Untitled 1

कुंडलिनी शक्तीची साधकांमधील क्रियाशीलता

कुंडलिनी योगमार्गावर निद्रिस्त शक्तीला चालना देण्याचे दोन प्रधान प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात साधक स्वप्रयत्नाने योगसाधनेच्या आधाराने कुंडलिनी जागृत करतो. दुसऱ्या प्रकारात साधकाला त्याच्या गुरुकडून शक्तिपात दिला जातो. हे दोन मार्ग वरकरणी भिन्न वाटतील कदाचित पण खरंतर ते साधकाच्या वाटचालीतील टप्पे आहेत. बहुतेक साधकांच्या बाबतीत प्रथम योगाक्रीयांद्वारे काही प्रमाणात तरी आंतरिक शुद्धी घडवून आणायची आणि मग यथावकाश गुरु आदेशाप्रमाणे शक्तिपात स्वीकारायचा असा मार्गच श्रेयस्कर ठरतो. त्यायोगे साधकाला आध्यात्मिक जीवनाची एकप्रकारची शिस्तही लागते. कलियुगात मेहनत न करता काही आयातं मिळालं तर त्याची किंमत कळत नाही हे कटू असले तरी सत्य आहे.

कुंडलिनी योगमार्गावर शक्तिपाताचं स्वतःचं असं एक महत्व आणि स्थान आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आजकालच्या बऱ्याच साधकांना ते समजलेलंच नसतं. शक्तिपात म्हणजे काही वाण्याच्या दुकानात मिळणारे डाळ-तांदूळ नाहीत जे कधीही जाता-येता विकत घ्यावेत. तसा उथळ दृष्टीकोन ठेऊन एखाद्या गुरूकडे किंवा मार्गदर्शकाकडे जाणे योग्य ठरणार नाही. खरंतर शक्तिपात मिळायला देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा असा दोघांचाही योग जुळून यावा लागतो. तरच ती प्रक्रिया सफल होते. याच कारणास्तव जुन्या काळी गुरु साधकाची पात्रता पाहिल्याशिवाय त्याला तो देत नसत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की एखाद्या साधकाला शक्तिपात द्यावा किंवा नाही तसेच द्यायचा असल्यास कधी आणि कशाप्रकारे द्यावा हा सर्वस्वी त्या गुरुचा अधिकार आहे. त्याबाबतीत साधक अनधिकारी मानला जातो. शक्तिपात आणि संबंधीत संकल्पनांची माहिती मी देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु मध्ये दिलेली आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही. येथे साधकांची पात्रता आणि शक्तीची क्रियाशीलता यांचाच विचार करू.

प्राचीन काळी कुंडलिनी योगमार्गावर प्रवेश करण्यापूर्वी गुरु शिष्याची पात्रता-पूर्व परीक्षा करूनच त्याचा स्वीकार करत असत. त्यामुळेच योग ग्रंथांमध्ये शिष्यांचेर्गीकरण चार प्रकारांत केलेले आढळते. ते चार प्रकार म्हणजे - मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर. तुमच्या लक्षात आलंच असेल की साधकाच्या वैराग्य, मुमुक्षत्व, श्रद्धा इत्यादी गुणानुसार हे वर्गीकरण केलेले आहे. एक लक्षात घ्या हे वर्गीकरण पात्रता-पूर्व फेरी पास झालेल्या साधकांचे आहे. मंद प्रकारात मोडणारा साधक हा पण त्याच्या गुरुच्या पात्रता-पूर्व निकषांच्या आधारावरच निवडला गेला आहे.

आता अशी कल्पना करा की चार धावपटू मॅराथॉन शर्यत धावणार आहेत. सर्वांसाठी एकच मार्ग आहे, सर्वाना एकाच प्रकारचे बूट देण्यात आलेले आहेत, सर्वाचे पोशाख आणि अन्य गोष्टीही सारख्याच आहेत. एकाच क्षणी त्यांनी धावायला सुरवात केलेली आहे. ते चारही जण अपेक्षित अंतर एकाच वेळी पार करतील का? बहुतेक वेळा या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल. कारण सर्व घटक जरी समान असले तरी त्या त्या धावपटूची स्वतःची अशी एक क्षमता आहे. जो तो आपल्या क्षमतेनुसारच धावू शकणार हे उघड आहे.

कुंडलिनी योगमार्ग किंवा अध्यात्म मार्ग म्हणा हा सुद्धा त्या मॅराथॉनसारखाच आहे. स्वप्रयत्नाने किंवा शक्तिपाताने कुंडलिनी जरी जागृत झाली तरी सर्वच साधक सारख्याच प्रमाणात अग्रेसर होऊ शकत नाहीत. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची वर्गवारी मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर अशी केली जाते. या प्रत्येक श्रेणीची काही वैशिष्ठ योगाग्रंथांत वर्णन केलेळी आहेत. त्यात फार खोलात जाण्याची येथे गरज नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की साधकाच्या पात्रतेनुसार कुंडलिनी शक्तीची अभिव्यक्ती सुद्धा भिन्न-भिन्न प्रकारानी होत असते.

कुंडलिनी जागृत होणे आणि कुंडलिनी क्रियाशील होणे ह्या थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसाधारणपणे "जागृती" हाच शब्दप्रयोग केला जात असला तरी त्यात सूक्ष्म भेद आहे. एखाद्या साधकाने स्वप्रयत्नाने अथवा शक्तीपाताद्वारे कुंडलिनी जागृत केली तरी ती लगेचच क्रियाशील होईल असे नाही. कुंडलिनीचे क्रियाशील होणे म्हणजे काय? तर जागृत शक्ती स्वतःला नाना प्रकारे अभिव्यक्त करू लागते. मग त्या शारीरिक क्रिया असोत वा मानसिक वा आध्यत्मिक. क्रियान्वित झालेली शक्ती अनेकानेक अनुभूतींद्वारे स्वतःची "गती" प्रकट करत असते. मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर साधकांमध्ये ही अभिव्यक्ती भिन्न-भिन्न असते. उदाहरणार्थ, एखाद्या मंद साधकाला केवळ शारीरिक क्रिया जसे हातपाय झटकले जाणे, निद्रा किंवा तंद्रा येणं अशी लक्षणे दिसतील. तर मध्य कोटीच्या साधकाला शरीरात प्राणशक्तीची हालचाल जाणवेल किंवा काही प्राणायाम-मुद्रा होतील. तर तीव्र कोटीचा साधक प्रगाढ ध्यानावस्था प्राप्त करेल. तीव्रतर कोटीचा साधक कदाचित समाधीत जाईल. ही उदाहरणे केवळ विषय नीट समजावा म्हणून दिली आहेत.

शक्तिपात मिळालेल्या काही साधकांच्या बाबतीत असही घडतं की शक्तिपात मिळून सुद्धा त्यांना काहीच क्रिया होत नाहीत. त्यांना वाटतं की आपली कुंडलिनी जागृत झालीच नाही आणि ते निराश होतात. पण तसा काही प्रकार नसतो. त्यांचीही कुंडलिनी जागृत झालेली असते पण काही कारणांनी ती क्रियान्वित झालेली नसते इतकंच. कुंडलिनी क्रीयाशील न होण्याची कारणे कोणती? खरंतर अमुकच अशी कारणे सांगता येणार नाहीत. कुंडलिनी शक्ती स्वतः ज्ञानवती आहे. ती साधकाची "भूमी" कशी आहे ते जाणते. पण पूर्वसंचीत कर्म आणि चुकीचा आहार-विहार हा सुद्धा एक घटक असतो.  अशा साधकांची उदाहरणे तुम्ही वाचली-ऐकली असतील ज्यांना गुरुकडून शक्तिपात मिळाल्यावर अनेक वर्षे शक्तीची क्रियाशीलता काहीच जाणवली नाही. नंतर एक दिवस चित्तशुद्धी आणि प्रारब्ध कर्मांचा निचरा झाल्यावर आपोआप शक्ती क्रियान्वित झाली आणि त्यांनी उच्च कोटीची प्रगती साधली. साधकाचे शरीर आणि मन तयार नसेल तर शक्ती आतल्याआत जणू घुसमटते. तशाही स्थितीत ती सूक्ष्म स्तरावर कार्य करतच असते परंतु शक्तीनी शुद्धी करावी आणि साधकाने परत चुकीच्या आहार-विहाराने अशुद्धी गोळा करावी असा प्रकार होत रहातो.

तात्पर्य हे की कुंडलिनी जागृती व्हावी म्हणून घायकुतीला येऊन उपयोग नाही. अध्यात्मिक जीवन मॅराथॉनसारख असतं. स्वतःला "लंबी रेस का घोडा" बनवण्यासाठी साधकांनी अथक प्रयत्न करणे नितांत गरजेचं ठरतं. एकदा का तुम्ही स्वतःला तयार केलेत की योग्य वेळी योग्य गुरूची भेटही होईल, त्याच्याकडून यथावकाश अनुग्रहसुद्धा मिळेल आणि जगदंबा कुंडलिनी सुद्धा आपला कृपाप्रसाद प्रदान करेल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 01 January 2018