Untitled 1

आजानुबाहु अवतारी सत्पुरुष

नुकताच १३ एप्रिल २०१९ रोजी श्रीराम नवमीचा उत्सव सर्वत्र साजरा झाला. वाल्मिकी रामायणात श्रीरामाची जी काही शारीरिक वैशिष्ठ्ये सांगितली आहेत त्यांत असा उल्लेख आहे की श्रीराम आजानुबाहु होता. आजानुबाहु म्हणजे असा व्यक्ती की जिचे हात गुढग्यापर्यंत लांब असतात.

काही जण असंही म्हणतात की आजानुबाहु असल्यामुळे श्रीराम धनुर्विद्येत प्रवीण होता. हात लांब असल्याने त्याला मोठ्या आकाराचे धनुष्य पेलता येत असे आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा इतरांपेक्षा अधिक लांब ओढता येत असे.

आजानुबाहुपणा हा सहजपणे आढळून येणारा मनुष्य शरीराचा गुणधर्म नाही. फारच थोड्या लोकांमध्ये हे शरीर वैशिष्ठ्य दिसून येते. अध्यात्मिक जगतात ह्या आजानुबाहु गुणवैशिष्ठ्याचे एक गूढच आहे. अनेक अवतारी मानले गेलेले सिद्ध आणि सत्पुरुष आजानुबाहु होते असे आपल्याला दिसून येते. त्यासंदर्भात अनेक लोकप्रिय सत्पुरुषांची नावे सांगता येतील. वानगी दाखल दोन-तीन उदाहरणे देतो.

नाथ संप्रदायाचे सिद्ध शिरोमणी शंभू जती श्रीगोरक्षनाथ सुद्धा आजानुबाहु होते. नवनाथ पोथीच्या नवव्या अध्यायात गोरक्षनाथ बारा वर्षीय बालकाच्या रुपात अवतीर्ण कसे खाले त्याचे वर्णन आहे. तेथे त्यांना खांद्यापासून सरळसोट आखीव-रेखीव हात आणि "अजानबाहू" असेच म्हटलेले आहे.

दुसरे उदाहरण द्यायचे तर शेगावच्या सिद्ध योगी संत श्रीगजानन महाराज यांचे देता येईल. ते दिगंबर, पिशाचवृत्ती वगैरे अवधूत लक्षणांनी सुशोभित तर होतेच पण आजानुबाहु होते. श्रीगजानन महाराजांच्या पोथीत तसा उल्लेख आढळतो.

अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर धनकवडीच्या नाथपंथी अवलिया श्रीशंकर महाराज यांचे देता येईल. शरीराने "अष्टावक्र" असलेले श्रीशंकर महाराज आजानुबाहु सुद्धा होते.

अध्यात्म जगतात अशी अजूनही उदाहरणे आपल्याला आढळतील. कदाचित परमेश्वराने अशा सत्पुरुषांच्या बाबतीत ते अवतारी असल्याची एक सांकेतिक शारीरिक खुण म्हणून हा गुणधर्म त्यांना प्रदान केला असावा. या आजानुबाहु सत्पुरुषांनी श्रीरामाप्रमाणे युद्धातले धनुष्य जरी उचलले नसले तरी जन उद्धाराचे आणि भक्तांना अध्यात्ममार्गावर आणण्याचे शिवधनुष्य आपापल्या काळी नक्कीच पेलले. आजही त्यांचा भक्तवर्ग त्यांच्या लीलांमधून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतो आहे.

असो.

सर्व वाचक श्रीरामाच्या आणि सत्पुरुषांच्या गुणादर्शांचे आचरण करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 Apr 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates