भगवान दत्तात्रेयांचा योगोपदेश
भगवान दत्तात्रेयांचा योगोपदेश
भारतवर्षामध्ये देवदेवतांची उपासना निरनिराळ्या मार्गानी करण्यात येते. साधक
आपापल्या कुवतीनुसार आपल्या आवडीच्या साधनामार्गावर अग्रेसर होत असतो. भगवान
दत्तात्रेयांची उपासनाही नामस्मरण, गुरुचरीत्राचे पारायण, भजन-कीर्तन अशा अनेक
प्रकारांनी केली जाते. असे असले तरी स्वतः दत्तात्रेयांनी योगमार्गाचा आणि
वैराग्याचा पुरस्कार आपल्या शिकवणीतून केलेला आढळतो. योगप्रधान आणि आचारणाने शैव
असा नाथपंथ दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांच्या माध्यमातून स्थापन केला यातच
त्यांच्या योग आणि शैव दर्शनाविषयीचा दृष्टीकोण स्पष्ट होतो. दत्तात्रेयांची शिकवण
विशद करणारे दोन महत्वाचे ग्रंथ म्हणजे अवधूत गीता आणि जाबालदर्शन उपनिषद. त्यापैकी
अवधूत गीता हा प्रामुख्याने ज्ञानमार्गाचे आणि वैराग्याचे वर्णन करतो तर जाबालदर्शन
उपनिषद योगमार्गाचे वर्णन करतो. या लेखामध्ये आपण जाबालदर्शन उपनिषदातील
दत्तात्रेयांचा योगोपदेश जाणून घेणार आहोत.
जाबालदर्शन उपनिषद म्हणजे योगीराज दत्तात्रेय आणि त्यांचा सांकृति नामक शिष्य
यांमधील संवाद. हे उपनिषद दहा खंडात विभागलेले असून त्यामध्ये अष्टांग योग
विस्ताराने वर्णन केला आहे. दत्तात्रेयांच्या अष्टांग योगाचे उद्दीष्ट शिवपदाची
प्राप्ती हे आहे. दत्तात्रेयांचा योगपद्धतीवर कुंडलिनी योगमार्गाची विलक्षण छाप आहे
हे या उपनिषदावरून लगेच लक्षात येते. यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा,
ध्यान, समाधी यांबरोबरच शरीरस्थ नाड्या, प्राणाचे उपप्रकार इत्यादी गोष्टींचे वर्णन
दत्तात्रेय आपल्या शिष्याला करताना आढळतात. अवधूत गीतेप्रमाणेच येथेही शिव हाच
सर्वभूतांत वास करणारा आत्मा आहे हे तत्व जागोजागी कथन केलेले आढळते. आता या
उपनिषदातील प्रत्येक खंडाविषयी थोडक्यात माहिती घेऊ.
खंड पहिला
जाबालदर्शन उपनिषदाच्या पहिला खंडात योगशास्त्राची आठ अंगे आणि दहा यम यांचे
वर्णन आठळते. सांकृति दत्तात्रेयांना विनंती करतो - "भगवन! मला अष्टांग योग यथार्थ
स्वरुपात वर्णन करा ज्यामुळे मी जीवनमुक्त होईन." यावर दत्तात्रेय सांगतात - "यम,
नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे
आहेत."
यम दहा प्रकारचे आहेत. ते दहा प्रकार म्हणजे - अहिंसा, सत्य, अस्तेय,
ब्रह्मचर्य, दया, आर्जव, क्षमा, धृती, मिताहार आणि शौच. हठयोग प्रदीपिकेवरील एका
लेखात मी या दहा यमांविषयी विस्ताराने लिहिलेले आहे. तेव्हा येथे पुनरावृत्ती करत
नाही. दत्तात्रेयांनी शौच हे आंतर आणि बाह्य अशा दोन प्रकारात विभागले आहे.
शरीराच्या शुद्धतेपेक्षा मानसिक शुद्धता अधिक महत्वाची असे ते सांगतात. जो व्यक्ती
'ज्ञान-शौच' न पाळता केवळ 'बाह्य शौच' पाळतो तो मूर्ख जणू सोन्याचा त्याग करून माती
जमावतो असे दत्तात्रेय आपल्या शिष्याला सांगतात.
खंड दुसरा
दुसरा खंड दहा नियमांचे वर्णन करतो. तप, संतोष, आस्तिकता, दान, ईश्वरपूजा,
सिद्धान्त श्रवण, लज्जा, मति, जप आणि व्रत हे दहा नियम साधकाला पाळावे लागतात. या
सर्व नियमांचे वर्णनही मी इतरत्र केले आहे त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही.
दत्तात्रेयांनी जपाची विभागणी वाचिक आणि मानसिक अशी केली आहे. वाचिक जप वैखरी आणि
उपांशू अशा दोन प्रकारचा असतो. वैखरी म्हणजे मोठयाने उच्चारण केलेला. तर उपांशू
म्हणजे ओठातल्या ओठात पुटपुटत केला जाणारा जप. दोनही जपपद्धतींपेक्षा मानसिक जप
श्रेष्ठ आहे. मानसिक जप ध्यानरहित आणि ध्यानसहित अशा दोन प्रकारचा आहे. वैखरी
वाणीतील जप जर एखाद्या नीच माणसाच्या कानावर पडला तर तो निष्फळ ठरतो असे दत्तात्रेय
सांगतात.
खंड तिसरा
तिसर्या खंडात नऊ योगासनांचे वर्णन आहे. ही नऊ आसने म्हणजे -
- स्वस्तिकासन
- गोमुखासन
- पद्मासन
- वीरासन
- सिंहासन
- भद्रासन
- मुक्तासन
- मयूरासन
- सुखासन
वरीलपैकी स्वस्तिकासन, पद्मासन, मुक्तासन आणि सुखासन ही ध्यानासाठी अधिक उपयोगी
आहेत तर अन्य आसने रोगनिर्मूलन करण्यास आणि शरीराला स्थैर्य प्रदान करण्यास उपयोगी
आहेत. आसनांचा अभ्यास झाल्यावर योग्याने प्राणायामाचा सराव करावा असे दत्तात्रेय
सांगतात.
खंड चौथा
जाबालदर्शन उपनिषदाचा चौथा खंड नाडीविज्ञान आणि प्राणविज्ञान या विषयांना
वाहिलेला आहे. मनुष्याचे शरीराचे माप ९६ बोटे असते. शरीराचा मध्यभाग मूलाधार
चक्राशी असतो. त्याच्याजवळच अंड्याच्या आकाराचा नाडीकंद असतो. त्या नाडीकंदातून ७२
हजार नाड्या निघतात ज्या शरीराच्या विविध भागात प्राणसंचार करवतात. या ७२ हजार
नाड्यापैकी चौदा महत्वाच्या आहेत. त्या चौदा नाद्यांपैकी तीन - इडा, पिंगला आणि
सुषुम्ना - अति महत्वाच्या आहेत. या तीनपैकी एकच नाडी - सुषुम्ना - सर्वश्रेष्ठ
आहे. सुषुम्ना वीणादंडामधून अर्थात मेरूदंडामधून जाऊन मस्तकात पोहोचते.
नाडीकंदापाशीच कुंडलिनी शक्ती सुषुम्नेचे मुख झाकून सदैव झोपलेली असते.
सुषुम्नेच्या डाव्या भागातून इडा तर उजव्या भागातून पिंगला नाडी जाते. शरीरस्थ
नाड्यांमधून दहा प्रकाराचे प्राण वाहातात. त्यांपैकी पाच मुख्य तर पाच गौण आहेत.
पाच मुख्य प्राणापैकी दोनच - प्राण आणि अपान - अधिक महत्वाचे आहेत.
पिंगला, इडा आणि सुषुम्ना या नाड्यांची दैवते अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु आणि शिव
आहेत. मस्तकात "श्रीशैल" आहे तर भ्रूमध्यात "काशी" आहे. शरीर-मनातील अशुद्धी बाह्य
तीर्थांमध्ये डूबक्या मारून घालवता येत नाही. ज्याप्रमाणे मद्याने भरलेला घडा
बाहेरून शंभरवेळा जरी धुतला तरी त्यातील मद्य काही धुतले जात नाही त्याप्रमाणे.
बाहयतीर्थापेक्षा आंतरिक तीर्थ श्रेष्ठ आहे. शिवस्वरूप परमात्मा याच शरीरात वास
करतो हे न जाणणारा मूर्ख तीर्थ, दान, यज्ञ इत्यादींमध्ये व्यर्थ शिव शोधत बसतो.
योगी पुरुष आपल्या आत्म्यात शिवदर्शन करतो जड मूर्त्यांमध्ये नाही. जड प्रतिमांचा
उपयोग केवळ अज्ञानी मनुष्याच्या मनात परमेश्वराविषयी भक्ति जागृत करण्यासाठी होतो.
खंड पाचवा
चौथ्या खंडात नाडीविज्ञान विशद केल्यावर दत्तात्रेय आता नाडीशोधन कसे करावे ते
पाचव्या खंडात सांगतात. कामना आणि फलप्राप्ती यांचा त्याग करून साधकाने
सत्पुरुषांकडून योगशिक्षण घ्यावे. त्यानंतर परवतशिखर, नदी-तट, बिल्व वृक्षाजवळ अथवा
अन्य एखाद्या पवित्र स्थानी रहावे. पूर्वेला अथवा उत्तरेला तोंडकरून स्थिर
शरीर-मनाने नाडीशोधन प्राणायाम करावा. प्राणायामाने शरीर हलके होते, जठराग्नि
प्रदीप्त होतो आणि अनाहत नाद प्रगट होऊ लागतो असे दत्तात्रेय सांगतात.
खंड सहावा
सहाव्या खंडात नाडीशोधन प्राणायामाचा विधी विस्ताराने दिलेला आहे. हा विधी मी
अन्यत्र दिलेला असल्याने येथे परत देत नाही. प्राणायामाचा अभ्यास सुरू केल्यानंतर
घाम येतो, शरीरात आणि मेरूदंडात कंपने जाणवतात, शरीर वर उडल्यासारखे वाटते. हा
अनुक्रमे अधम, माध्यम आणि उत्तम प्रकारचा प्राणायाम होय.
सहाव्या खंडाचा उर्वरित भाग आरोग्याप्राप्तीसाठी प्राणसाधना कशी करावी ते
सांगतो. या सर्वच क्रिया येथे देता येणे शक्य नाही पण त्यांमध्ये प्रामुख्याने
प्राण शरीराच्या विशिष्ट स्थानी स्थापून त्यावर धारणा करणे, काकी मुद्रा, षणमुखी
मुद्रा, लिंगनलिकेद्वारे वायु आत खेचणे इत्यादि प्रक्रियांचा समावेश आहे.
खंड सातवा
जाबालदर्शन उपनिषदाच्या सातव्या खंडात प्रत्याहाराचे प्रकार सांगितले आहेत.
इंद्रियांची बाह्य जगताकडे असलेली धाव थांबवून त्यांना विषयांपासून परावृत्त करणे
म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहाराचे जाबालदर्शन उपनिषदात दिलेले प्रकार खालीलप्रमाणे
-
- मनुष्य जे काही अनुभवत आहे ते ब्रह्मरूप आहे अशी भावना ठेवणे
- जी काही कर्मे - चांगली अथवा वाईट - ती परमेश्वराला अर्पण करणे
- नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मे ईश्वरासाठी करणे
- वायुला मुखापासून ते पायापर्यंत विविध स्थानांवर घेऊन जाणे
- दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास घेऊन तो मस्तकात धारण करणे
- एकाग्रचित्ताने आत्मतत्वाचे चिंतन करणे
खंड आठवा
आठवा खंड धारणेचे दोन प्रकार वर्णन करतो. पहिला प्रकार म्हणजे पंचमहाभूतांवरील
धारणा. यामधे आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी या पाच भूतांवर त्यांच्या त्यांच्या
बीजमंत्रांच्या उच्चारनाद्वारे मन एकाग्र केले जाते. या धारणेने सर्व पापांचा नाश
होतो.
धारणेचा दुसरा प्रकार म्हणजे आत्मतत्वाचे चिंतन करणे. सर्वाचराचरात एकच निर्गुण,
आनंदमयी आत्मतत्व भरलेले आहे असे चिंतन केल्यानेही सर्व पापे नष्ट होतात.
खंड नववा
जाबालदर्शन उपनिषदाचा नववा खंड ध्यानाचे दोन प्रकार कथन करतो. ध्यानामुळे
संसार-बंधनाचा नाश होतो. ध्यानाचा पहिला प्रकार म्हणजे समस्त संसाररूपी रोगाचे
एकमात्र औषध म्हणजे ऊर्ध्वरेतावस्था प्राप्त केलेला, भयंकर नेतरांचा, योग्यांचे
ईश्वर, विश्वरूप आणि महेश्वर असा परमात्मा आहे असे चिंतन करणे. बुद्धिमध्ये असा
निश्चय करावा की 'मीच परब्रह्म परमात्मा आहे'. हा ध्यानाचा प्रकार सगुण आहे.
ध्यानाचा दुसरा प्रकार म्हणजे सत्यस्वरूप, ज्ञानरूप, आनंदमय, नित्य,
आदि-मध्य-अंत नसलेला, देहातीत आणि सत्चितानंद परब्रह्माचे आपल्या आत्मतवात
निश्चयात्मक बुद्धीने चिंतन करणे. हे निर्गुण ध्यान आहे.
दत्तात्रेय ग्वाही देतात की - या प्रकारे ध्यानाभ्यास करणार्या साधकाला
वेदान्त वर्णीत ब्रह्मतत्वाचे निश्चित प्रकारे ज्ञान होते यात शंकाच नाही.
खंड दहावा
दहावा खंड समाधीचे वर्णन करतो. परमात्मा आणि जीवात्मा हे एकच आहेत असा बुद्धीचा
निश्चय होणे म्हणजे समाधी होय अशी व्याख्या दत्तात्रेय करतात. आत्मतत्व एक
असूनसुद्धा मायेमुळे अनेक प्रकारे भासमान होते. अज्ञानी पुरुष एकाच वस्तूला जीव आणि
ईश्वर असे संबोधतात. मी देह नाही, प्राण नाही, मी इंद्रियसमुह नाही, मी मनही नाही,
मी शिवस्वरूप परमात्मा आहे अशा प्रकारची जी निश्चयात्मक बुद्धी तिलाच समाधी
म्हणतात.
जो योगी सर्वत्र व्यापक अशा आत्मचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता तो स्वतः
परमेश्वस्वरूपच बनतो. तो साक्षात ब्रह्म बनतो. त्याला परमानंदाची प्राप्ती
होते.
हा उपदेश देऊन भगवान दत्तात्रेय मौन झाले. मुनि सांकृति हा उपदेश ग्रहण करून
धन्य झाले आणि आपल्या यथार्थ स्वरूपाला जाणून सुखमय अवस्थेत राहू लागले.