Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

ब्रह्म मुहुर्तावरील योग साधना - भाग २

मागील लेखात आपण ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय ते विस्ताराने जाणून घेतले. आता या लेखात आपण ब्रह्म मुहूर्तावर साधना का आणि कशा प्रकारे करावी ते जाणून घेणार आहोत.

योग-अध्यात्म शास्त्रात अनेकानेक साधना आणि उपासना आहेत. त्यातील कोणत्या साधना ब्रह्म मुहूर्तावर करण्यासाठी योग्य आहेत हे आगोदर माहित असायला हवे. स्थूल पूजा, लीलाग्रंथांचे वाचन, स्तोत्र पाठ, मंत्र जप, योगासने, प्राणायाम, मुद्राभ्यास, नादश्रवण, ध्यान-धारणा असे साधनेचे अनेक प्रकार आहेत. एक लक्षात घ्या की ब्रह्म मुहूर्त हा काही दोन-तीन तासांचा कालखंड नाही. तुमच्याकडे साधारणतः पंचेचाळीस मिनिटे ते एक तास एवढाच कालावधी आहे. त्यामुळे जी साधना तुम्ही निवडणार ती या कालावधीत आटोपशीर पणे करता यायला हवी.

तुम्ही जर उपासना मार्गावर नवीन असाल तर पहिले तुमच्या मनात या काळात लीलाग्रंथांचे पठण करावे असे येईल. लीलाग्रंथांचे प्रमुख उद्दिष्ठ हे त्या-त्या लीलाग्रंचाचे मुख्य पात्र असलेल्या सत्पुरुषाची किंवा देवी-देवतेची भक्ती वाढवणे हे असते. त्यामुळे बहुतेक लीलाग्रंथ चमत्कारपूर्ण कथा-कहाण्या-घटना यांनी ओतप्रोत भरलेले असतात. अशा ग्ग्रंथांचे वाचन हे भक्तीवर्धनासाठी पोषक असले तरी त्याचा एक सूक्ष्म पैलू आहे जो ध्यानामार्गावर प्रगती करू इच्छिणाऱ्या साधकांनी नीट लक्षात घ्यायला हवा. असे लीलाग्रंथ वाचताना मनावर कळत-नकळत तशाच चमत्कारपूर्ण गोष्टी खोलवर ठसल्या जातात. मानवी मन फार संस्कारशील असते. तुम्हाला कळतही नाही की ते प्रत्येक कृतीतून कसे आणि कोणते संस्कार ग्रहण करत आहे ते. ध्यानासाठी मनाला तयार करत असतांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. चमत्कारपूर्ण कथा-कहाण्यांचा भडीमार झालेले मन ध्यानाला बसल्यावर ते संचित संस्कार बाहेर फेकू लागते. पतंजली योगासुत्रात पतंजली मुनींनी भ्रम, भास, मिथ्या ज्ञान, प्रमाद वगैरे जे सांगितले आहेत ते दोष मग ध्यानसाधनेत उतरू शकतात.

ब्रह्म मुहूर्त ही तुमच्या दिवसाची अत्यंत तरल अशी सुरवात आहे. अशा वेळी मनाला ध्यान साधनेसाठी तयार करणारी साधना करणे जास्त योग्य राहील. त्यामुळे माळेवरचा जप, एखाद्या लघुस्तोत्राचा जप, अजपा जप, प्राणायाम, त्राटक, मुद्राभ्यास, षण्मुखी लावून नादश्रवण, धारणा, ध्यान इत्यादी साधना ब्रह्म मुहूर्तासाठी अधिक योग्य आहेत. हठयोगातील योगासने आणि नेती-धौती इत्यादी शुद्धीक्रिया ब्रह्म मुहूर्तावर करण्याची गरज नसते. येथे हे ही सांगितले पाहिजे की तुम्ही जर मुळातच कोणतीही ध्यानात्मक साधना करत नसाल किंवा ध्यानधारणा हा तुमच्या आवडीचा भाग नसेल तर अर्थातच लीलाग्रंथांचे वाचन किंवा योगासने सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर करायला काही हरकत नाही.

आता ब्रह्म मुहूर्तावर योगसाधना केल्याने होणाऱ्या काही फायद्यांकडे वळू यात. या फायद्यांचा फार मोठा फाफट पसारा तुमच्या पुढे मांडण्यापेक्षा मोजक्याच परंतु सूक्ष्म आणि महत्वाच्या अशा काही गोष्टींकडे मी येथे निर्देश करणार आहे. अजपा योग आणि ध्यानसाधना केंद्रस्थानी मानून या गोष्टी मी सांगत आहे त्यामुळे त्या अनुषंगानेच त्यांकडे पहावे.

प्रथमतः ब्रह्म मुहूर्तावर तुमच्या मनाची आणि आजूबाजूच्या वातावरणाची स्थिती कशी असते त्यावर विचार करू. जर तुम्ही आदल्या दिवशी रात्री लवकर निद्राधीन झाले असाल तर ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर तुम्हाला अगदी ताजेतवाने वाटायला हवे. उशिरा झोपून ब्रह्म मुहूर्तावर डोळे चोळत उठणे खरंतर योग्य ठरणार नाही. साधनेसाठी तुमचे शरीर आणि मन अगदी शांत अवस्थेत असले पाहिजेत. या वेळी वातावरणातील प्राणवायू शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषला जातो. एक तर दिवस अजून उजाडायचा असल्याने हवेत प्रदूषण अगदी अल्प प्रमाणात असते. त्यामुळे प्राणायामादी क्रिया करत असतांना शुद्ध हवेचा पुरवठा शरीराला होत असतो. शरीरही ताजेतवाने असल्याने अधिक जोमाने तो प्राणवायू शोषून घेण्यास सक्षम असते. ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या प्राणायाम आणि अजपा साधनेने प्राणमय कोष अधिक वेगाने प्रस्फुटीत बनतो. विशेषतः अजपा शिव साधनेच्या क्रिया क्रमांक दोन आणि तीन या बाबतीत अगदी उत्तम कार्य करतात.

आता जो मुद्दा सांगणार आहे तो अशा लोकांसाठी आये ज्यांनी कोणत्याही गुरु किंवा मार्गदर्शका शिवाय आपली योगसाधना स्वतः आखली आहे. योग-अध्यात्म साधना ही सात्विक, राजसिक किंवा तामसिक असू शकते. आता तुम्ही कोणत्या प्रकारची साधना करावी हा जरी तुमचा व्यक्तिगत आवडीनिवडीचा विषय असला तरी एक सांगावेसे वाटते की निदान ब्रह्म मुहूर्तावर तरी शुद्ध सात्विक किंवा फार तर राजसिक साधनाच कराव्यात. कुठून तरी वाचेलेले ऐकलेले अचकट विचकट मंत्र किंवा साधना ब्रह्म मुहूर्तावर टाळाव्यात हेच उत्तम. वैदिक गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्रापासून ते शिव पंचाक्षर विष्णू द्वादशाक्षर किंवा दत्तात्रेय नामस्मरण मंत्रापर्यंत किती तरी शुद्ध सात्विक मंत्र आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या ध्यान-स्तोत्रादी उपासना आहेत. ब्रह्म मुहूर्तावर अजपा शिव साधनेची क्रिया क्रमांक एक करत असतांना चक्रांवर प्राण स्पंदनांचे सुखद ठोके कसे मिळतात हे ज्यांनी अनुभवले आहे त्यांना हा सात्विक आनंद कसा असतो ते माहिती असेल. तात्पर्य हे की ब्रह्म मुहूर्तावर करण्याची साधना तमोगुणाचे शमन करणारी आणि स्वत्वगुणाचे पोषण करणारी असू द्या.

आता अशा लोकांकडे वळू यात ज्यांनी एखाद्या गुरु कडून किंवा मार्गदर्शका कडून विधिवत एखादा मंत्र किंवा एखादी ध्यानसाधना स्वीकारलेली आहे. अनेकवेळा असं दिसतं की योगसाधक गुरुप्रदत्त साधनेत आपल्याच मनाने फेरफार करतात. पुस्तकात वाचून म्हणा किंवा इंटरनेटवर पाहून ते मूळ गुरुप्रदत्त साधनेत बदल करून त्यात काही अधिक गोष्टींची जोड द्यायला जातात किंवा त्याना अनावश्यक वाटणारा साधनेचा भाग वगळून तरी टाकतात. असं करणे म्हणजे एका प्रकारे मूळ गुरुप्रदत्त साधनेत भेसळ करण्यासारखे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. मुद्दाम जाणीवपूर्वक त्यांचा तसा उद्देश नसला तरी अशी नकळत झालेली भेसळ साधनेच्या फळावर नकारात्मक परिणाम करू शकते. अशा लोकांनी आपापल्या गुरूला किंवा मार्गदर्शकाला विचारूनच साधनेत फेरफार करावा हे उत्तम. ब्रह्म मुहूर्तावर जी साधना तुम्ही करणार आहात ती तंतोतंत मुळ गुरुप्रदत्त साधने बरहुकूम करून बघा. तुम्हाला मी काय म्हणतोय ते कदाचित कळून येईल.

काही वेळा असंही होतं की एखाद्या गुरुकडून किंवा एखाद्या जाणकाराकडून साधना केवळ एक औपचारिकता म्हणून घेतली जाते. गुरुमुखी विद्याचं फलीभूत होते असं कुठेतरी वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं आणि मग ही "अट" पूर्ण करण्यासाठी कोणालातरी गुरु मानलं जातं. अशी साधना गुरुमुखी असली तरी त्यांत साधकाची गुरुवरील श्रद्धा पुरेशी नसल्याने किंवा श्रद्धा खंडित झालेली असल्याने अशी साधना ब्रह्म मुहूर्तावर जरी केली तरी पटकन फलप्रद ठरत नाही. ज्याप्रमाणे फक्त मंत्राची अक्षरे कळली म्हणजे मंत्र चैतन्य ग्ग्रहण झाले असं होत नाही त्याप्रमाणे केवळ ध्यानसाधनेची क्रिया शिकली किंवा ज्ञात झाली म्हणजे त्या क्रियेचे सार कळाले असं होत नाही. कळत-नकळत असे दोषपूर्ण वर्तन घडल्यास मंत्र किंवा साधनेची उर्जा कमी-कमी होत जाते. कालांतराने तो मंत्र आणि साधना पूर्ण निष्प्रभ होण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीशी किंवा जाणकाराशी जोडले जाण्याचा जो एक आध्यात्मिक फायदा मिळायला हवा तो अशा श्रद्धाहीन साधनेद्वारे बिलकुल मिळत नाही.

काही योगसाधक ब्रह्म मुहूर्तावर योगसाधना तर करतात परंतु साधना झाल्यावर परत झोपायला जातात. खरंतर हा प्रकार टाळायला हवा. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे चांगले हे जरी बरोबर असले तरी अशाने ब्रह्म मुहूर्ताचे फायदे जेवढे मिळायला हवेत तेवढे मिळत नाहीत. ब्रह्म मुहूर्तावर छानपैकी उठायचे, साधना वगैरे करायची, कुंडलिनी आणि चक्रे यांमध्ये संतुलन साधायचे, प्राणमय आणि मनोमय कोष उर्जावान करायचा आणि एवढं सगळा केल्यावर लगेच झोपायला जायचं हे काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे शक्यतोवर हे टाळायला हवं.

आता ब्रह्म मुहूर्ता विषयी शेवटचा मुद्दा. ब्रह्म मुहूर्त हा जरी योगसाधनेसाठी अतिशय उत्तम कालावधी असला तरी त्याची परिणामकता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुमची झोपी जाण्याची वेळ, तुमचा आहार, तुमची साधना, तुमची एकूणच जीवनशैली अशा अनेक बाबींचा प्रभाव त्यावर पडत असतो. काही कारणाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करणे जमण्यासारखे नसेल तरी निराश होण्याचे काही कारण नाही. शेवटी तुमच्या हातून योगसाधना घडणे हे जास्त महत्वाचे आहे. साधनेची वेळ हा तसा दुय्यम भाग आहे. किंबहुना नवरात्री आणि महाशिवरात्री सारखे काही दिवस असे असतात जेंव्हा रात्रकालीन साधना महत्वाची मानली जाते. त्यामुळे ब्रह्म मुहूर्त साधता आला नाही तर साधनेलाच बुट्टी द्यायची असा प्रकार करू नका.

शेवटी जेंव्हा खोल अंतरंगातून स्वयमेव ब्रह्मस्मरण घडू लागेल तो खरा ब्रह्म मुहूर्त. जेंव्हा ब्रह्मनाडी शुद्ध होऊन सहस्रारातील शिवाकडे प्राणशक्ती वाहून नेण्यास सक्षम होईल तो खरा ब्रह्म मुहूर्त. जेंव्हा ब्रह्मरंध्रात जगदंबा कुंडलिनीचा प्रवेश होईल तो खरा ब्रह्म मुहूर्त.

असो.

निर्गुण निराकार ब्रह्मतत्वात आपल्या मायेने ब्रह्मांड गोळ निर्माण करणारी जगदंबा कुंडलिनी सर्व वाचकांना ब्रह्म मुहुर्तावरील योगसाधनेसाठी सहाय्य करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 23 September 2022