Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

स्वयंभू लिंगावरील नागीण आणि अवधूताची अजगरवृत्ती

आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात वारंवार वेगवेगळ्या कारणांनी प्रकट होणारा प्राणी म्हणजे नाग. भगवान शंकराच्या कंठापासून ते मुलाधार चक्रात निवास करणाऱ्या कुंडलिनी शक्तीपर्यंत हे नागाचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहते. नाग, नाग देवता, नाग वंश, नागांची अनंत-वासुकी-तक्षक-कर्कोटक इत्यादी आठ / नऊ नागकुळे अशा विविध प्रकारांनी प्राचीन योग-अध्यात्म साहित्यांत नाग डोकावत रहातो. एका बाजूला नागाविषयीची भीती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विषयी असलेला आदर आणि भक्ती अशा दुहेरी स्वरूपात नागाचे रूपक आपल्याला आढळून येते.

कुंडलिनी योगमार्गाच्या पारंपारिक ग्रंथांत कुंडलिनीची ओळख ही "निद्रिस्त सर्पिणी" अशा स्वरूपातच करून दिलेली आहे. त्यामुळे नवख्या साधकाला या फुत्कारणाऱ्या भूजांगी विषयी काहीसे भीतीयुक्त कुतूहल वाटत असते. कुंडलिनीला सर्पिनीच्या रुपात मानण्याचे कारण मी माझ्या अन्य काही लेखांत दिलेले आहे त्यामुळे येथे परत त्या विषयात जात नाही. मुलाधार चक्रात भगवान शंकराने स्वयंभू लिंगाची स्थापना करून स्वतः त्यात कुंडलिनी शक्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

सर्वसामान्य भौतिक आयुष्य जगणाऱ्या माणसांमध्ये ही नागीण निद्रिस्त अवस्थेत स्वयंभू लिंगाभोवती साडेतीन वेटोळे घालून पहुडलेली असते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर या नागिणीचे समर्पक वर्णन करतांना म्हणतात -

नागिणीचे पिले कुंकुमे नाहले। वळण घेऊनी आले सेजे जैसे।
तैसी हे कुंडलिनी मोटकी औटवळणी। अधोमुख सर्पिणी निदेली असे॥
ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा। जया विश्वबीजाचिया कोंभा माउली केली।
ते शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी। जे प्रणवाची उघडी जन्मभूमि॥

स्वयंभू लिंगाला वेढे देऊन बसलेले हे नागिणीचे पिल्लू कसे आहे तर कुंकुमार्चन केल्याप्रमाणे रक्तवर्णाचे. या निद्रिस्त सर्पिणीने आपमे मुख खालच्या बाजूला केलेले आहे म्हणजेच ती भौतिक जगतात रमलेली आहे. कुंडलिनीची साडेतीन वेटोळी म्हणजे प्रणवाच्या साडेतीन मात्रा. कुंडलिनी जागृत झाली की ती हे वेटोळे उलगडते.

सर्वसामान्यांच्या गर्दीपासून स्वतःला वेगळे ठेऊन काही योगामार्गी मोठ्या धीराने त्या झोपलेल्या नागीणीला प्राणायाम-बंध-मुद्रा यांच्या सहाय्याने डिवचतात. तिला झोपेतून जागं करतात. झोपमोड झालेली ती आदिशक्ती रागाने जणू फुत्कारते. योगसाधाकाला भिववण्याचा प्रयत्न करते. खरा योगसाधक न घाबरता तिला सुषुम्ना मार्गाने पुढे ढकलतो. सुरवातीला रागाने फुत्कार टाकणारी ती नागीण एक दिवस सहस्त्रारात आपल्या प्रियकराच्या मिठीत विसावते आणि आनंदाने अमृताच्या तळ्यात चिंब न्हाऊन निघते.

एकच शक्ती पण जेंव्हा ती अधोमुख असते तेंव्हा व्यक्तीला जड-भौतिक जगतात गुंतवून ठेवते आणि जेंव्हा ऊर्ध्वमुख होते तेंव्हा त्याला संसारसागरातून लीलया तारून नेते. शंभूजती गोरक्षनाथ एके ठिकाणी म्हणतात -

कन्दोर्ध्वं कुण्डली शक्तिः शुभमोक्ष प्रदायिनी ।
बन्धनाय च मूढ़ानां यस्तां वेत्ति वेदविद्‌ ॥

खरंतर ही छोटेखानी पोस्ट इथेच संपवायचा विचार होता पण शेवटची ओळ लिहिता लिहिता भगवान दत्तात्रेयांनी प्रेरणा दिली की - "अरे, सापांचा विषय सुरु आहे तर माझ्या अजगरवृत्ती विषयी सुद्धा काही सांग". श्रीदत्तात्रेयांची इच्छा म्हणजे साक्षात आज्ञा त्यामुळे एक-दोन परिच्छेद वाढवतो आहे.

साप किंवा नाग म्हटलं की डोळ्यांसमोर एका लखलखीत, तेजस्वी आणि चपळ असं काहीसं चित्र उभं रहातं. या उलट अजगर म्हटलं की अत्यंत सुस्त, मंद, जाडजूड असा एका प्राणी डोळ्यांपुढे उभा रहातो. गंमत म्हणजे चपळ नागातील गुण जसे योग-अध्यात्म शास्त्राला भावलेले आहेत तसे सुस्त आणि मंद अजगरा मधील गुण सुद्धा भावलेले आहेत. अवधूत अवस्था प्राप्त झालेल्या सिद्ध योग्याची जी काही निरनिराळी लक्षणे आणि चिन्हे योग-अध्यात्म शास्त्रात सांगितली आहेत त्यामधील एक लक्षण म्हणजे - अजगरवृत्ती.

अजगरा विषयी असं म्हटलं जातं की तो भक्ष्य पकडायला आपणहून भक्ष्याच्या मागे कधी लागत नाही. स्थूल जड आणि सुस्त अशा देह स्वभावामुळे कदाचित त्याला तसं शक्य होत नसावं. मग तो भक्ष्य कसे बर पकडतो? तर तो भक्ष्य येण्या-जाण्याच्या मार्गात शांतपणे पहुडतो. ज्या वेळी भक्ष्य त्या मार्गावरून जाते त्यावेळी ते आयतेच अजगराच्या तावडीत सापडते. भक्ष्य कधी येईल हे काही सांगता येत नाही. कदाचित भक्ष्य त्या मार्गाने येईल किंवा येणारही नाही. जर भक्ष्य सहज त्या मार्गाने आले तर पकडायचे अथवा शांत पणे आहे तसे बसून राहायचे अशी त्याची एकूण कार्यपद्धती असते.

अवधूत योगी सुद्धा अशीच मनोवृत्ती धारण करतो. अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मुलभूत गोष्टींसाठी सामान्य माणूस आयुष्यभर प्रयत्नरत असतो. अवधूत योगी मात्र आत्मानंदात एवढा बुडालेला असतो की त्याला या सर्व गोष्टींच्या मागे जाण्याची इच्छाच होत नाही. जर कर्मधर्मसंयोगाने काही प्राप्त झाले तर तो ते ग्रहण करतो अन्यथा आहे त्या स्थितीत समाधानी रहातो. ही अवस्था अर्थातच अत्यंत उच्च कोटीची आहे. योगमार्गावर आयुष्य घालवलेल्या लोकानासुद्धा देहधर्म टाकता येत नाहीत. अवधूत योगी मात्र तहान-भुकेच्या पलीकडे पोहोचलेला असतो. अवधूत योग्याची ही परावस्था अधोरेखित करण्यासाठी अजगरवृत्ती असे विशेषण वापरतात.

असो.

सर्व नागकुळांचे भूषण असलेला भगवान सदाशिव आणि अवधूत शिरोमणी भगवान दत्तात्रेय सर्व योगप्रेमी वाचकांना मुलाधारातील भुजांगीची प्रीती प्रदान करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 02 August 2022