Untitled 1

जसा भाव तसं फळ

कधी कधी आयुष्यातील छोट्या छोट्या घटना सुद्धा किती आनंद देऊन जातात.

कालचीच गोष्ट. योग दिन होता त्यामुळे दिवसभर माझे स्टुडंटस येत होते. कुणाला शंकानिरसन करायचं होतं तर कुणाला साधना नीट होतेय ना ते विचारायचं होतं.

पुण्यावरून दोघं जण येणार होते. नेमकी आदल्या दिवशी रात्री त्यांची गाडी खराब झाली. पहाटे पहाटे निघाले तर परत काही कारणांनी थांबावे लागले. त्यात परत पावसाची आणि ट्राफीकची धास्ती. मधून मधून फोन करत होते. त्यांना भीती की मी निघून गेलो तर खेप फुकट जाईल कारण त्यांना दिलेली अपॉइंटमेंटची वेळ केंव्हाची उलटून गेली होती.

शेवटी एकदाचे पोहोचले. आत आले. पाणी वगैरे प्यायले आणि बसले. मी बोलणं सुरु करणार एवढ्यात त्यातला एकजण म्हणाला - "सर, एक मिनिट". आपल्या काहीशा ओल्या झालेल्या बॅगमधून त्याने स्टीलचा छोटा डबा काढला. डबा उघडला तर आतमधून सोनचाफ्याच्या फुलांचा मनाला प्रसन्न करणारा सुगंध येऊ लागला.

मला नमस्कार केला. खोलीत सद्गुरू श्रीशंकर महाराजांची तसबीर आहे तीला नमस्कार केला. डब्यातले एक फुल विनम्रपणे मला दिलं. मग डबा हातात देत म्हणाला - "आमच्या कंपाउंड मध्ये झाड आहे. अगदी पहाटे पहाटे काढलीयत. ही तुम्हीच महाराजांना घाला."

किती साधी आणि छोटीशी कृती. पण त्याच्या मनातला सात्विक आणि शुद्ध भाव कळायला पुरेशी होती. त्याचं कौतुकही वाटलं आणि स्वतःलाही खुप छान समाधानी वाटलं. पुण्यावरून येणं, पहाटे पहाटे उठून प्रवास, बिघडलेली गाडी, नंतर झालेला विलंब एवढं सगळं होऊन सुद्धा न विसरता महाराजांसाठी फुलं घेऊन आला. माणसाच्या मनातील भाव त्याच्या कृतीतून लगेच समजतो show-off  करून दाखवावा लागत नाही. जसा भाव तसं फळ.

काही स्टुडंटस असे मनात घर करून जाणारे असतात.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 June 2017