी कडक ब्रह्मचर्य आणि वैराग्य यांचे पालन केले. मच्छिंद्रनाथांच्या या "संसारी" पणाचा संबंध त्यांच्या मूळ विचारप्रणालीशी अर्थात कौलामार्गाशी आहे. मी मागे त्याविषयी लिहिलं आहे. योग आणि संसारी भौतिक सुखोपभोग यांच्या पलीकडील अवस्था प्राप्त केलेले कौलसिद्ध मच्छिंद्रनाथच हे लीलया करू शकले. "त्यागी भोगी महायोगी" या प्रसिद्ध अवधूत लक्षणांच ते द्योतक आहे.

याच आठवड्यात धर्मनाथ बीज आहे. मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम नावाच्या मृत्यू पावलेल्या राजाच्या शरीरात "परकाया प्रवेश" केला. त्रिविक्रम राजाच्या राणीबरोबर त्यांनी बारा वर्ष संसार केला. त्याकाळात त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा झाला. बारा वर्षांनी जेंव्हा ते राणीला सोडून निघाले तेंव्हा त्यांनी सांगितले की माझा शिष्योत्तम गोरक्ष धर्मनाथाला दीक्षा देईल. त्यानंतर बारा वर्षांनी गोरक्षनाथ ठरल्याप्रमाणे आहे आणि त्यांनी धर्मनाथाला माघ शुद्ध द्वीतीयेला विधिवत नाथपंथाची दीक्षा दिली. तो दीक्षा दिवस धर्मनाथ बीज म्हणून ओळखला जातो. यावेळी तो दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी आहे. गोरक्षनाथांनी असेही सांगितले की जो या दिवशी भंडारा / अन्नदान / उत्सव करेल त्याच्या घरी अक्षय सुख-समृद्धी नांदेल. नवनाथ पोथीच्या ३४ व्या अध्यायात त्याविषयी वर्णन केलेलं आहे.

असो.

सर्व वाचकांवर मच्छिंदनाथ आणि गोरक्षनाथ यांचा कृपाप्रसाद राहो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 February 2019