Untitled 1

जिये मार्गींचा कापडी महेशु आझुनी

अध्यात्ममार्गी भक्त-साधकजनांना सध्या महाशिवरात्रीचे वेध लागलेले आहेत.  काही दिवसांपूर्वी कोणा एका साधकाने एक काहीसा गमतीशीर वाटेल असा प्रश्न विचारला. म्हणाला - "सर, इंटरनेटवर अनेक ठिकाणी शंकराच्या आवडीच्या म्हणून एवढ्या गोष्टी दिल्यात... बिल्वपत्र, दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, अजून कसल्या-कसल्या गोष्टींचा अभिषेक, भांग, धतुरा, जायफळ, श्वेतपुष्प, भस्म, रुद्राक्ष... ढीगभर गोष्टी आहेत... हे असं काही वाहून खरंच काही फायदा होतो का.... नक्की काय अर्पण करावं तेच कळत नाहीये..."

मी म्हटलं -

हे पहा, या गोष्टी अर्पण करून भगवान शंकर प्रसन्न होतो की नाही हे ज्याचे त्याने आपापल्या श्रेद्धेने ठरवावे. मी काही त्यात सांगू इच्छित नाही. पण एक गोष्ट अशी आहे की जी केल्याने भगवान शंकर अगदी १०० टक्के प्रसन्न होतो. ती गोष्ट म्हणजे - योगसाधना.

ज्या योगसाधनेसाठी शिवशंकराने वैराग्य पांघरलं, ज्या योगाभ्यासासाठी त्याने महाल टाकून स्मशानवास आपलासा केला, ज्या योगाचा मंत्र-हठ-लय-राज असा विस्तार त्याने स्वतः पार्वतीला शिकवला. असा योग त्याला जीव की प्राण आहे. एके ठिकाणी भगवान शिवशंकर पार्वतीला म्हणतात - "देवी! जो माझ्यामध्ये मन लावून योगाभ्यासाचे यथाविधी आचरण करतो तोच माझा उत्तम भक्त होय असे मी मानतो."

एवढेच कशाला पण हा योग शंकराच्या एवढा आवडीचा आहे की देवांचा देव असे बिरूद मिरवत असूनही तो अजूनही साधक बनून योग आचरतो आहे. दुसऱ्याला मार्ग दाखवण्यासाठी. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात एव ओवी आहे. ती अशी -

तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी ।
जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि ॥

या ओवीचा सोप्या शब्दात अर्थ असा की - ज्या योगमार्गाच्या प्रवृत्तीरुपी वृक्षाखाली निवृत्तीरुपी फळे प्राप्त होतात. अर्थात ज्या योगमार्गाचे आचरण केल्याने निवृत्ती म्हणजे मोक्ष नामक फळ मिळते, त्या योगमार्गावर भगवान शंकर अजूनही वाटचाल करत आहे.

बहुधा संत ज्ञानेश्वरांनी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच हे मुद्दाम लिहून ठेवलय - "जिये मार्गींचा कापडी महेशु आझुनी". सदाशिव आजसुद्धा योगमार्गाचा वाटसरू बनून जणू सांगतोय की बाबांनो येथे "पोहोचलेला" असा कोणी नाही. थोड्याफार आध्यात्मिक प्रगतीचा अहंकार चढू देऊ नका. शेफारून जाऊ नका. पुस्तकी पांडित्यावर विसंबून राहू नका. सतत साधनारत रहा. उतू नका मातु नका, घेतला वसा टाकू नका. ही अनंताची वाटचाल आहे. अनंताच्या पायऱ्या चढत रहा. चालत रहा...

असो. आज इतकंच.

आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने सर्व वाचकांची योगमार्गावरील वाटचाल सुखमय होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 March 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates