पाच मिनिटांच्या पाच साधना

पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ५ - उज्जायी प्राणायाम)

उज्जायी हा हठयोगातील एक महत्वाचा प्राणायाम आहे. या प्राणायामात कंठ संकोच करून श्वास आत घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. या प्रक्रियेमुळे श्वास दिर्घ आणि खोल होतो. परिणामी फुप्फुसांमध्ये हवा जास्त प्रमाणात घेतली जाते. मूळ हठयोगोक्त उज्जायी करताना कंठ संकोच खूप अधिक प्रमाणात केला जातो त्यामुळे घशातून शिट्टी सारखा आवाज येतो. ही पद्धत प्राणायामासाठी जरी योग्य असली तरी ध्यान-धारणेसाठी एवढ्या अधिक प्रमाणात कंठ संकोच करण्याची गरज नसते. केवळ हलका कंठ करून घशातून मंद घोरल्यासारखा आवाज येईल एवढेच बघावे. आता धारणेसाठी उज्जायी प्राणायामाचा उपयोग कसा करायचा ते पाहू.

 • घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
 • डोळे मिटून शांत चित्ताने क्षणभर बसा.
 •  आता आपले सारे लक्ष कंठ स्थानावर ठेवा.
 • हळूच कंठ संकोच करा. कंठ संकोच करणे म्हणजे कंठ किंचित आक्रसल्या सारखा करणे.
 • आता कंठ संकोच तसाच ठेवून हळुवार संथ गतीने श्वास आत घेण्यास सुरवात करा.
 • जर तुम्ही ही क्रिया बरोबर करत असाल तर तुमच्या कंठातून घोरताना येतो तसा आवाज येईल. हा आवाज संथगतीने एकसारखा आला पाहिजे.
 • श्वासाने छाती पूर्ण भरा.
 • आता कंठ संकोच तसाच राखून श्वास बाहेर सोडण्यास सुरवात करा. या ही वेळेस पाहिल्यासारखाच आवाज येईल.
 • श्वास पूर्ण बाहेर पडला की या क्रियेचे एक आवर्तन पूर्ण झाले.
 • ही संपूर्ण क्रिया करत असताना मन आणि जाणिवेचे केंद्र कंठस्थान आणि त्यातून येणारा आवाज यांवर असले पाहिजे.
 • अशी एका मागून एक आवर्तने ५, ११, २१ अशा पटीत करा. सुरवातीला पाच मिनिटांत किती आवर्तने बसतात ते मोजा आणि मग तेवढी आवर्तने करा. जर अधिक वेळ देऊ शकत असाल तर आवर्तने वाढवा.

या साधनेने मन लगेच शांत होते. श्वास भरपूर प्रमाणात घेतला गेल्याने तरतरी येते. एक प्रकारचा उत्साह वाटू लागतो. ही क्रिया करत असताना जाणीव सुषुम्नेवरून वर-खाली फिरवल्यास कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते.

 

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 March 2014


Tags : योग अध्यात्म कुंडलिनी साधना ध्यान प्राणायाम