Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

श्रीशंकराची विशेषता

प्राचीन काळी एकदा एका प्रख्यात महर्षींना अन्य ऋषींनी विचारणा केली, "गुरूवर, या जगात अनेक देवदेवता आहेत. त्या सर्वांचीच उपासना करणे आमच्या सारख्यांना कठीण वाटते. असे कोणते दैवत आहे ज्याची उपासना केल्याने अन्य सर्व दैवतांची उपासना केल्याचे फळ प्राप्त होईल?" यावर ते महर्षी उत्तरले, "शिव". यावरूनच श्रीशंकराची श्रेष्ठता लक्षात येते.

कूर्म पूराणात निःसंदिग्धपणे असे सांगितले आहे की शंकर हे कलियुगातल्या मानवांसाठीचे दैवत आहे. त्यासंबंधीचा खालील श्लोक पुरेसा बोलका आहे.

ब्रह्मा कृतयुगे देवस्त्रेतायां भगवान रविः।
द्वापरे दैवतं विष्णु कलौ देवो महेश्वरः॥

या श्लोकाचा अर्थ असा की कृतयुगातील उपास्य दैवत ब्रह्मदेव, त्रेतायुगातील सूर्यदेव, द्वापार युगातील विष्णु तर कलियुगातील महेश्वर अर्थात शंकर हे आहे.

भारतवर्षामधे अनादी काळापासून शिवोपासना आणि शिवयोग प्रचलित आहे. सिंधु संस्कृती संबंधीच्या उत्खनन आणि संशोधनानंतर अनेक तज्ञांनी हे मान्य केले आहे की प्राचीन भारतात शैव संस्कृतीचा अत्यंत प्रभाव होता. मोहंजोदाडो, हरप्पा येथील उत्खननात पशुपतीनाथाची आकृती असलेली मुद्रा सापडली आहे. शिव पार्वतीला योगसाधना शिकवत आहे अशा आशयाच्या आकृत्याही सापडल्या आहेत. तज्ञांच्या मते हरप्पा हे नावच मुळात शंकराचे आहे. ते हर + अप्पा असे बनले आहे. हर म्हणजे शंकर आणि अप्पा म्हणजे द्रविडीभाषेत वडिल. अर्थातच हरप्पा म्हणजे शंकराला आदरपूर्वक परमपिता मानलेले आहे. याच संबंधी नुकतेच झालेले एका वैज्ञानीक संशोधनातही महत्वाचे आहे.

असे असुनही काही कुतर्कवादी असे म्हणतात की - काय तो शंकर! त्याचे वर्तन वेदबाह्य आहे. स्मशानात काय बसतो. भस्म काय फासून घेतो. नाग काय गुंडाळून बसतो. त्याचे सेवक कोण तर भुतेखेते. गळ्यात नरमुंडांच्या माळा. त्यात वर हा दिगंबर राहणार. तिसरा डोळा उघडला की सर्व जग खाक. असा हा रागीट.

ज्या मनुष्याचे मर जवळ आलेले असते त्याला अमृतही नकोसे वाटते असे म्हणतात. या कुतर्कवाद्यांची गतही काहीशी अशीच असते. त्यांना शिव आणि शिवनाम कसे आवडणार. शंकराला जो जो म्हणून दोष चिकटवायला जावे तो ते भुषणच बनतात. अहो, चारही वेद ज्याचे गुणगान करून थकले पण जो त्यांच्या तावडीत सापडला नाही तो शंकर वेद 'बाह्य'च असणार ना! मातेच्या पोटात वाढणार्‍या गर्भाला माता ही 'बाह्य'च असत नाही का? तसेच हे आहे. शंकरापासून वेदांची उत्पत्ती आहे तेव्हा तो वेदांच्या पकडीत येणे शक्य तरी आहे का? शास्त्रांचे बोल सामान्यजनांना प्रमाण असतात मात्र परमपित्याचे बोल हेच शास्त्र बनतात हे लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा शंकरावर वेद अवलंबून आहेत वेदांवर शंकर नाही.

सामान्य माणूस कोणी मेल्यावर त्याला खांद्यावर घेऊन स्मशानात जातात. तेथे त्याला जाळतात. कालपर्यंत जो चालता बोलता होता तो आज निष्प्राण पडला आहे या भेदक सत्यावर जराही विचार करावा असे त्यांना वाटत नाही. घरी येतात. आंघोळ करतात आणि परत ये रे माझ्या मागल्या सुरू. संसारात अशा प्रकारे खितपत पडलेल्या जीवांपूढे आदर्श निर्माण करण्यासाठी शंकर स्मशानातच वस्ती करतो. स्मशानात वैराग्य साक्षात नांदते. तेथेच वैराग्यमूर्ती शंकराचा वास असतो. स्मशान या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे 'जळणारी भूमी'. येथे भूमी म्हणजे पंचमहाभूतात्मक जड देह असाही अर्थ आहे. योगीराज शंकर सामान्यजनांना योगसाधनेद्वारे पंचमहाभुतांवर जय कसा मिळवावा ते कळावे म्हणून तेथेच योगाचरण करत बसतो. त्याच पंचमहाभूतांची राख वैराग्याचे प्रतीक म्हणून आपल्य अंगावर फासतो.

कुंडलिनीची तुलना सर्पाशी केली जाते हे प्रसिद्धच आहे. कुंडलिनी योग ही सर्वस्वी शंकराची देणगी. शंकराने प्रथम तो पार्वतीला कथन केला आणि मग तो मानवजातीला कळला. या कुंडलिनीचे प्रतीक म्हणजे कंठाला वेढा देऊन बसलेला सर्प. भयंकर सर्प वेढून बसण्याला अजून एक अर्थ आहे. कोणताही प्राणी साधारणतः देहधार्‍याच्या जवळ आपणहून येत नाही. त्याला भिऊनच असतो. पण शंकर म्हणजे साक्षात ब्रह्म, रागद्वेशापासून अगदी अलिप्त. त्यापासून कसली भिती? अगदी हिस्र श्वापदेही ब्रह्माचीच अभिव्यक्ती असल्याने परमपित्याचे त्यांना काय भय. मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ यांसारखे योगीही शिवमय झाले असल्यामुळेच वाघ-सिंहांमधे अगदी बिनदिक्कत मिसळत असत.

भुतगण हे शंकराचे सेवक आहेत. ही भुते मानवी मनातील ओंगळवाण्या वासना आणि कामक्रोधादी विकारांचे प्रतीक आहेत. शंकराने षडरिपूंवर पूर्ण ताबा मिळवला आहे. शंकराचे 'कामदहन' हे नाव प्रसिद्धच आहे. भुत या शब्दाने पंचमहाभूतात्मक जड देहधारी प्राणी हा ही अर्थ सुचित केला आहे. शैव तत्वज्ञानानुसार किडामुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंतचे जीव हे पशू गणले गेले आहेत आणि शंकर त्यांचा पती अर्थात पशूपती. पती या शब्दाचा अर्थ स्वामी, नाथ असा आहे. तेव्हा भूतनाथ शंकर हा सर्व विश्वाचा स्वामी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

शंकराच्या गळ्यातील मुंडमालेला शैव दर्शनात एक गूढ अर्थ आहे. या माळेत 50 किंवा 51 नरमुंड असतात. ही मुंडकी संस्कृत भाषेतील वर्णांचे (ॐ सहित किंवा रहित) प्रतिनिधित्व करतात. अर्थातच ही मुंडमाला प्रत्यक्षात वर्णमाला आहे. याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही पण थोडक्यात असे सांगता येईल की शैव दर्शनाप्रमाणे नादाच्या मुळ स्फुरणातून वा स्पन्दनातून या सर्व सृष्टीची निर्मीती झालेली आहे. भाषेतील अक्षरे वा ध्वनी ही केवळ नादाची एक स्थुल अभिव्यक्ती आहेत. आता तुम्हाला अक्षरांना अ + क्षर (कधीही नष्ट न होणारे) असे का म्हणतात त्याविषयी अंधूकशी कल्पना येऊ शकेल.

शंकराच्या दिगम्बर राहण्याला वैराग्य तर कारणीभूत आहेच पण त्याला अजून एक अर्थ आहे. त्याविषयी एक रंजक कथा आहे. एकदा शंकर-पार्वती सोंगट्या खेळायला बसले. जो हरेल त्याने आपल्या जवळील एक वस्तू दुसर्‍याला द्यायची असे ठरले. पार्वतीने एका मागून एक डाव जिंकण्यास सुरवात केली. शेवटी तर तीने शंकराची कौपीनही जिंकली. शंकर दिगम्बर झाला. याचा अर्थ काय बरे? पार्वती म्हणजे आदिशक्ती वा आदिमाया. शंकर निर्वीकार निर्ग़ूण. त्रिगुणांचे कोणतेही वस्त्र न घालणारा. गुणातीत. आदिमाया शंकराची सगळी वस्त्रे प्रावरणे हिरावून स्वतःकडे घेते अर्थात नामरूपाने धारण केलेली सगुण सृष्टी निर्माण करते.

शंकराला तीन डोळे आहेत. त्यातील तीसरा डोळा भ्रुमध्याच्या ठिकाणी आहे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार याच जागी आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र पुर्णार्थाने जागृत झाले की समाधीमार्गावरचे अनुभव येण्यास सुरवात होते. अध्यात्मज्ञान प्रगट व्हायला सुरवात होते. म्हणजेच आज्ञाचक्र जागृत झाले की जड जगत लय पावते. ज्ञानाग्नीने योग्याचे अज्ञान जळून खाक होते. शंकराच्या तृतीय नेत्राचे आणि जग जाळण्याचे रहस्य हे असे आहे. हा अनुभवाचा विषय आहे. अभ्यासी योगीजनांनाच तो खर्‍या अर्थाने कळणारा आहे. असो.

शंकराचे सर्वव्यापकत्व दर्शवणारी एक छोटी पण छान कथा आहे. शिवपार्वती विवाहापूर्वी हिमालय शंकराकडे गेला. शंकराचे स्मशान वैराग्य पाहून त्याला आपल्या मुलीविषयी काळजी वाटू लागली. नवरा मुलगा कोण, कुठला हे पहावे म्हणून त्याने शंकराला वडिलांचे नाव विचारले. शंकराने 'ब्रह्मा' असे उत्तर दिले. हे विचित्र उत्तर एकून हिमालयाने आजोबांचे नाव विचारले. शंकर उत्तरला 'विष्णु'. त्यावर हिमालयाने पणजोबांचे नाव विचारले. त्यावर गूढ हास्य करत शंकर उत्तरला 'शिव'.

अशा या अलबेल्या शंकराची भक्ती अनेक देवदेवता, ऋषीमुनी, सिद्धयोगी, गन्धर्व, यक्ष, तुंबर यांनी केली आहे. विष्णुने शंकराची उपासना करून सुदर्शन चक्राची प्राप्ती केली. श्रीरामाने रावणयुद्धाच्यावेळी रामेश्वरम येथे शिवलिंगाची पूजा केली होती. श्रीकृष्णाने शंकराची उपासना करून पुत्रप्राप्ती केली. इंद्र, स्कन्द, बृहस्पती, सावित्री, देवमाता आदिती, अग्नि, महामुनी मार्कंडेय, ऋषी वामदेव, महर्षी लोमश, वत्स मुनी, ऋषी तंडी, व्यासमुनी, ब्रह्मर्षी वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वासमुनी, गर्गाचार्य, अत्रिमुनी आणि अनसूया, पुष्पदंत गन्धर्व, पितामह भीष्म, शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, सिद्ध थिरूमुलार, सिद्ध बोगरनाथ, दक्षिणेकडील 63 नयनार संत, शिवयोगिनी लल्लेश्वरी, महाकवी कालिदास, स्वामी विवेकानन्द या आणि अशा अनेकांनी शिवभक्तीद्वारे आणि शिवोपासनेद्वारे आपले जीवन धन्य करून घेतले आहे. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दिपिका लिहिल्यानंतर गुरू निवृत्तिनाथ त्यांना म्हणाले, "भगवत गीतेवरील तुझे भाष्य छान सांगितलेस. आता या मार्गावरचा तुझा स्वतःचा अनुभव काय तो आम्हाला सांग." हा अनुभव ज्ञानेश्वरांनी 'अमृतानुभव' या ग्रंथाद्वारे जगापुढे ठेवला. यात त्यांनी 'शिव-शक्ती' यासंबंधानेच विषयाचे निरूपण केले आहे. शैव उपासक नाथसंप्रदायाचा अद्वयवाद (अद्वैतवाद नव्हे) तेथे स्पष्ट दिसून येतो. सरतेशेवटी शिवमहिम्नस्तोत्रातील एका श्लोकाने या भागाची सांगता करतो -

रुचीनां वैचित्यादृजुकुटिलनानापथजुषां।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव

ज्याप्रमाणे भिन्न भिन्न नद्या एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याचप्रकारे आपापल्या आवडीनुसार सरळ अथवा वाकड्या मार्गांनी सर्व लोक, हे प्रभो! शेवटी तुम्हालाच येऊन मिळतात.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 12 July 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ