Untitled 1

उपास्य आणि साधना-क्रियांची अचूक निवड आवश्यक

साधारणतः साधक योगशास्त्राचा वापर हा एका तर आरोग्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी करत असतो. पैकी योगशास्त्राचा आरोग्यासाठी किंवा फिटनेस साठी वापर आज बराच रुळलेला आहे. त्यावर आधुनिक विज्ञानाने बरेच संशोधन केलेले आहे. अजूनही होत आहे. या दोनही प्रकारांसाठी साधकाला काही साधनांची किंवा क्रियांची निवड करावी लागते.

आरोग्यासाठी योग या प्रकारात साधना-क्रियांची निवड करणे बरंच सोपं आहे. आज योग प्रशिक्षक, योगासन-प्राणायाम यांच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था मुबलक उपलब्ध आहेत. पुस्तके, DVD, इंटरनेट इत्यादी मार्गानीसुद्धा योगविषयक माहिती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. साधकाला झालेल्या रोग-व्याधी नुसार त्याच्यासाठी साधना-क्रिया ठरवण्याचे काम कोणताही तज्ञ योग प्रशिक्षक सहज करू शकतो. हा योग प्रशिक्षक आध्यात्मिक स्तरावर कितपत प्रगत आहे याचा या निवडीशी विशेष संबंध असत नाही. साधकाला आजच्या घडीला काही शारीरिक व्याधी आहे आणि तिचे निर्मुलन करणं एवढाच साधना-क्रियेचा उद्देश असतो.

अध्यात्मिक प्रगतीसाठी जेंव्हा योगमार्ग चोखाळला जातो तेंव्हा मात्र साधना-क्रियेची निवड बरीच अवघड असते. असे अनेक साधक असतात की २०-३० वर्षे साधना करूनसुद्धा त्यांना आध्यात्मिक स्तरावर काही विशेष फायदा झालेला नसतो. किंबहुना ते आपल्या सद्धाच्या साधनेवर पूर्णतः समाधानी असतच नाही. दुसरा काही मार्ग ज्ञात नसल्याने नाईलाजाने ते सध्या सुरु असलेली साधना पुढे रेटत असतात. परिणामी त्यांची साधना काहीशी कंटाळवाणी आणि यांत्रिक झालेली असते. योगमार्गावर प्रगती न होण्याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्वाचे कारण साधना-क्रियांची अयोग्य निवड हे आहे.

योगशास्त्राचा वापर करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी चार प्रकारचा योग वापरात आणला जातो. ते चार प्रकार खालील प्रमाणे:

  • मंत्रयोग
  • हठयोग
  • लययोग
  • राजयोग

या प्रत्येक उप-प्रकारात अनेक अक्षरशः डझनावारी साधना-क्रिया आहेत.

आता गंमत अशी आहे साधक जेंव्हा एखादी क्रिया स्वतः निवडतो किंवा एखाद्या अर्धवट प्रगती साधलेल्या गुरुकडून ती घेतो तेंव्हा त्या साधनेची त्या साधकाला खरोखरच गरज आहे की नाही त्याची अजिबात खातरजमा होत नसते. माझा मुद्दा नीट लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे देतो :

  • आजकाल अनेक साधक "चक्र-ध्यान" नावाचा प्रकार करतात. त्यात प्रत्येक चक्रावर ठराविक काळ धारणा केली जाते. यात असे गृहीत धरले जाते की साधकाचे कोणतेही चक्र अद्याप जागुत झालेले नाही. अनेक साधकांच्या बाबतीत हे गृहीतक सपशेल चुकीचे ठरते. समजा एखाद्या साधकाचे या जन्मी अनाहत चक्र जागृत होण्याची प्रक्रिया सुरु असेल तर मग मुलाधार, स्वाधिष्ठान यांसारख्या खालच्या चक्रांवर ध्यान करण्याची विशेष गरज असत नाही. किंबहुना तसे केल्याने कुंडलिनीला मुद्दाम भौतिक पातळीवर आणल्यासारखे होईल.
  • साधक पुस्ताकात कुठेतरी वाचतात की आज्ञाचक्र सर्वात महत्वाचे असून त्यावर ध्यान करणे हा सर्व चक्रे जागृत करण्याचा सोपा मार्ग आहे वगैरे वगैरे. परंतु हा प्रकार सर्वच साधकांच्या बाबतीत खरा ठरत नाही. त्यांच्या खालील चक्रांत एवढी अशुद्धी साधलेली असते की त्यांच्यासाठी त्या त्या चक्रातील अशुद्धीचा निचरा करणे हाच प्रभावी मार्ग ठरतो.
  • योगशास्त्रात प्राणायामाचे २००+ प्रकार ज्ञात आहेत. केवळ एखादा भस्त्रिका किंवा नाडीशोधन करतो म्हणून तो सगळ्यांनाच गरजेचा आहे असे नाही.
  • हठयोगात अनेक मुद्रा आहेत. साधकांना खेचरी मुद्रेविषयी नेहमीच उत्सुकता असते. आपल्यालाही खेचरी साधावी असे त्यांना वाटत असते. परंतु खेचरी काही अशी थेट साधणारी मुद्रा नाही. प्राणमय कोषाचा स्तर सुधारल्यावरच खेचरी साधून उपयोग होतो केवळ ओढून-ताणून केल्याने नाही.
  • मंत्रयोगात जो मंत्र निवडायचा तो अत्यंत काटेकोर पणे निवडावा लागतो. मंत्रजप सुरु करण्यापूर्वी १० प्रकारचे शोधन संस्कार त्यावर करावे लागते. नंतर मंत्रात जेवढी अक्षरे आहेत त्यांच्या चौपट एवढे लाख वेळा त्याचा जप करावा लागतो. मंत्र गुरुमुखातून (साक्षात्कारी सद्गुरू, अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला कोणी नाही) घ्यावा लागतो.
  • प्रत्येक साधकाचे उपास्य दैवत हे वेगवेगळे असते. असा अनुभव आलेले साधक सर्रास आढळतात ज्यांना एका देवतेची उपासना फलित झाली नव्हती पण दुसऱ्या कोणत्या देवतेची उपासना मात्र चांगले फळ देऊन गेली.

या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधकाची पूर्वजन्मीची साधना आणि प्रगती. योगशास्त्र किंबहुना भारतातील बहुतेक आध्यात्मिक पद्धती पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत मानणाऱ्या आहेत. साधकाची सध्याची स्थिती ही केवळ त्याच्या या जन्मीच्या कर्माचा परिपाक नसून त्याच्या गतजन्मीच्या कर्मांचा  परिपाक आहे. असे योगशास्त्र मानते.

समजा एखादा साधक असा आहे ज्याने त्याच्या मागील जन्मी काही साधना करून विशिष्ठ स्तरापर्यंत प्रगती साधलेली होती. परंतु साधनेत पूर्ण सफलता मिळण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सध्याच्या जन्मात त्याने कोणती साधना करणे त्याच्या दृष्टीने हितावह राहील? अर्थातच त्याच्या मागील जन्मीची साधना आणि इष्टदैवतेची उपासना हेच त्याला जलद फायदा मिळविण देईल. आजच्या काळात साधकाच्या गतजन्मींचा वेध घेऊन त्याला या जन्मी सुयोग्य साधनामार्गाची ओळख करून देईल असा सद्गुरू मिळणे हे सहजसाध्य राहिलेले नाही. परिणामी साधक आयुष्यातील बहुमोल वर्षे अशा साधनेवर वाया घालवतो की त्यांचा त्याला उपयोगच नसतो. त्याची पूर्वजन्मींची साधना पुढे न नेता तो नवीनच काही साधना सुरु करतो आणि त्यातही त्याला या जन्मी यश मिळेल याची खात्री असत नाही.

आता असे समजा की एखाध्या साधकाने खेचरी मुद्रा साधावी म्हणून तयारी करण्यास सुरवात केलेली आहे. पण जर त्याच्या या जन्मातील आध्यात्मिक प्रगतीसाठी खेचरी आवश्यकच नसेल तर? त्याला कितीही प्रयत्न केले तरी ती साधणार तरी नाही किंवा जरी साधलीच तरी अशा ओढून-ताणून केलेल्या खेचरीचा काही उपयोग होणार नाही. कारण त्याची या जन्मींची कर्म, साधना आणि प्रगती याचा मेळ बसणार नाही. अशी खेचरी त्याला पुढल्या कोणत्यातरी जन्मात उपयोगी पडू शकेल हे जरी खरे असले तरी त्या अट्टाहासापायी या जन्मीचा बहुमोल वेळ त्याने वाया घालवलेला असेल.

साधकाचे उपास्य दैवतही असेच ठरते. केवळ त्याची वैयक्तिक आवड हा भाग त्यामध्ये असतं नाही. त्याचे सध्याचे चालू असलेले तत्व, पूर्वजन्मी घडलेली उपासना, कुलदैवत वगैरे अनेक बाबींचा सूक्ष्म विचार करून जर उपास्य निवडले तर फळ लवकर मिळते. असे साधक आढळतात त्यांना एखाद्या देवतेची उपासना मानवत नाही. घरातल्या अन्य लोकांना तीच उपासना फलदायक ठरते पण त्या साधकाला मात्र त्याचा फायदा होत नाही. या अशा सगळ्या वरकरणी विचित्र वाटणाऱ्या अनुभवांचे मूळ हे वरील गोष्टींत दडलेले आहे.

तात्पर्य हे की अशाच उपास्याची आणि साधना-क्रियांची निवड साधकासाठी योग्य असते ज्या त्याच्या चालू जन्मातील आध्यत्मिक प्रगतीला पोषक असतील. केवळ दुसरा एखादा साधक एखादी साधना करतो किंवा एका देवतेची उपासना करतो म्हणून त्यानेही तसेच करणे योग्य ठरणार नाही.

जुन्या काळी भारतात ज्या परंपरा आणि संप्रदाय होऊन गेले त्यांचे महत्व आता तुम्हाला कळू शकेल. शैव संप्रदाय, नाथ संप्रदाय, अवधूत संप्रदाय अशा पंथांमध्ये सिद्धगुरूच साधकाला दिक्षा देत असतं. साधकाला दिक्षा देण्यापूर्वी ते त्याचा कर्मविपाक जाणून घेत असत, त्याची काटेकोर परिक्षा घेत असत आणि मगच त्याला दीक्षा प्रदान करत असत. आजकालच्या आध्यात्मिक भूलभुलैय्यात कोण खरा आणि कोण खोटा हे ठरवणं फार कठीण काम आहे. नवीन साधकांनी हे सर्व लक्षात घेऊन वाटचाल करावी हे उत्तम.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 19 April 2016


Tags : योग हठयोग मंत्रयोग लययोग राजयोग