गणपतीचे पूजन सर्वप्रथम का?

आपल्याकडे कोणतेही कार्य प्रारंभ करण्यापूर्वी गणेशपूजन करण्याची प्रथा आहे. अगदी उद्योग-धंद्याची सुरवात असो की एखाद्या ग्रंथाची सुरवात श्रीगणेशाला वंदन करूनच कार्याला सुरवात केली जाते. शिवपुराणात श्रीशंकराने आणि पार्वतीने गजाननाला तसा वरच दिला आहे. असे सांगितले जाते की शंकर जेव्हा त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा प्रथम गणेशपूजन न करताच धनुष्यावर बाण चढवण्यास सरसावला. गणेशपूजन न केल्यामुळे त्याला नेम काही साधता येईना. तेव्हा पार्वतीने शंकराला गजाननाला दिलेल्या वराची आठवण करून दिली. मग श्रीशंकर आणि पार्वती दोघांनी गणेशपूजन केले आणि मगच शंकराला त्रिपुरासुराचा वध करण्यात यश मिळाले. गुरूचरित्र, नवनाथ भक्तीसार, ज्ञानेश्वरी इत्यादी प्रसिद्ध ग्रंथांच्या कर्त्यांनीच नव्हे तर गोरक्षनाथांसारख्या सिद्ध शिवमय योग्याने देखील आपल्या अनेक ग्रंथांत आरंभी गणेशाला वंदन केलेले आढळते.

गणेशाचे महत्व सांगणार्‍या या कथा हा एक भाग झाला पण गणेश पूजन सर्वप्रथम करण्याचा योगशास्त्रीय अर्थ काय बरे? मागे मी एका लेखात गणेश जन्माच्या कथेचा गूढ अर्थ विशद करून सांगितला होता. त्यात आपण पाहिले की गणपती हे पृथ्वीतत्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून अर्थात पृथ्वीतत्वापासून त्याची निर्मीती केली आहे. आपणास हे ही माहित आहे की या जगातील सर्वच जड गोष्टी पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत. आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी ही ती महाभूते. मानवी देहाचा आणि जीवनाचे नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला असे आढळून येईल की आकाश, वायू, अग्नि आणि जल ही तत्वे पृथ्वीतत्वाच्या आधारानेच कार्य करतात. उदाहरणार्थ मानवी शरीर घ्या. शरीरातील रक्त, मुत्र, लाळ ह्या गोष्टी जरी जलतत्वाच्या प्रतिक असल्या तरी मांस, अस्थी या पृथ्वीतत्वाच्या घटकांशिवाय त्यांचा वापर शरीर करूच शकणार नाही. बाह्य सृष्टीतही हाच प्रकार आढळेल. अगदी सरोवराचे पाणीही शेवटी पृथ्वीतत्वाने बनलेल्या खड्ड्यातच असते. हाच प्रकार अन्य तत्वांच्या बाबतीतही दिसून येतो. याचाच अर्थ अन्य तत्वांना कार्य करण्यास पृथ्वीतत्व आवश्यक असते. पृथ्वीतत्वाचे महत्व सिद्ध करण्यास हे पुरेसे आहे.

तुमच्यापैकी ज्या कोणी गणपती अथर्वशिर्ष वाचले वा पठण केले असेल त्यांना "त्वंमूलाधारस्थितोसिनित्यं" अर्थात "हे गणेशा तू मूलाधारात सदैव वास करतोस" हे माहितच असेल. कुंडलिनी योगशास्त्रानुसार मज्जारज्जूच्या खालच्या टोकाजवळ असलेले मूलाधार चक्र हे पृथ्वीतत्वाचा केंद्रबिंदू आहे. सर्वसाधारण माणसात याच चक्रापाशी कुंडलिनी सुप्तावस्थेत पहुडलेली असते. कुंडलिनी जागृतीच्या दृष्टीने मुलाधार चक्र हे फार महत्वाचे आहे. योगशास्त्रात सांगितलेली सिद्धासनासारखी आसने आणि महाबंध, महामुद्रा, महावेध, मूलबंध यांसारख्या मुद्रा मुलाधार चक्राच्या जागृतीचे कार्य करतात. या चक्रापाशी पृथ्वीतत्वाचे आधिक्य असल्याने तेथे श्रीगणेशाचे अधिष्ठान मानले गेले आहे. जोवर हे चक्र जागृत होत नाही तोवर कुंडलिनी शक्ती वरच्या चक्रांवर जाऊ शकत नाही. श्रीगणेश या कुंडलिनी शक्तीचा रक्षणकर्ता आहे. श्रीगणेशाला आणि पर्यायाने मूलाधार चक्राला प्रसन्न केल्या खेरीज कुंडलिनीला जागृत कसे बरे करता येईल? श्रीगणेशपूजन सर्वप्रथम करण्यामागे हे खरे योगशास्त्रीय कारण आहे.

सो. आमच्या सर्व वाचकांना श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. श्रीगजानन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ऋद्धी, सिद्धी आणि बुद्धी प्रदान करो हीच त्याच्या चरणी नम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 11 September 2010


Tags : अध्यात्म कुंडलिनी चक्रे कथा विचार