कच्च मडकं

एकदा एक साधक एका सदगुरूंकडे गेला. गुरूजींनी आपल्याला शिष्य म्हणून स्विकारावे म्हणून स्वतःच आपली वारेमाप स्तुती करू लागला. आपणच पात्र शिष्य कसे आहोत, अध्यात्माविषयी आपल्याला किती प्रचंड ओढ आहे, आपले वाचन आणि पुस्तकी पांडित्य कसे तगडे आहे, गुरूंकडून दीक्षा घेण्याची योग्य वेळ कशी आली आहे. अशा एक ना अनेक गोष्टी फुगवून फुगवून तो सांगू लागला.

ते गुरू निष्णात होते. असे अनेक शिष्य त्यांनी हाताळले होते. कोणत्याही निष्णात गुरूला समोरची व्यक्ती पाहिलाबरोबर ती किती पाण्यात आहे ते लगेच कळते. ते भले वरकरणी तसे न दाखवोत. याही गुरूंना त्या तथाकथित पात्र शिष्याची स्थिती लगेच कळली. त्याला धडा शिकवून योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी एक गंमत करण्याचे ठरवले.

भारावल्यासारखे ते उठले. कोपर्‍यातून एक चटई आणली. ती आपल्यापुढे टाकत ते त्या साधकाला म्हणाले, "हो रे माझ्या पाडसा! मी तुझीच वाट पहात होतो. काही दिवसांपासून माझा परमेश्वर मला सारखा सांगतोय की मी तुझ्याकडे एक सद्च्छिष्य पाठवणार आहे म्हणून. तु आलास हे फार बरे केलेस."

असे म्हणत त्यांनी चटईकडॆ हात केला. म्हणाले, "बाळ इथे बस. मी तुला आताच तात्काळ समाधी अवस्था प्राप्त करून देणार आहे. आता हे तुझे शरीर, हे जग सारे विसर. परमेश्वराच्या भेटीला जाताना यातले काहीच बरोबर नेता येणार नाही."

गुरूजींचे हे बोल ऐकल्यावर मात्र गडी हडबडला. आपला देह सोडायचा, जग विसरायचं या कल्पनेनेच त्याची छाती धडधडू लागली. खाली मान घालून तो गुरूजींना म्हणाला, "गुरूजी, आता नको. मला बायको-मुलांना विचारावे लागेल."

गुरूजी गालातल्या गालात मिस्किलपणे हसत होते. अजून एका कच्च्या मडक्याला भानावर आणल्याचे समाधानही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

तात्पर्य :- अध्यात्ममार्गावर साधकाने स्वतःविषयी अवास्तव कल्पना ठेवू नयेत. काही डझन पुस्तके वाचली, तार्कीक वादविवाद करता आला की आपण फार तयारीचे साधक आहोत असा समज करून घेऊ नये. स्वतःविषयीचा अहंकार टाकून गुरू चरणांशी बसून साधनामार्ग आचरावा.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 30 June 2010


Tags : योग अध्यात्म कथा