Untitled 1

श्रीदत्त गोरक्ष संवादातील परस्पर प्रणाम

योग-अध्यात्म शास्त्रात वारंवार असे सांगितले जाते की नराचा नारायण होण्याची किमया फक्त मानवी पिंडाच्या माध्यमातूनच शक्य आहे. आपण जर मानवेतर जीवयोनींचे निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळते की त्यांच्यामध्येही मानवाप्रमाणे इच्छा, ज्ञान आणि क्रिया या शक्ती आहेतच परंतु त्या उथळ स्वरूपात अभिव्यक्त होत असतात. मानवाला मात्र या तीन शक्तींचा वापर भौतिक मर्यादा ओलांडून उच्चतर आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती प्राप्त करण्यासाठी करता येतो.

जीव आणि शिव ऐक्याची अनुभूती दुर्लभ तर खरीच परंतु प्राचीन योग्यांनी समस्त मानवजातीसाठी ही अनुभूती प्राप्त करण्याचा मार्ग दाखविला आहे. हा मार्ग आहे मंत्र-हठ-लय-राज अशा चार प्रकारांत विभागलेला कुंडलिनी योग. अर्थात अध्यात्मशास्त्रातील अन्य क्षेत्रांप्रमाणे हा विषयही सर्वस्वी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि अनुभवाचा भाग आहे. भगवान शंकर, अवधूत दत्तात्रेय, नवनाथ, चौरांशी सिद्ध असं सामर्थ्यवान गुरुमंडल कुंडलिनी योगशास्त्राला लाभलेलं आहे. किंबहुना कुंडलिनी योग या सिद्ध गुरुमंडलाचीच देणगी आहे.

थोडे विषयांतर झाले तरी श्रीदत्त-गोरक्ष संवादातील एक वैशिष्ठ्यपूर्ण प्रसंग सांगावासा वाटतो.

श्रीदत्त-गोरक्ष संवाद नामक रचनेमध्ये अवधूत शिरोमणी भगवान श्रीदत्तात्रेय आणि नाथ सिद्ध श्रीगोरक्षनाथ यांचा संवाद आहे. रूढ अर्थाने गोरक्षनाथांचे गुरु हे जरी मच्छिंद्रनाथ असले तरी या संवादात दत्तात्रेय गुरुस्वरूप आणि गोरक्षनाथ शिष्य अशी भूमिका आहे. गोरक्षनाथ शिष्याच्या भूमिकेतून दत्तात्रेयांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि दत्तात्रेय त्यांची योगगम्य अशी उत्तरे देतात. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर गोरक्षनाथांतील शिष्य सुखावतो. शंकानिरसन झाल्याने समाधान पावतो.  तृप्त झालेले गोरक्षनाथ मग भगवान दत्तात्रेयांना म्हणतात -

स्वामी तुमही दत्त तुमही देव आद मध्य अन्ते तुम्ही जाण्यो भेद |
तुमही नारायण तुमही किरपाल तुमही सकल बिस्व के पाल ||

हे स्वामी, तुम्ही परम दत्ततत्व आहात आणि तुम्हीच साक्षात देव आहा.  तुम्हीच या विश्वाचे आदी-मध्य-अंत आहात. आज मला तुमच्या रहस्याची अर्थात दत्ततत्वाची नीट उकल झाली. तुम्ही नारायण आहात तुम्ही कृपाळू विश्वपालक आहात.

गोरक्षनाथांच्या या स्तुतीपूर्ण वचनांवर दत्तदेव म्हणतात -

स्वामी तुमेव गोरख तुमेव रछिपाल अनन्त सिद्धां माहिं तुमही भूपाल |
तुमही स्वयंभू नाथ निरवाण प्रणव दत्त गोरख प्रणाम ||

हे स्वामी, आपणच इंद्रियांचे रक्षणकर्ता अर्थात गोरक्ष आहात.  अनंत सिद्धांमध्ये श्रेष्ठ असलेले तुम्ही या पृथ्वीचे राजा अर्थात भूपाळ आहात. तुम्ही स्वयंभू नाथ आहात. निर्वाणपद तुम्हीच आहात. ओंकार स्वरूप गोरक्षनाथा दत्ताचा प्रणाम स्वीकार करावा.

भगवान दत्तात्रेयांच्या या वचनांवर गोरक्षनाथ नम्रपणे काय सांगतात पहा -

स्वामी दरसण तुम्हरा देव आदि अन्ते मधे पाया भेद |
गोरख भणई दत्त प्रणाम भोग जोग परम निधान ||

हे स्वामी, आज मला तुमचे दर्शन झाले आणि आपणच आदी-मध्य-अंत आहात हे रहस्य कळले. आपणच भोग आणि योग यांचा आधार असलेले परम निधान आहात. गोरक्षाचा प्रणाम स्वीकार करावा.

काय गंमत आहे पहा. या दोघांचे गुरु-शिष्य नाते कसे भिन्न आणि उच्च कोटीचे आहे ते जाणवल्याशिवाय रहात नाही. खरं तर भगवान दत्तात्रेय हे गोरक्षनाथांना गुरुस्वरूप पण तेच आपल्या शिष्याला अभेदभावाने प्रणाम करत आहेत कारण त्यांना गोरक्षाची योग्यता ठावूक आहे. गोरक्ष दत्तात्रेयांना "स्वामी" म्हणत आहेत आणि दत्तात्रेयसुद्धा गोरक्षनाथांना "स्वामी" म्हणत आहेत. दोघेही एकमेकाला परमतत्व मानत आहेत. भगवान शंकराचा अंश दत्तात्रेयांमध्ये आहे तसाच तो गोरक्षनाथांमध्येही आहे. त्यामुळे हे दोन शिवांश एकमेकाला प्रणाम करत आहेत. त्यांची ही अद्भूत लीला तेच जाणोत.

असो. परत विषयाकडे वळतो.

सांगायचा भाग हा की या गुरुमंडलाच्या आशीर्वचनामुळे आणि त्यांनी आखून दिलेल्या साधना प्रणालीमुळे होतं काय तर साधकाच्या पिंडामध्ये अनुग्रह शक्तीचा शिरकाव होऊन त्याची सुप्त कुंडलिनी शक्ती हळूहळू जागृत होऊ लागते. तीच शक्ती मग भौतिक आणि आध्यात्मिक स्तरावर इच्छा-ज्ञान-क्रिया या त्रिशक्ती प्रस्फुटीत करते. जर अनुग्रह शक्ती एकवटून साधकात शिरली तर तो तत्काळ ब्रह्मस्वरूप होईल. मग त्याची या जन्मींची प्रारब्ध कर्म तशीच पडून राहतील. त्यासाठी काय गंमत होते पहा. या अनुग्रह शक्तीची सावत्र बहिण असलेली निग्रह शक्ती सुद्धा हळूच साधकात स्रवते. ही निग्रह शक्ती काय करते तर अनुग्रह शक्तीशी सांगड घालून साधकाकडून प्रारब्ध कर्म यथायोग्य घडवून आणते. परिणामी साधक कर्माचरणही करतो आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा साधतो.

उद्या गुरुपौर्णिमा आहे. सर्व वाचक आपापल्या सद्गुरुंच्या भक्ती, ध्यान, मनन, चिंतनात विशेष रूपाने मग्न असणार आहेत. त्यामुळे सर्वाना खुप खुप शुभेच्छा. फार काही पाल्हाळ न लावता आदिनाथ, दत्तनाथ, गोरक्षनाथ आणि समस्त सिद्ध गुरुमंडलाला खालील प्रसिद्ध दोह्याच्या माध्यमातून मनोभावे "आदेश" करतो आणि लेखणीला विराम देतो.

अगम अगोचर नाथ तुम परब्रह्म अवतार

कानोंमे कुंडल सिर जटा अंग विभूती अपार

सिद्ध पुरुष योगीश्वरो दो मुझको उपदेश

हर समय सेवा करुं सुबह शाम आदेश ! आदेश !!

~~~~~

ॐ आदिनाथाय नमः ! ॐ उदयनाथाय नमः ! ॐ दत्तनाथाय नमः ! ॐ नवनाथाय नमः ! ॐ गुरुमंडलाय नमः !


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 15 July 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates