Untitled 1

सफल योगजीवनाची "रेसिपी"

तत्वं बीजं हठ: क्षेत्रमौदासीन्यम जलं त्रिभी: ।
उन्मनी कल्पलतिका सद्य एव प्रवर्तते ॥
~ हठयोग प्रदीपिका

सुलभ विवरण :  हठयोग प्रदीपिका हा योगी स्वात्माराम याने लिहिलेला ग्रंथ. स्वात्माराम हा नाथ पंथी योगी असावा असे त्याने स्वतः दिलेल्या परंपरेवरुन कळून येते. त्याने येथे सर्वच योग्यांना उपयोगी पडेल असा संदेश दिलेला आहे. स्वात्माराम म्हणतो - मन म्हणजे जणू बीज, हठयोग म्हणजे जमीन आणि औदासिन्य किंवा वैराग्य म्हणजे पाणी. या तिघांचा योग्य मेळ झाला की उन्मनी नावाचा कल्पवृक्ष अचानक प्रकट होतो.

नवख्या योगसाधकांचा असा एक गोड गैरसमज असतो की दिवसांतून काही वेळ आसनं, प्राणायाम, ध्यान वगैरे केलं की योगी बनता येईल. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी स्वात्मारामाने सफल योगजीवनाची "रेसिपी" सांगून टाकली आहे. स्वात्माराम जरी हठयोगाबद्दल बोलत असला तरी झाडून सर्व अध्यात्ममार्गांना ही रेसिपी लागू पडते. या रेसिपीचे तीन घटक आहेत - मन, हठयोग आणि वैराग्य.

वरील श्लोकात तत्व म्हणजे मन कारण मन जेंव्हा अमन होतं तेंव्हाच योग साधतो. हे मन अर्थातच सर्वसामान्य माणसाचे चंचल मन नव्हे. ते आहे योगसाधकाचे यम-नियमांच्या ऐरणीवर तावून-सुलाखून तयार केलेले मन. आपले मन ज्याच्या ताब्यात आहे त्याचे अर्धे कार्य झाल्यातच जमा आहे. योग हा मानाच्या सहाय्याने साधायचा आहे त्यामुळे मनाला बीज म्हटले आहे.

दुसरा घटक आहे हठयोग. स्वात्माराम स्वतः हठयोग परंपरेतील असल्यामुळे त्याने हठयोगाचा उल्लेख केला आहे. पण अन्य साधना मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांनाही आपापल्या साधनेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. साधना ही काही आठवड्यातून एकदा दोनदा करण्याची गोष्ट नाही. ज्याप्रमाणे अन्न, पाणी हा दैनंदिन जीवनाचा भाग बनतो तसच साधानासुद्धा दैनंदिन जीवनात मुरायला पाहिजे. साधनेशिवाय मनाला आवरणे अशक्य आहे. त्यामुळे योग म्हणजे जमीन असे स्वात्माराम म्हणतो.

नुसत्या जमीनीत झाडाचे बी पेरले तर रोप येईल का? अर्थातच नाही. त्याला जेंव्हा पाणी द्याल तेंव्हाच त्या बी मधून अंकुर फुटतील आणि मग रोपटे उगवेल. त्यामुळे पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. योग्यासाठी हे पाणी म्हणजे औदासिन्य किंवा वैराग्य. आता वैराग्य म्हणजे काही नेसत्या वस्त्रांनिशी घर सोडून जाणे नाही किंवा नोकरी-धंदा त्यागून साधना करायला जंगलात जाणे असेही नाही. आयुष्यातील सुखदुखाःबद्दल औदासिन्य आले की मनात समत्वभाव स्थापित होतो. वैराग्याचा उदय होतो. जोवर वैराग्य नाही तोवर आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्याची पात्रता अंगी बाणात नाही. वैराग्य हे कठीण तर आहेच पण त्याला तरणोपाय नाही. भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये वैराग्य प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्म असे जे सांगितले आहे त्याचे महत्व आता लक्षात येऊ शकेल.

हे तीन घटक साधले की काय होते? तर उन्मनी अवस्था प्राप्त होते. सोप्या भाषेत उन्मनी म्हणजे समाधी किंवा तुर्या. स्वात्मारामाने उन्मनीला कल्पवृक्षाची उपमा दिली आहे. कल्पवृक्ष जे मनी इच्छा धरावी ते ते देतो. त्याचप्रमाणे उन्मनी योग्याच्या सकल इच्छा पूर्ण करते. आता येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की इच्छा म्हणजे गाडी-बंगला नाही. योग्याच्या इच्छा म्हणजे अध्यात्ममार्गावरील सात्विक इच्छा असतात. कित्येकदा तर त्या इच्छा स्वतःसाठी नसतात तर विश्वासाठी असतात.

असो. तर तात्पर्य हे की या तीन घटकांची सिद्धता होत नाही तोपर्यंत दृढ प्रयत्न, अभ्यास, निधिध्यास यांची कास धरणे हाच एकमेव तरणोपाय आहे. अन्य मार्ग नाही.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 12 April 2017